व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमची किशोरवयीन मुले तुमच्या धार्मिक विश्‍वासावर प्रश्‍न करतात तेव्हा . . .

तुमची किशोरवयीन मुले तुमच्या धार्मिक विश्‍वासावर प्रश्‍न करतात तेव्हा . . .

कौटुंबिक सौख्यानंदाच्या गुरुकिल्ल्या

तुमची किशोरवयीन मुले तुमच्या धार्मिक विश्‍वासावर प्रश्‍न करतात तेव्हा . . .

बरीच किशोरवयीन मुले आपल्या पालकांचा धर्म स्वीकारतात. (२ तीमथ्य ३:१४) पण सगळेच असे करत नाहीत. तुमच्या मुलाने तुमच्या धार्मिक विश्‍वासावर शंका व्यक्‍त केल्यास तुम्ही काय करू शकता? यहोवाचे साक्षीदार या आव्हानाला कसे सामोरे जातात त्याबद्दल आपण या लेखात पाहू.

“मला माझ्या आईवडिलांचा धर्म पाळायचा नाहीये. मला तो सोडून द्यायचाय.”—कॅथी, १८. *

तुमचा धर्म देवाबद्दल सत्य शिकवतो या गोष्टीची तुम्हाला खातरी आहे. बायबलच जीवनाच्या सर्वोत्तम मार्गाविषयी सांगते यावर तुमचा विश्‍वास आहे. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की तुम्ही तुमची मूल्ये तुमच्या मुलांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न कराल. (अनुवाद ६:६, ७) पण जसजसा तुमचा मुलगा मोठा होत जातो तसतशी आध्यात्मिक गोष्टींमध्ये त्याची रुची कमी होत असेल तर काय? * लहान असताना जी मूल्ये त्याने स्वीकारली होती आता त्याच मूल्यांवर जर तो शंका व्यक्‍त करत असेल तर काय?—गलतीकर ५:७.

असे जर होत असेल, तर ख्रिस्ती पालक म्हणून मुलांना वाढवण्यात तुम्ही अपयशी झाला आहात असे समजू नका. यासाठी इतर गोष्टीही कारणीभूत असतील ज्यांविषयी आपण पाहणार आहोत. पण एक लक्षात असू द्या: तुमच्या धार्मिक विश्‍वासावर तुमच्या किशोरवयीन मुलाने केलेले प्रश्‍न तुम्ही ज्या प्रकारे हाताळाल, त्यावरून एकतर तो तुमच्या विश्‍वासाच्या आणखी जवळ येईल किंवा त्यापासून दूर जाईल. या विषयावर जर तुम्ही सतत त्याच्याशी वाद घालत राहिलात, तर वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होईल आणि त्यात तुमचीच हार होण्याची शक्यता आहे.—कलस्सैकर ३:२१.

त्यापेक्षा प्रेषित पौलाच्या ताकिदीकडे लक्ष देणे जास्त फायदेकारक ठरेल. त्याने लिहिले: “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील” असावे. (२ तीमथ्य २:२४) तुमच्या किशोरवयीन मुलाने तुमच्या विश्‍वासाबद्दल शंका व्यक्‍त केल्यास तुम्ही “शिकवण्यात निपुण” आहात हे कसे दाखवू शकता?

समजबुद्धी दाखवा

सर्वात आधी, तुमच्या किशोरवयीन मुलाचा असा दृष्टिकोन का झाला आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ:

त्याला ख्रिस्ती मंडळीत एकटे वाटते का आणि त्याला मंडळीत कोणी मित्र नाहीत का? “मला मित्र हवे होते त्यामुळे मी शाळेत अनेक मित्र बनवले. पण या वाईट संगतीचा माझ्या आध्यात्मिकतेवर परिणाम झाला आणि अनेक वर्षे मी देवापासून दूर राहिले. आता मला त्याचा पस्तावा होतो.”—रूथ, १९.

त्याच्यात आत्मविश्‍वासाची कमी आहे का, ज्यामुळे तो त्याचे धार्मिक विश्‍वास इतरांना सांगण्यास कचरतो? “मी शाळेत असताना माझ्या वर्गसोबत्यांना माझा विश्‍वास सांगायला कचरायचो. ते मला विचित्र किंवा ‘अतिधार्मिक’ म्हणतील याची मला भीती होती. कुठलाही मुलगा जो वेगळा आहे त्याला सगळे नापसंत करायचे आणि माझ्यासोबत तसं व्हावं अशी माझी मुळीच इच्छा नव्हती.”—राहूल, २३.

ख्रिस्ती स्तरांनुसार जगण्याची जबाबदारी त्याला न पेलणारी वाटते का? “मला असं वाटतं की बायबलमध्ये दिलेली सार्वकालिक जीवनाची आशा एका मोठ्या शिडीच्या सर्वात वरच्या पायरीवर आहे आणि मी तर त्या शिडीवरच्या पहिल्या पायरीवरही नाही, मी त्यापासून खूप दूर आहे. मला त्या शिडीची इतकी भीती वाटते की मला हा धर्मच सोडून द्यावासा वाटतो.”—रिया, १६.

