व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!

सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!

सरतेशेवटी पृथ्वीवर शांती!

काहीजणांचे असे मत आहे की राजकीय स्वातंत्र्य आणि धार्मिक शुद्धता केवळ विनाशकारी शक्‍तीच्याच बळावर मिळवता येते. या एकमेव मार्गानेच आपल्याला नको असलेल्या शासकांना हटविता येते असे ते मानतात. शिवाय काही सरकारांचे प्रशासन देखील आपल्या प्रजेला नियंत्रणात ठेवण्याकरता दहशतवादी मार्गांचा वापर करतात. पण जर लोकांत दहशत निर्माण करणे हा खरोखरच शासकीय व सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा परिणामकारक मार्ग असेल, तर मग त्यामुळे शांती, समृद्धी व स्थैर्य आले पाहिजे. काही काळानंतर हिंसाचार व लोकांच्या मनातली भीती नाहीशी झाली पाहिजे. पण प्रत्यक्षात असे घडले आहे का?

वास्तवात दहशतवादामुळे घडतो, तो नुसता रक्‍तपात आणि क्रौर्य; माणसाच्या जिवाची किंमतच राहात नाही. या क्रौर्याला बळी पडणारे, त्यामुळे दुःख सोसणारे मग सूड उगवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दडपून टाकण्यासाठी प्रशासनाकडून आणखी जोरजबरस्ती केली जाते आणि पर्यायाने, ते आणखीनच पेटून उठतात.

आपल्या समस्यांवर तोडगा हिंसाचार नव्हे

मनुष्याने हजारो वर्षांपासून आपले राजकीय, धार्मिक व सामाजिक प्रश्‍न स्वतःहूनच सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. बायबलमध्ये या वस्तुस्थितीचे अगदी अचूक शब्दांत वर्णन केले आहे: “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) येशूने म्हटले होते: “ज्ञान त्याच्या परिणामांमुळेच सफल अथवा निष्फळ ठरते.” (मत्तय ११:१९, जे. बी. फिलिप्स यांचे द न्यू टेस्टमेंट इन मॉडर्न इंग्लिश) बायबलमधील या तत्त्वांचे तात्पर्य असे की दहशतवाद ही एक वायफळ आशा आहे. दहशतवादामुळे स्वातंत्र्य व आनंद नव्हे तर मृत्यू, दुःख आणि विध्वंस इतकेच निष्पन्‍न झाले आहे. सबंध २० व्या शतकाने हे वाईट परिणाम भोगले आणि आता ते २१ व्या शतकालाही गिळंकृत करण्याच्या मार्गावर आहेत. कित्येकजण मान्य करतात की दहशतवाद तोडगा नव्हे तर एक समस्या आहे.

दहशतवादाने होरपळून निघालेल्या एका देशात एका लहानशा मुलीने असे लिहिले: “रोज मला वाटतं, काहीतरी चमत्कार घडावा आणि आजतरी माझ्या कुटुंबियांपैकी किंवा मित्रमैत्रिणींपैकी कुणीही मरू नये.” तिच्या शब्दांवरून बऱ्‍याच जणांनी काढलेला निष्कर्ष व्यक्‍त होतो: मनुष्याच्या समस्यांचा तोडगा आता त्याच्या हातात राहिलेला नाही. दहशतवादासहित पृथ्वीवर सध्या असलेल्या इतर सर्व समस्या केवळ मनुष्याचा सृष्टिकर्ताच सोडवू शकतो. पण आपण देवावर का म्हणून भरवसा ठेवावा?

देव आपल्या भरवशास पात्र आहे

एक कारण म्हणजे आपला सृष्टिकर्ता यहोवा आहे व त्यानेच आपल्याला जीवन दिले आहे. आणि हे जीवन आपण सुखासमाधानाने जगावे असे त्याला वाटते. देवाचा संदेष्टा यशया याने त्याच्या प्रेरणेने असे लिहिले: “हे परमेश्‍वरा, तू आमचा पिता आहेस; आम्ही माती आहो, तू आमचा कुंभार आहेस; आम्ही सर्व तुझ्या हातची कृति आहो.” (यशया ६४:८) यहोवा मानवजातीचा जनक आहे आणि त्याच्या दृष्टीने सगळीच राष्ट्रे मोलवान आहेत. दहशतवादाला कारणीभूत ठरणाऱ्‍या अन्यायाकरता व द्वेषाकरता तो मुळीच जबाबदार नाही. बुद्धिमंत राजा शलमोन याने एकदा असे म्हटले: “देवाने मनुष्य सरळ असा उत्पन्‍न केला आहे, पण तो [म्हणजे, मनुष्य स्वतः] अनेक कल्पनांच्या मागे लागला आहे.” (उपदेशक ७:२९) देवाची अक्षमता नव्हे, तर मनुष्याचा दुष्टपणा आणि दुरात्म्यांचा प्रभाव हे दहशतवादाचे मूळ कारण आहे.—इफिसकर ६:११, १२.

