व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

लहानपणी घेतलेला एक निर्णय

लहानपणी घेतलेला एक निर्णय

लहानपणी

१९८५ साली मी दहा वर्षांचा असताना अमेरिकेतील ओहायो राज्यातील कलंबस इथं माझ्या शाळेत कंबोडियाची काही मुलं शिकायला आली. त्यांच्यापैकी एका मुलाला इंग्रजीचे दोन-चार शब्द येत होते. तो मुलगा मला चित्रांच्या साहाय्यानं कंबोडियात घडलेल्या भयानक घटनांविषयी सांगू लागला; कशा प्रकारे तिथं लोकांचा छळ करण्यात आला, त्यांना ठार मारण्यात आलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी लोकांनी कशा प्रकारे पलायन केलं याविषयी तो मला सांगायचा. रात्री झोपताना मला या मुलांची आठवण व्हायची तेव्हा मी अक्षरशः रडायचो. देव पृथ्वीवर नंदनवन आणणार आहे आणि मृतांना पुन्हा जिवंत करणार आहे हे मला त्या मुलांना सांगावंसं वाटायचं, पण त्यांना माझी भाषा समजत नव्हती. त्यामुळं, माझ्या या शाळासोबत्यांना यहोवाबद्दल सांगता यावं म्हणून मी त्या लहान वयातच कंबोडियन भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं माझ्या भविष्याला आकार मिळणार आहे याची त्या वेळी मला कल्पना नव्हती.

कंबोडियन भाषा शिकून घेणं मला अवघड गेलं. दोन वेळा तर मी प्रयत्नच सोडून द्यायचा असं ठरवलं, पण माझ्या आईबाबांच्या द्वारे यहोवानं मला प्रोत्साहन दिलं. कालांतरानं माझ्या शाळेतले शिक्षक आणि सोबती मला भरपूर पैसा मिळवता येईल असं करियर निवडण्याचा आग्रह करू लागले. पण मला पायनियर बनायचं होतं. त्यामुळं, मी अशा प्रकारचे कोर्स निवडले ज्यांमुळं माझं हे ध्येय गाठण्यासाठी मला अर्धवेळेचं काम मिळवता येईल. शाळेनंतर दररोज मी काही पायनियरांसोबत सेवाकार्याला जायचो. तसंच, ज्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी ही पर्यायी भाषा म्हणून निवडली होती त्यांना मोफत शिकवणी देण्यासही मी सुरुवात केली—याचा पुढं मला खूप फायदा झाला.

मी १६ वर्षांचा होतो तेव्हा मला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये लाँग बीच इथं असलेल्या एका कंबोडियन भाषिक गटाविषयी माहिती मिळाली. मी या गटाला भेटी दिली आणि कंबोडियन भाषा वाचायला शिकलो. बारावी झाल्यावर लगेच मी पायनियर सेवा सुरू केली आणि माझ्या घराजवळ राहणाऱ्या कंबोडियन लोकांना प्रचार करू लागलो. १८ वर्षांचा होईस्तोवर माझ्या मनात कंबोडियालाच जाऊन राहण्याचा विचार घोळू लागला होता. कंबोडिया अजूनही एक सुरक्षित ठिकाण नव्हतं, पण, तिथं राहणाऱ्या एक कोटी लोकांपैकी फारच कमी लोकांना आजवर देवाच्या राज्याची सुवार्ता ऐकण्याची संधी मिळाली आहे हे मला माहीत होतं. त्या वेळी संपूर्ण कंबोडियात १३ प्रचारक असलेली फक्त एकच मंडळी होती. मी १९ वर्षांचा असताना पहिल्यांदा कंबोडियाला गेलो. दोन वर्षांनंतर मी तिथंच जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. सेवाकार्य करत असताना स्वतःचा खर्च चालवण्यासाठी मी इंग्रजी भाषा शिकवण्याचं व अनुवाद करण्याचं अर्धवेळेचं काम करू लागलो. काही काळानंतर माझं लग्न एका अशा मुलीशी झालं जिची ध्येयं माझ्यासारखीच होती. आम्ही दोघांनी मिळून अनेक कंबोडियन लोकांना आपले जीवन देवाला समर्पित करण्यास मदत करण्याचा आनंद अनुभवला आहे.

यहोवानं माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. (स्तो. ३७:४) लोकांना यहोवाबद्दल शिकवणं हे कोणत्याही करियरपेक्षा जास्त समाधानदायक कार्य आहे. मी कंबोडियात घालवलेल्या १६ वर्षांदरम्यान, १३ प्रचारकांच्या त्या लहानशा मंडळीत वाढ होऊन आता यहोवाच्या साक्षीदारांच्या १२ मंडळ्या आणि ४ गट स्थापन झाले आहेत!—जेसन ब्लॅक्वेल यांच्याद्वारे कथित.