व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एक सुनियोजित मोहीम यशस्वी ठरली

एक सुनियोजित मोहीम यशस्वी ठरली

मारीया ईझाबेल ही एक लहानशी मुलगी दक्षिण अमेरिकेच्या चिली देशातील सॅन बर्नार्डो या शहरात राहते. ती एक आवेशी प्रचारक आहे. ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य स्थानिक मापुची वंशाचे आहेत. हे संपूर्ण कुटुंब मापुची भाषेत जिला मापुडुंगुन देखील म्हणतात, एक नवी मंडळी सुरू करण्याच्या कार्याला मोठ्या उत्साहाने हातभार लावत होते.

ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी मापुडुंगुन भाषेतही साजरा केला जाणार असल्याची आणि त्या भाषेत स्मारकविधीच्या २,००० आमंत्रण पत्रिका उपलब्ध असल्याची घोषणा करण्यात आली तेव्हा मारीया विचार करण्यास प्रवृत्त झाली. या पत्रिकांचे वाटप करण्यात ती कशा प्रकारे मदत करू शकेल? तिला अशा इतर साक्षीदार मुलामुलींचे अनुभव आठवले ज्यांनी आपल्या वर्गमित्रांना व शिक्षकांना यशस्वी रीत्या साक्ष दिली होती. ती याविषयी आपल्या आईबाबांशी बोलली, आणि ही आमंत्रण पत्रिका शाळेत कशा प्रकारे वाटता येईल याविषयी मारीया ईझाबेल हिने विचार करावा असे सर्वांनी ठरवले. तर मग तिने कोणती योजना केली?

सर्वात पहिले तिने शाळेच्या अधिकाऱ्‍यांकडून, ही आमंत्रण पत्रिका शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्याची परवानगी मागितली. त्यांनी तिची ही विनंती मान्य केली आणि तिने अशा प्रकारे पुढाकार घेतल्याबद्दल तिचे कौतुक केले. एके दिवशी सकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेते वेळी, शाळेच्या प्रिंसीपलने या आमंत्रणाविषयी लाऊडस्पिकरवरून घोषणाही केली.

त्यानंतर मारीयाने तिच्या शिक्षकांकडून प्रत्येक वर्गात जाण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर तिने प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना त्यांच्यापैकी कोणी मापुची आहेत का असे विचारले. ती म्हणते, “मला वाटलं संपूर्ण शाळेत मापुची कुटुंबांतील जास्तीत जास्त १० किंवा १५ विद्यार्थी असतील, पण त्यापेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थी होते. मी एकूण १५० आमंत्रण पत्रिका वाटल्या!”

“कोणीतरी मोठं असेल असं तिला वाटलं होतं”

एका स्त्रीने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेली आमंत्रण पत्रिका पाहिली. त्या कार्यक्रमाविषयी कोणाकडून माहिती मिळू शकेल असे तिने विचारले. तिला जेव्हा एका दहा वर्षांच्या मुलीकडे पाठवण्यात आले तेव्हा तिला किती आश्‍चर्य वाटले असेल याची कल्पना करा! मारीया ईझाबेल हसत म्हणते, “कोणीतरी मोठं असेल असं तिला वाटलं होतं.” मारीया ईझाबेलने या स्त्रीला आमंत्रण पत्रिका दिली व थोड्या शब्दांत माहिती दिली. त्यानंतर तिने त्या स्त्रीचा पत्ता घेतला जेणेकरून ती व तिचे आईबाबा देवाच्या राज्याविषयी आणखी माहिती देण्यास तिला भेटू शकतील. स्मारकविधीला ती स्त्री व २६ इतर आस्थेवाईक मापुची लोक उपस्थित राहिल्याचे पाहून मापुडुंगुन भाषेच्या क्षेत्रात सेवा करणाऱ्‍या २० प्रचारकांना अतिशय आनंद झाला. तो गट आता एक मंडळी बनली आहे आणि तिच्या सदस्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे!

तुमचे वय कितीही असो, तुम्ही तुमच्या वर्गसोबत्यांना किंवा सोबत काम करणाऱ्‍यांना स्मारकविधीचे, एखाद्या जाहीर भाषणाचे किंवा एखाद्या प्रांतीय अधिवेशनाचे आमंत्रण देण्यात मारीया ईझाबेलप्रमाणे पुढाकार घेऊ शकता का? तुम्ही आपल्या प्रकाशनांतून असे अनुभव शोधून काढू शकता ज्यांमुळे अशी योजना कशा प्रकारे यशस्वी करता येईल याविषयीच्या अनेक कल्पना तुम्हाला सुचतील. तसेच, यहोवाविषयी धैर्याने सांगता यावे म्हणून पवित्र आत्म्यासाठी त्याला प्रार्थना करा. (लूक ११:१३) असे केल्यास, तुमच्या सुनियोजित प्रयत्नांमुळे जे चांगले परिणाम मिळतील ते पाहून तुम्हालादेखील आश्‍चर्य वाटेल व खूप प्रोत्साहन मिळेल.