आपण यहोवावर भरवसा ठेवण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यानेच मनुष्याला निर्माण केले असल्यामुळे मनुष्याच्या समस्यांचे मूळ कारण काय व या समस्या कशा सोडवायच्या हे इतर कोणापेक्षा त्याला माहीत आहे. हे सत्य बायबलमध्ये नीतिसूत्रे ३:१९ यात व्यक्‍त केले आहे: “परमेश्‍वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले.” देवावर पूर्ण भरवसा असलेल्या पुरातन काळच्या एका मनुष्याने असे लिहिले: “मला साहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्‍वर त्याच्यापासून मला साहाय्य येते.”—स्तोत्र १२१:१, २.

आपण देवावर का भरवसा ठेवावा याचे तिसरे कारण: देवाजवळ अत्याचार आणि रक्‍तपाताला आळा घालण्याचे सामर्थ्य आहे. नोहाच्या काळात “पृथ्वी . . . जाचजुलमांनी भरली होती.” (उत्पत्ति ६:११) देवाचा न्यायदंड अगदी अचानक आला आणि त्याने समस्येचे पूर्णतः निवारण केले: “[देवाने] प्राचीन जगाचीहि गय केली नाही, तर अभक्‍तांच्या जगावर जलप्रलय आणिला.”—२ पेत्र २:५.

नोहाच्या काळात आलेल्या जलप्रलयापासून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट शिकायला मिळते असे बायबल सांगते: “प्रभुला, धार्मिक लोकांची त्यांच्या दुःखापासून सुटका कशी करायची हे माहीत आहे आणि त्याला माहीत आहे की न्यायाच्या दिवसापर्यंत दुष्ट लोकांना शिक्षेसाठी कसे ठेवायचे.” (२ पेत्र २:९, ईजी टू रीड व्हर्शन) जे खरोखर शांतीने जगू इच्छितात आणि जे मुद्दामहून दुसऱ्‍यांचे जीवन दुःखी बनवतात अशा लोकांमधला फरक देव ओळखू शकतो. इतरांचे जीवन दुःसह बनवणाऱ्‍यांना अर्थात त्याने ‘अनीतिमान लोकांना विनाशाकरता’ राखून ठेवले आहे. पण जे शांतीने जगण्याची मनापासून आस धरतात त्यांच्याकरता तो एक नवी पृथ्वी तयार करत आहे, ज्यात नीतिमत्त्व वास करेल.—२ पेत्र ३:७, १३.

पृथ्वीवर कायमची शांती!

बायबलचे लेखक बरेचदा सबंध मानवजातीच्या संदर्भात लिहिताना “पृथ्वी” हा शब्द वापरतात. उदाहरणार्थ, उत्पत्ति ११:१ यात असे म्हटले आहे की “सर्व पृथ्वीची” म्हणजेच त्याकाळी हयात असलेल्या सर्व मानवांची एकच भाषा होती. प्रेषित पेत्राने याच अर्थाने ‘नव्या पृथ्वीविषयी’ लिहिले. यहोवा, मानव समाजात असलेला अत्याचार व द्वेष नाहीसा करून नीतिमत्त्व व न्याय स्थापित करण्याद्वारे मानव समजाला जणू नवीन बनवेल. यापुढे नीतिमत्त्व व न्याय पृथ्वीवर कायम “वास” करतील. मीखा ४:३ यात लिहिलेल्या एका भविष्यवाणीनुसार बायबल आपल्याला सांगते: “तो देशोदेशीच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा इनसाफ ठरवील, तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.”

ही भविष्यवाणी पूर्ण झाल्यावर लोकांचे जीवन कसे असेल? मीखा ४:४ सांगते: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” पृथ्वीवरील त्या सुखद परिस्थितीत, दहशतवादी आता पुढचा हल्ला कोठे करतील अशी कोणालाही भीती वाटणार नाही. ही प्रतिज्ञा खरच विश्‍वास ठेवण्याजोगी आहे का? हो, “कारण सैन्यांच्या यहोवाचे मुख हे बोलले आहे.”—मीखा ४:४, पं.र.भा.

