व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

इतरांना एक अमूल्य भेट द्या-तुमची स्माइल!

इतरांना एक अमूल्य भेट द्या-तुमची स्माइल!

जेव्हा कुणी तुमच्याकडे पाहून प्रसन्नपणे हसतं किंवा स्माइल करतं तेव्हा तुम्ही काय करता? तुम्हीदेखील स्माइल करता. कारण तुम्हालादेखील आनंद होतो. हो हे खरं आहे की, मित्र किंवा एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा मनापासून तुमच्याकडे पाहून हसते तेव्हा तुम्हालाही आनंद होतो आणि तुमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात. मॅग्डलेना नावाची स्त्री म्हणते: “माझे पती जॉर्ज अगदी मनापासून स्माइल करायचे. आज जरी ते या जगात नसले तरी मला आठवतं, की जेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहायचो तेव्हा मला अगदी शांत आणि सुरक्षित वाटायचं.”

मनापासून दिलेल्या स्माइलमध्ये आनंद व संतोष अशा सकारात्मक भावना असतात. ऑबझरवर या असोसिएशन फॉर सायकोलॉजिकल सायन्सच्या ऑनलाईन नियतकालिकामध्ये असं म्हटलं आहे, “स्माइल करणं हा जणू आपल्या स्वभावाचा एक भाग आहे. नवीन जन्मलेल्या मुलांनादेखील चेहऱ्यावरचे हावभाव अचूकपणे समजतात.” त्या लेखात पुढे असं म्हटलं आहे: “लोक दुसऱ्यांच्या हास्यावरून बरेच महत्त्वपूर्ण निष्कर्ष तर काढतातच पण त्यानुसार आपली प्रतिक्रियादेखील ठरवतात.”

अमेरिकेतल्या हार्वर्ड युनिवर्सिटीमधल्या काही शोधकर्त्यांनी वृद्ध रुग्णांच्या एका गटावर अभ्यास केला. त्यांची काळजी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या हावाभावांना, ते रुग्ण कशी प्रतिक्रिया देतात यावर शोधकर्ते अभ्यास करत होते. त्याविषयी ते म्हणतात, जेव्हा त्यांच्या काळजी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर, “जास्त प्रेमळ, काळजी दाखवणारे, उत्साही आणि समंजस असे भाव असायचे” तेव्हा रुग्णांना समाधान वाटायचं आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारायचं. पण जेव्हा काळजी घेणाऱ्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नसायचे, तेव्हा त्याचा उलट परिणाम व्हायचा.

जेव्हा तुम्ही स्माइल करता तेव्हा तुम्ही स्वतःचीही मदत करत असता. संशोधनात असं आढळून आलं आहे की, स्माइल केल्याने आत्मविश्वास वाढतो, आपण आनंदी राहतो आणि आपला तणावदेखील कमी होतो. पण चेहरा उदास ठेवल्याने, उलट परिणाम होतात.

स्मित हास्याने “माझं मनोबल वाढलं”

आधी उल्लेख केलेली मॅग्डलेना ही एक यहोवाची साक्षीदार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तिला आणि तिच्या कुटुंबातल्या काही सदस्यांना रावेन्सब्रुक इथल्या यातना शिबिरात पाठवण्यात आलं, कारण त्यांनी नात्झी विचारसरणी स्वीकारली नव्हती. ती आपला अनुभव सांगते, “काही वेळा गार्ड्‌स आम्हाला दुसऱ्या कैद्यांशी बोलू देत नसत. पण ते आमच्या चेहऱ्याच्या हावभावांवर बंदी टाकू शकत नव्हते. मी फक्त माझ्या आईचा आणि बहिणीचा हसरा चेहरा पाहिला, तरी माझं मनोबल वाढायचं आणि परीक्षेत टिकून राहण्याचा माझा निर्धार आणखीन पक्का व्हायचा.”

तुम्हाला कदाचित वाटत असेल की जीवनाच्या चिंतांमुळे तुमच्याकडे स्माइल करायला फारशी कारणं नाहीत. पण हे लक्षात ठेवा की भावनांची सुरुवात विचारांनी होते. (नीतिसूत्रे १५:१५; फिलिप्पैकर ४:८, ९) तेव्हा कितीही कठीण वाटत असलं तरी, जेवढं शक्य होईल तेवढं सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींवर विचार करण्याचा प्रयत्न करा. * बायबल वाचन आणि प्रार्थना केल्याने अनेकांना असं करायला मदत मिळाली आहे. (मत्तय ५:३; फिलिप्पैकर ४:६, ७) इतकंच काय तर “आनंद” आणि “हर्ष” आणि याच अर्थाचे अनेक शब्द बायबलमध्ये शेकडो वेळा येतात! तुम्हीदेखील बायबलची एक किंवा दोन पानं रोज वाचण्याचा प्रयत्न करा आणि कदाचित, तुम्हीही स्वतःला जास्त स्माइल करताना पाहाल.

दुसरे तुमच्याकडे पाहून स्माइल करतील, याची वाट पाहू नका. पुढाकार घ्या; स्माइल करून इतरांना आनंदी करा. हो, स्माइल ही तुम्हाला देवाकडून मिळालेली भेट आहे. ज्यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर तुमची स्माइल पाहणाऱ्यांनादेखील आनंद होईल.

^ परि. 8 नोव्हेंबर २०१३ च्या अवेक! यातला “डू यू हॅव अ फिस्ट कॉन्स्टंटली?” हा लेख पाहा.