व्हिडिओ पाहण्यासाठी

बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का?

बायबलच्या मूळ मजकुरात फेरफार झाले आहेत का?

 नाही. हजारो वर्षांदरम्यान, बायबलच्या मूळ हस्तलिखितांवरून त्याच्या प्रती तयार करण्यात आल्या आणि पुढे तशा आणखी प्रती तयार करण्यात आल्या. ज्या साहित्यांवर या प्रती तयार करण्यात आल्या ते सहसा लवकर खराब व्हायचे. असं असलं तरी, प्राचीन हस्तलिखितांची तुलना केल्यावर असं दिसून येतं, की बायबलचा मूळ संदेश बदललेला नाही.

प्रती तयार करताना काहीच चुका झाल्या नाहीत, असा याचा अर्थ आहे का?

 आजपर्यंत बायबलची हजारो प्राचीन हस्तलिखितं सापडली आहेत. त्यांपैकी काहींमध्ये बरेच फरक दिसून आले. यावरून दिसून येतं की प्रती तयार करताना काही चुका झाल्या. पण हे अगदी बारीकसारीक फरक आहेत आणि त्यांमुळे बायबलच्या मूळ मजकुराचा अर्थ बदलत नाही. पण यासोबतच, काही मोठे बदलही दिसून आले आहेत. यावरून दिसून येतं की बायबलच्या संदेशात बदल करण्याचा मुद्दामहून प्रयत्न करण्यात आला. याची दोन उदाहरणं पाहा.

  1.  १. १ योहान ५:७ या वचनात बायबलच्या काही जुन्या भाषांतरांमध्ये हे शब्द दिसून येतात: “स्वर्गात . . . पिता, शब्द आणि पवित्र आत्मा: आणि हे तिघे एक आहेत.” पण जुन्या हस्तलिखितांमध्ये पाहिलं, तर मूळ मजकुरात हे शब्द नव्हते. ते नंतर टाकण्यात आले. a आणि म्हणूनच बऱ्‍याच बायबल भाषांतरांमध्ये हे शब्द गाळले आहेत.

  2.  २. देवाचं नाव बायबलच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये हजारो वेळा सापडतं. पण बायबलच्या बऱ्‍याच भाषांतरांमध्ये देवाच्या नावाऐवजी “प्रभू” किंवा “परमेश्‍वर” अशा पदव्या वापरल्या आहेत.

पुढेही बायबलमध्ये अशा बऱ्‍याच चुका सापडणार नाहीत हे कशावरून?

 आतापर्यंत इतकी हस्तलिखितं सापडली आहेत की चुका शोधणं आधीपेक्षा खूप सोपं झालं आहे. b या हस्तलिखितांची तुलना केल्यावर बायबलच्या अचूकतेबद्दल काय दिसून आलं आहे?

  •   हिब्रू शास्त्रवचनांच्या (यांना सहसा “जुना करार” म्हणतात) मजकुराबद्दल बोलताना विल्यम एच. ग्रीन हे विद्वान असं म्हणाले: “आपण अगदी खातरीने म्हणू शकतो, की प्राचीन काळातलं दुसरं कोणतंही लिखाण इतक्या अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही.”

  •   ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांबद्दल किंवा ‘नव्या कराराबद्दल’ बायबलचे विद्वान एफ. एफ. ब्रूस असं म्हणतात: “प्राचीन काळातली बरीचशी लिखाणं खरी आहेत की नाहीत याबद्दल कोणीही शंका घेत नाही. पण खरंतर, त्यांच्या तुलनेत नव्या कराराची अचूकता सिद्ध करणारे कितीतरी जास्त पुरावे आपल्याजवळ आहेत.”

  •   बायबल हस्तलिखितांचा अभ्यास करणारे एक नामवंत विद्वान सर फ्रेड्रिक केन्यॉन असं म्हणतात: “आपण बायबल हातात घेऊन पूर्ण खातरीने आणि आत्मविश्‍वासाने म्हणू शकतो की हे देवाचं खरं वचन आहे. आणि आजपर्यंत कित्येक शतकांदरम्यान त्याच्या मूळ संदेशात फारसा बदल झालेला नाही.”

बायबल अचूकपणे आपल्यापर्यंत पोहोचलं याचे आणखी कोणते पुरावे आहेत?

  •   बायबलच्या प्रती तयार करणाऱ्‍या यहुदी आणि ख्रिस्ती नकलाकारांनी, देवाच्या लोकांच्या मोठमोठ्या चुका सांगणारे अहवाल जगापासून लपवून ठेवले नाहीत, तर ते प्रामाणिकपणे लिहून काढले. c (अनुवाद २०:१२; २ शमुवेल ११:२-४; गलतीकर २:११-१४) यहुदी लोकांचा बंडखोरपणा उघड करणारे अहवाल आणि मानवांनी बनवलेले सिद्धान्त खोटे आहेत हे दाखवणारे अहवालसुद्धा त्यांनी लिहून काढले. (होशेय ४:२; मलाखी २:८, ९; मत्तय २३:८, ९; १ योहान ५:२१) हे अहवाल प्रामाणिकपणे उतरवून, आपण भरवशालायक आहोत हे या नकलाकारांनी दाखवलं. तसंच, त्यांना देवाच्या पवित्र वचनाबद्दल किती आदर होता हेही त्यांनी दाखवलं.

  •   बायबल लेखकांना बायबल लिहायची प्रेरणा स्वतः देवाने दिली. मग त्यातला संदेश आपल्यापर्यंत अचूकपणे पोहोचावा, याची तो खातरी करणार नाही का? d (यशया ४०:८; १ पेत्र १:२४, २५) कारण फक्‍त जुन्या काळातल्या लोकांनाच नाही, तर आज आपल्यालाही त्याचा फायदा व्हावा अशी त्याची इच्छा आहे. (१ करिंथकर १०:११) खरंतर, “आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या. या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला मदत करतात आणि सांत्वन देतात.”​—रोमकर १५:४.

  •   येशू आणि त्याच्या शिष्यांनी बऱ्‍याच वेळा इब्री शास्त्रवचनांमधले शब्द लोकांना सांगितले. प्राचीन अहवालांच्या अचूकतेबद्दल त्यांना जराही शंका नव्हती.​—लूक ४:१६-२१; प्रेषितांची कार्यं १७:१-३.

a कोडेक्स साइनाइटिकस, कोडेक्स ॲलेक्सँड्रिनस, वॅटिकन हस्तलेख १२०९, मूळ लॅटिन वल्गेट,  फिलोक्सीनियन-हारक्लीयन सिरियॅक वर्शन किंवा सिरियॅक पेशीटा  या भाषांतरांमध्ये हे शब्द नाहीत.

b उदाहरणार्थ, नव्या कराराची म्हणजेच ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांची ५,००० पेक्षा जास्त ग्रीक हस्तलिखितं सापडली आहेत.

c देवाच्या सेवकांकडून कधी चुका होऊच शकत नाहीत असं बायबलमध्ये सांगितलेलं नाही. उलट बायबल असं म्हणतं, की “असा कोणताही माणूस नाही जो पाप करत नाही.”​—१ राजे ८:४६.

d देवाने बायबल लेखकांना शब्द न्‌ शब्द सांगितला नाही, पण काय लिहावं याबद्दल त्याने त्यांना मार्गदर्शन दिलं.​—२ तीमथ्य ३:१६, १७; २ पेत्र १:२१.