व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

मनोविकार—समज-गैरसमज

मनोविकार—समज-गैरसमज

क्लॉडीया नावाच्या एका स्त्रीला नुकतंच समजलं होतं, की तिला बायपोलार डिसऑर्डर आणि पोस्ट-ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर नावाचे मनोविकार आहेत. ती म्हणते: “ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आयुष्यभर मनोरुग्णाचा शिक्का घेऊन जगण्याची कल्पनाच सहन होत नव्हती.”

क्लॉडीयाचा पती, मार्क म्हणतो: “ही गोष्ट स्वीकारणं आम्हाला खूप जड गेलं. पण, या क्षणी तिला माझ्या आधाराची सगळ्यात जास्त गरज आहे याची मला जाणीव झाली.”

तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला एखादा मनोविकार झाला आहे असं समजल्यास तुम्हालाही असंच वाटू शकतं. पण, मानसिक आजार औषधोपचारानं बरा होऊ शकतो हे ऐकून खूप दिलासा मिळतो. आता आपण मानसिक विकारासंबंधी काही महत्त्वपूर्ण गोष्टींचे परीक्षण करू या. त्यामुळं या विकाराबद्दल आपल्याला आणखी चांगली समज मिळेल. *

अहवाल काय सांगतो

“मनोविकार जगभरातील कोट्यवधी लोकांवर घाला घालतो आणि याचा त्यांच्या जवळच्या लोकांवरही प्रचंड ताण पडतो. चारपैकी एका माणसाला आयुष्यात कधी ना कधी मनोविकार जडतो. जगात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या विकाराचं एक मुख्य कारण म्हणजे नैराश्य. स्किझोफ्रेनिया आणि बायपोलार डिसऑर्डर हे सगळ्यात तीव्र स्वरूपाचे विकार असून यांमुळं रुग्णाला दैनंदिन जीवनातली कामं करणं अत्यंत जड जातं. . . . असंख्य लोक मनोविकाराचे शिकार बनत असले, तरी वस्तुस्थिती ही आहे की हा विकार लपवला जातो, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि समाज त्याकडे कलंकित नजरेनं पाहतो.”—जागतिक आरोग्य संघटना.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या अहवालानुसार, मानसिक आजाराच्या कलंकामुळं अनेक रुग्ण उपचारच घेत नाहीत.

बरेच मनोविकार औषधोपचारानं बरे होत असले, तरी अमेरिकेत गेल्या वर्षी मनोविकार झालेल्या सुमारे ६० टक्के प्रौढांना आणि ८ ते १५ वयोगटातील जवळजवळ ५० टक्के युवकांना उपचार मिळाला नाही, असा नॅशनल अलायन्स ऑन मेन्टल इलनेसचा अहवाल सांगतो.

मनोविकार म्हणजे काय?

तज्ज्ञांच्या मते मनोविकार म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन बिघडणं. यामुळं एका व्यक्तीला इतर लोकांशी जमवून घ्यायला आणि रोजची कामं करायला कठीण जातं.

मनोविकार हा एखाद्या व्यक्तीमधील दुर्बलतेमुळं किंवा स्वभाव-दोषामुळं होत नाही

मनोविकाराच्या लक्षणांचा कालावधी व तीव्रता व्यक्तीनुसार, तिच्या आजारानुसार व परिस्थितीनुसार कमी-जास्त असू शकते. हा आजार स्त्री-पुरुष, लहानमोठे, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीमध्ये काही दुर्बलता आहे किंवा तिच्या स्वभावात दोष आहे म्हणून हा आजार होतो असं नाही. उचित उपचार घेतल्यास व्यक्ती बरी होऊ शकते आणि आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगू शकते.

कसा कराल सामना?

तज्ज्ञांच्या मदतीनं तुम्ही यशस्वीपणे मनोविकारावर मात करू शकता. तेव्हा, सगळ्यात आधी अनुभवी मनोविकार तज्ज्ञाकडून आपल्या आजाराचं अचूक निदान करून घ्या.

