व्हिडिओ पाहण्यासाठी

येशू दिसायला कसा होता?

येशू दिसायला कसा होता?

बायबलचं उत्तर

 येशू नेमका कसा दिसायचा याबद्दल कोणालाही माहीत नाही. कारण तो कसा दिसायचा याबद्दल बायबलमध्ये सांगितलेलं नाही. यावरून कळतं की येशूच्या रंगरूपाबद्दल जाणून घेणं इतकं महत्त्वाचं नाही. पण बायबलमधल्या वचनांच्या मदतीने येशू कसा दिसायचा याचा अंदाज आपण बांधू शकतो.

  •   नाकडोळे: येशूची आई यहुदी होती. त्यामुळे त्याचे नाकडोळे यहुदी लोकांसारखेच दिसत असावेत. (इब्री लोकांना ७:१४) त्याचं रंगरूप चारचौघांमध्ये उठून दिसेल असं नसावं. कारण एकदा जेव्हा तो गालीलहून यरुशलेमला गुप्तपणे प्रवास करत होता, तेव्हा त्याला कोणीही ओळखू शकलं नाही. (योहान ७:१०, ११) तसंच, त्याच्या शिष्यांमध्येही तो उठून दिसत नव्हता. म्हणूनच यहूदा इस्कर्योत जेव्हा येशूला पकडून द्यायला आला, तेव्हा सैनिकांना येशूला ओळखता यावं म्हणून यहूदाने येशूचं चुंबन घेतलं.​—मत्तय २६:४७-४९.

  •   केसांची लांबी: येशूचे केस कदाचित लांब नसावेत, कारण बायबलमध्ये म्हटलंय, “पुरुषाचे लांब केस असणं ही त्याच्यासाठी अपमानाची गोष्ट आहे.”​—१ करिंथकर ११:१४.

  •   दाढी: येशूला दाढी होती. येशू यहुदी नियमशास्त्र पाळायचा आणि त्या नियमशास्त्रात पुरुषांना त्यांच्या दाढीची टोकं कापण्याची मनाई होती. (लेवीय १९:२७; गलतीकर ४:४) तसंच, बायबलमध्ये येशूच्या दुःखाबद्दल करण्यात आलेल्या एका भविष्यवाणीत त्याच्या दाढीचा उल्लेख केला आहे.​—यशया ५०:६.

  •   शरीरयष्टी: बायबलमधल्या माहितीवरून दिसतं, की येशू शरीराने दणकट होता. पृथ्वीवर सेवाकार्य करत असताना त्याने बरेच मैल प्रवास केला. (मत्तय ९:३५) त्याने दोन वेळा यहुद्यांच्या मंदिरात व्यापार करणाऱ्‍यांचे मेज उलटून मंदिर शुद्ध केलं. आणि एकदा तर त्याने त्यांच्या गुराढोरांना चाबकाने मंदिरातून हाकलून लावलं. (लूक १९:४५, ४६; योहान २:१४, १५) मॅक्लिंटॉक आणि स्ट्राँग यांच्या सायक्लोपिडियामध्ये असं म्हटलंय, “शुभवर्तमानाच्या पुस्तकांत आपण [येशूबद्दल] जे वाचतो त्यावरून असं दिसून येतं, की तो धडधाकट आणि सुदृढ होता.”​—खंड ४, पान क्र. ८८४.

  •   चेहऱ्‍यावरचे हावभाव: येशू प्रेमळ आणि दयाळू होता, आणि साहजिकच त्याच्या चेहऱ्‍यावरच्या हावभावांवरून हे दिसून येत असेल. (मत्तय ११:२८, २९) सर्व प्रकारचे दुःखीकष्टी लोक त्याच्याकडे मदतीसाठी यायचे. (लूक ५:१२, १३; ७:३७, ३८) लहान मुलंसुद्धा न घाबरता त्याच्याजवळ यायची.​—मत्तय १९:१३-१५; मार्क ९:३५-३७.

येशूच्या दिसण्याबद्दल काही गैरसमज

 गैरसमज: काही जणांचं म्हणणं आहे की येशू आफ्रिकन वंशाचा असावा, कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकात म्हटलंय की त्याचे केस लोकरीसारखे आणि त्याचे पाय “शुद्ध तांब्यासारखे” आहेत.​—प्रकटीकरण १:१४, १५.