अतिरेकी रोज नवनव्या धमक्या देतच आहेत आणि हिंसाचाराच्या भीतीने राष्ट्रांना अक्षरशः कापरे भरले आहे; अशा परिस्थितीत शांतीप्रिय लोकांनी केवळ यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. अशी एकही समस्या नाही की जिचे निवारण तो करू शकत नाही. तो सर्व दुःखे, क्लेश व मृत्यू देखील नाहीसा करेल. बायबल सांगते: “तो मरणाला कायमचे गिळून टाकील. आणि प्रभू यहोवा सर्व मुखांवरील आसवे पुसून टाकील.” (यशया २५:८, पं.र.भा.) आज अनेक राष्ट्रे दहशतवादामुळे दुःखाने व भीतीने ग्रासलेली आहेत, पण लवकरच त्यांच्या जमिनीतून शांतीचे फळ ओसंडून वाहील. ही शांती आणण्याची प्रतिज्ञा “ज्याच्याने असत्य बोलवतच नाही” अशा देवाने केली आहे आणि याच शांतीची आज मानवजातीला नितान्त गरज आहे.—तीत १:२, पं.र.भा.; इब्री लोकांस ६:१७, १८. (६/०६)

[९ पानांवरील चौकट/चित्रे]

बंदुकीच्या गोळ्या आणि स्फोटकांना एक परिणामकारक पर्याय

राजकीय बदल केवळ हिंसाचाराच्या मार्गानेच घडवून आणता येतो असे एकेकाळी मानणाऱ्‍या व्यक्‍तींचे मनोगत . . .

▪ “इतिहासाची पुस्तकं वाचताना मला जाणीव झाली की राजांनी व अधिकाराच्या पदांवर असलेल्या शासकांनी नेहमीच गरीब लोकांचे शोषण केले आहे. या गोरगरिबांना सहन करावे लागणारे दुःख मी समजू शकलो. हा अन्याय कधी आणि कसा संपुष्टात येईल याचा विचार करता करता मी या निष्कर्षावर आलो की आपल्याला त्याकरता लढावे लागेल, बंदुकांना बंदुकींनीच प्रत्युत्तर द्यावे लागेल.”—रामोन. *

▪ “मी सशस्त्र संघर्षात सामील होतो. जुन्या शासनाला आव्हान करून कोणतेही भेदभाव नसतील असा मानव समाज निर्माण करायचे माझे ध्येय होते.”—लुसियन.

▪ “लहानपणापासूनच मला अन्याय पाहून चीड येई. गरिबी, गुन्हेगारी, निकृष्ट दर्जाचे शिक्षण आणि गरिबांना चांगला औषधोपचार मिळत नाही हे पाहून मी अस्वस्थ होई. मला वाटायचे की शस्त्रांचा धाक दाखवून सर्वजण चांगले शिक्षण, औषधोपचार, घर व नोकरी मिळवू शकतात. आणि जर एखादा नीट वागत नसेल, दुसऱ्‍यांचा आदर करत नसेल तर त्याला शिक्षा ही दिलीच पाहिजे असेही मला वाटे.”—पीटर.

▪ “आम्ही दोघेही नवराबायको एका गुप्त संघटनेचे सभासद होतो. ही संघटना हिंसाचाराच्या मार्गाने विद्रोह करण्याच्या मताचा पुरस्कार करणारी होती. आम्ही असे सरकार स्थापन करू इच्छित होतो की जे लोकांच्या कल्याणाकरता कार्य करेल, समाजात सुव्यवस्था आणेल आणि सर्वांना समान हक्क मिळवून देईल. आमचे असे मत होते की आमच्या देशात न्याय मिळवण्याकरता सरकारविरोधी कारवायांना पर्याय नाही.”—लुरदेस.

या सर्वांनी दुःख सोसणाऱ्‍या मानवांना शक्‍तीच्या बळावर साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. पण यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केल्यानंतर त्यांना जाणीव झाली की देवाच्या वचनात याहीपेक्षा चांगला असा एक मार्ग सुचवला आहे. बायबलमधील याकोब १:२० सांगते: “माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही.”

केवळ देवाचे शासनच मानव समाजाला बदलू शकते. मत्तय अध्याय २४ व २ तीमथ्य ३:१-५ यात नोंदलेल्या बायबलच्या भविष्यवाण्या दाखवतात की देवाचे सरकार लवकरच अगदी हेच करणार आहे. यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करून तुम्ही स्वतः या सत्यांची खात्री करून घ्यावी असे प्रोत्साहन आम्ही देऊ इच्छितो.

[तळटीप]

^ परि. 19 नावे बदलली आहेत.