त्यासोबतच उचित उपचार घेणंही गरजेचं आहे. त्यासाठी, कदाचित तुम्हाला आपल्या मानसिक आजाराबद्दल इतरांशी मनमोकळेपणानं बोलावं लागेल. तुम्ही अनुभवी तज्ज्ञांशी बोललात तर ते तुम्हाला तुमचा आजार समजून घेण्यास, तुमची रोजची कामं सुरळीतपणे करण्यास आणि काहीही झालं तरी उपचार चालू ठेवण्यास मदत करू शकतात. मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेताना एखाद्या कौटुंबिक सदस्यानं किंवा मित्रानं रुग्णाच्या पाठीशी राहून त्याला आधार दिला तर त्याला खूप मदत होऊ शकते.

आपल्या आजाराबद्दल पुरेशी माहिती घेतल्यानं आणि मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलेला उपचार घेत राहिल्यानं, अनेकांना मनोविकाराचा सामना करणं शक्य झालं आहे. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेला मार्क म्हणतो: “माझ्या पत्नीच्या आजाराचं निदान होण्याआधी मानसिक आजारांबद्दल आम्हाला फारशी माहिती नव्हती. पण हळूहळू आम्ही येईल त्या परिस्थितीचा सामना करण्यास आणि तिच्याशी जुळवून घेण्यास शिकलो. चांगल्या तज्ज्ञांची, कुटुंबाची आणि मित्रांची जी साथ मिळाली तिचा आम्हाला नक्कीच फायदा झाला.”

सगळ्यात आधी अनुभवी मनोविकार तज्ज्ञाकडून आपल्या आजाराचं अचूक निदान करून घ्या

क्लॉडीयासुद्धा तेच म्हणते: “सुरुवातीला मला वाटलं जणू माझे पंखच छाटले गेले. माझ्या आजारामुळं आम्हा दोघांवर बऱ्याच मर्यादा आल्या तरी एक गोष्ट मात्र मी शिकले; ती म्हणजे, आयुष्यात येणारे अडथळे डोंगरासारखे वाटत असले, तरी त्यांवर मात करणं शक्य आहे. त्यामुळं तज्ज्ञांनी, डॉक्टरांनी सुचवलेला उपचार स्वीकारल्यानं, सगळ्यांशी मिळूनमिसळून राहिल्यानं आणि येईल त्या समस्येचा धीरानं सामना केल्यानं मी माझ्या आजाराला तोंड देऊ शकते.”

आध्यात्मिक आरोग्य जास्त महत्त्वाचं

आध्यात्मिकतेमुळं आजार बरे होऊ शकतात असं बायबल सांगत नाही. पण, बायबल जे काही शिकवतं त्यातून जगभरातील अनेक कुटुंबांना सांत्वन आणि बळ मिळालं आहे. उदाहरणार्थ, बायबल आपल्याला असं आश्वासन देतं, की जे मनानं खचले आहेत, जे निराश आहेत अशांना आपला प्रेमळ सृष्टिकर्ता धीर देतो.—स्तोत्र ३४:१८.

बायबल हे आरोग्याचं पुस्तक नसलं, तरी वेदनादायक भावनांचा व दु:खद परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते व्यावहारिक मदत पुरवतं. त्यात भविष्यासाठीदेखील आशा देण्यात आली आहे. ते अशा एका काळाविषयी सांगतं जेव्हा पृथ्वीवर रोगराई आणि दुःख यांचं नामोनिशाणही उरणार नाही. ते असं अभिवचन देतं: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”—यशया ३५:५, ६. (g14-E 12)

^ परि. 5 या लेखात, “मनोविकार” यामध्ये मानसिक आजार व वर्तन विकार यांचाही समावेश करण्यात आला आहे.

^ परि. 32 मनोविकारासाठी अमुक-अमुक उपचार घ्या अशी शिफारस सावध राहा! करत नाही. उपचार घेताना ख्रिश्चनांनी याची काळजी घेतली पाहिजे की ते जो उपचार घेतात तो बायबल तत्त्वांच्या विरोधात नाही.