 खरी माहिती: प्रकटीकरण पुस्तकातली माहिती “चिन्हांच्या रूपात” लिहिली आहे. (प्रकटीकरण १:१) येशू पृथ्वीवर होता, तेव्हा त्याचे केस आणि पाय खरोखरच लोकरीसारखे आणि तांब्यासारखे नव्हते. तर येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर त्याच्या गुणांचं वर्णन करण्यासाठी या चिन्हांचा वापर करण्यात आलाय. याबद्दल प्रकटीकरण १:१४ मध्ये म्हटलंय, की येशूच्या “डोक्यावरचे केस पांढऱ्‍या लोकरीसारखे, बर्फासारखे शुभ्र होते.” या वचनात येशूचे केस कुरळे होते की नव्हते याबद्दल नाही, तर त्याच्या केसांच्या रंगाबद्दल सांगितलंय. ते लोकरीसारखे आणि बर्फासारखे पांढरेशुभ्र होते. येशू सृष्टीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. (प्रकटीकरण ३:१४) त्यामुळे त्याचे पांढरे केस हे वयामुळे आणि अनुभवामुळे आलेल्या बुद्धीला सूचित करतात.

 दृष्टान्तात येशूचे पाय “भट्टीत तापवलेल्या शुद्ध तांब्यासारखे” दिसत होते. (प्रकटीकरण १:१५) तसंच, त्याचा चेहरा ‘तेजस्वीपणे चमकणाऱ्‍या सूर्यासारखा’ होता. (प्रकटीकरण १:१६) कुठल्याही वंशाच्या त्वचेचा रंग या दृष्टान्तात दिलेल्या वर्णनाशी जुळत नाही. त्यामुळे, हा दृष्टान्त नक्कीच लाक्षणिक असावा. यावरून हे स्पष्ट होतं, की पुनरुत्थान झालेला येशू, “कोणीही पोहोचू शकत नाही अशा दिव्य, तेजस्वी प्रकाशात” राहतो.​—१ तीमथ्य ६:१६.

 गैरसमज: येशू अशक्‍त आणि कमजोर होता.

 खरी माहिती: येशू धैर्यवान होता. उदाहरणार्थ, एकदा जेव्हा शस्त्र घेतलेला जमाव त्याला अटक करायला आला, तेव्हा तो धाडसाने त्यांच्यासमोर उभा राहिला. (योहान १८:४-८) तसंच, येशू शरीरानेही दणकट असावा, कारण तो सुतार होता आणि त्याला अंगमेहनतीचं काम करावं लागायचं.​—मार्क ६:३.

 असं असेल, तर मग येशूला त्याचा वधस्तंभ उचलायला मदतीची गरज का पडली? आणि त्याच्यासोबत वधस्तंभावर खिळलेल्या दोघा जणांच्या आधीच त्याचा मृत्यू का झाला? (लूक २३:२६; योहान १९:३१-३३) त्याला मृत्युदंड देण्यात आला, त्याआधी त्याचं शरीर खूप कमजोर झालं होतं. त्याने पूर्ण रात्र जागून काढली होती. याचं एक कारण म्हणजे तो खूप दुःखात होता. (लूक २२:४२-४४) रात्रभर यहुद्यांनी आणि दुसऱ्‍या दिवशी रोमी लोकांनी त्याचा खूप छळ केला होता. (मत्तय २६:६७, ६८; योहान १९:१-३) या सर्व कारणांमुळे कदाचित त्याचा आधीच मृत्यू झाला असेल.

 गैरसमज: येशू नेहमी गंभीर आणि उदास असायचा.

 खरी माहिती: बायबलमध्ये यहोवाला ‘आनंदी देव’ म्हटलंय आणि येशूने त्याच्या स्वर्गातल्या पित्याच्या, यहोवाच्या गुणांचं हुबेहूब अनुकरण केलं. (१ तीमथ्य १:११; योहान १४:९) एवढंच नाही, तर येशूने इतरांनाही आनंदी राहायला शिकवलं. (मत्तय ५:३-९; लूक ११:२८) यावरून दिसून येतं, की येशू आनंदी राहायचा आणि हा आनंद त्याच्या चेहऱ्‍यावर झळकायचा.