व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचक विचारतात . . .

ख्रिश्‍चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य आहे का?

ख्रिश्‍चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य आहे का?

जगातल्या लाखो लोकांचा विश्‍चास आहे, की नाताळ किंवा क्रिसमस साजरा करणं म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस साजरा करणं. पण येशूच्या जवळच्या लोकांनी, जसं की त्याच्या प्रेषितांनी आणि शिष्यांनी नाताळ सण साजरा केला होता का? तसंच, बायबल वाढदिवसांविषयी काय म्हणतं? या प्रश्‍नांची उत्तरं मिळाल्यावर आपल्याला हे समजण्यासाठी मदत होईल, की ख्रिश्‍चनांनी नाताळ साजरा करणं योग्य आहे की नाही.

पहिली गोष्ट म्हणजे, येशूचा किंवा देवाच्या इतर विश्‍वासू सेवकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, असा उल्लेख बायबलमध्ये कुठेही सापडत नाही. ज्यांनी वाढदिवस साजरा केला होता, अशा फक्‍त दोन जणांबद्दल बायबलमध्ये सांगितलं आहे. ते यहोवा देवाचे सेवक नव्हते. तसंच, त्या दोघांच्या वाढदिवसांच्या समारंभांत वाईट गोष्टी घडल्या. (उत्पत्ति ४०:२०; मार्क ६:२१) एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका यात सांगितल्याप्रमाणे, पहिल्या शतकातले ख्रिस्ती “वाढदिवस साजरा करणं या खोट्या धार्मिक प्रथेचा” विरोध करायचे.

येशूचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?

येशू नेमका कोणत्या दिवशी जन्माला आला, याविषयी बायबल स्पष्ट माहिती देत नाही. मॅकक्लिंटॉक आणि स्ट्राँग यांच्या सायक्लोपीडिया मध्ये असं सांगितलं आहे, की “ख्रिस्ताचा जन्म नेमका कोणत्या दिवशी झाला याची अचूक माहिती नवा करार किंवा दुसऱ्‍या कोणत्याही मार्गाने मिळवणं अशक्य आहे.” जर शिष्यांनी आपला वाढदिवस साजरा करावा अशी येशूची इच्छा असती, तर त्यांना त्याच्या जन्माची तारीख माहीत असावी, याची त्याने खात्री केली असती.

दुसरी गोष्ट म्हणजे, येशूने किंवा त्याच्या शिष्यांनी नाताळ सण साजरा केला, असं बायबलमध्ये कुठेही म्हटलेलं नाही. न्यू कॅथलिक एन्सायक्लोपिडिया म्हणतं, की नाताळ सण साजरा करण्याचा पहिला उल्लेख, “क्रोनोग्राफ ऑफ फिलोकॅलस या रोमन पंचांगात सापडतो. या पंचांगाचं मूळ साहित्य [इ.स.] ३३६ या वर्षातलं आहे.” यावरून हे स्पष्ट होतं, की हा उल्लेख बायबल लिहून पूर्ण झाल्याच्या आणि येशू पृथ्वीवर येऊन गेल्याच्या अनेक शतकांनंतरचा आहे. म्हणूनच मॅकक्लिंकटॉक आणि स्ट्राँग यांनी सांगितलं, की “नाताळ सण हा देवाकडून नाही, शिवाय याचा उगम नवा करार यातूनही नाही.” *

येशूने आपल्या शिष्यांना कोणता दिवस पाळायला सांगितलं?

आपल्या शिष्यांनी काय केलं पाहिजे, याबद्दल महान शिक्षक येशूने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या सूचना बायबलमध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. पण नाताळ सण साजरा करावा हे त्या सूचनांमध्ये नाही. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी आपल्या सूचनांच्या पलीकडे जाऊ नये अशी एका शिक्षकाची इच्छा असते. त्याचप्रमाणे येशूचीही इच्छा आहे की त्याच्या शिष्यांनी, पवित्र शास्त्रात “लिहिण्यात आल्या आहेत, त्या गोष्टींच्या पलीकडे जाऊ” नये.—१ करिंथकर ४:६.

पण पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना एक महत्त्वाचा दिवस पाळण्याबद्दल सांगण्यात आलं होतं. त्यांना येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करायचा होता. हा समारंभ कधी आणि कसा साजरा केला जावा याबद्दल येशूने स्वतः आपल्या शिष्यांना सांगितलं होतं. या सर्व स्पष्ट सूचना आणि येशूच्या मृत्यूची तारीख बायबलमध्ये नमूद करण्यात आली आहे.—लूक २२:१९; १ करिंथकर ११:२५.

वर चर्चा केल्याप्रमाणे आपल्याला हे समजायला मदत मिळाली की नाताळ म्हणजे वाढदिवस साजरा करणं. तसंच, पहिल्या शतकातले ख्रिश्‍चन खोट्या धर्मातल्या प्रथा पाळत नव्हते. त्यासोबतच येशूने किंवा इतर कोणीही नाताळ साजरा केल्याचा उल्लेख बायबलमध्ये सापडत नाही. या सर्व पुराव्यांचं परीक्षण केल्यावर जगभरातले लाखो ख्रिस्ती लोक या निष्कर्षावर पोचले आहेत, की ख्रिश्‍चनांनी नाताळ सण साजरा करणं योग्य नाही.

^ परि. 6 नाताळच्या प्रथांचा उगम या विषयावर जास्त माहितीसाठी टेहळणी बुरूज क्र. १, २०१६ या अंकात “वाचक विचारतात . . . नाताळच्या प्रथा चुकीच्या का आहेत?” हा लेख पाहा. हे नियतकालिक www.mr1310.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.