संवाद साधा

तुमच्या किशोरवयीन मुलासमोर कोणते आव्हान असेल? हे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याला विचारणे. पण असे करत असताना तुमच्या संभाषणाचे रूपांतर वादात होऊ नये याची खबरदारी बाळगा. त्याऐवजी याकोब १:१९ मध्ये दिलेला सल्ला पाळा: “ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद” असा. त्याच्यासोबत बोलताना धीर धरा. तुम्ही कुटुंबाबाहेरच्या व्यक्‍तीशी बोलता त्याचप्रमाणे तुमच्या मुलाशीही “सर्व प्रकारच्या सहनशीलतेने” व कुशलतेने संवाद साधा.—२ तीमथ्य ४:२.

उदाहरणार्थ, जर तुमच्या किशोरवयीन मुलाला ख्रिस्ती सभांना यायची इच्छा होत नसेल तर कोणती गोष्ट यास कारणीभूत आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. पण असे करत असताना धीर धरा. पुढे जो संवाद दिला आहे त्यानुसार जर तुम्ही बोलला तर त्यातून काहीच निष्पन्‍न होणार नाही.

मुलगा: मला सभांना जायला आता मुळीच आवडत नाही.

वडील: [रागाच्या सुरात] आवडत नाही म्हणजे काय?

मुलगा: मला त्या कंटाळवाण्या वाटतात.

वडील: असं बोलायला लाज नाही वाटत? तुला काय देव कंटाळवाणा वाटतो? हे मुळीच चालणार नाही, जोपर्यंत तू या घरात आहे तोपर्यंत तुला आमच्यासोबत यावंच लागेल, तुला ते आवडो अगर न आवडो.

देव अशी अपेक्षा करतो की पालकांनी आपल्या मुलांना त्याच्याबद्दल शिकवावे आणि मुलांनीही त्यांचे ऐकावे. (इफिसकर ६:१) पण तुमच्या मुलाने डोळे झाकून तुमचे धार्मिक मूल्य स्वीकारावे व बळजबरीने तुमच्यासोबत ख्रिस्ती सभांना यावे अशी तुमची मुळीच इच्छा नसेल. तर त्याने मनापासून देवाविषयी शिकावे व त्याच्यावर प्रेम करावे अशी तुमची इच्छा असेल.

मुलाचा असा दृष्टिकोन का झाला याचे कारण ओळखल्यास तुम्ही त्याला मनापासून देवाविषयी शिकण्यास व त्याच्यावर प्रेम करण्यास मदत करू शकाल. ते कारण लक्षात ठेवून वरील संवाद प्रभावीपणे कसा करता आला असता ते पाहा.

मुलगा: मला सभांना जायला आता मुळीच आवडत नाही.

वडील: [शांतपणे] तुला असं का वाटतं बेटा?

मुलगा: मला त्या फार कंटाळवाण्या वाटतात.

वडील: मी समजू शकतो, दीड-दोन तास सभांमध्ये बसनं कंटाळवानं वाटू शकतं. पण, नेमकं कशामुळे तुला असं वाटतं?

मुलगा: माहीत नाही. मला वाटतं मी कुठं दुसरीकडे असायला हवं.

वडील: तुझ्या मित्रांनाही असंच वाटतं का?

मुलगा: तोच तर माझा प्रॉब्लेम आहे. मला मंडळीत मित्रच नाहीत, निदान आत्तातरी नाहीत. माझा बेस्ट फ्रेंड मंडळीतून गेल्यावर मला मित्रच नाहीत, माझ्याबरोबर कोणीच बोलत नाही! इतर सगळ्यांना मित्र आहेत, मला खूप एकटं वाटतं.

अशा प्रकारे संवाद साधल्यामुळे वडील मुलाची समस्या—या उदाहरणात, एकटेपणा—तर समजून घेतातच, त्यासोबतच त्याचा भरवसाही जिंकतात, ज्यामुळे पुढील संवादासाठीही मार्ग खुला होतो. याच पानावरील  “धीर धरा!” ही चौकट पाहा.

वेळेसोबत बरीच किशोरवयीन मुले हे अनुभवतात की त्यांनी जर आध्यात्मिक प्रगती करण्यापासून रोखणाऱ्‍या गोष्टींवर मात केली, तर त्यांचा स्वतःबद्दल त्यांच्या धार्मिक विश्‍वासांबद्दल आत्मविश्‍वास वाढतो. आधी उल्लेख केलेल्या राहूलचाच विचार करा. आपण एक ख्रिस्ती आहोत हे शाळेत इतरांना सांगायची त्याला पूर्वी खूप भीती वाटायची. नंतर राहूलला जाणवले की स्वतःच्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगणे जितके तो समजत होता तितकेपण भीतीदायक नाही—अगदी आपली थट्टा केली गेली तरीही. तो सांगतो:

“एकदा माझ्या शाळेतला मुलगा माझ्या धर्मावरून माझी थट्टा करत होता. मी खूप घाबरलो आणि मला जाणवलं की पूर्ण वर्ग आमचं बोलणं ऐकत आहे. नंतर मग मी त्यालाच त्याच्या धार्मिक विश्‍वासांबद्दल विचारलं. आता माझ्यापेक्षा तर तोच जास्त घाबरला! त्यामुळे मला समजलं की बरीच तरुण मुलं धर्मावर विश्‍वास तर ठेवतात पण त्यांना त्याविषयी काहीच माहीत नसतं. पण मी माझ्या विश्‍वासांबद्दल निदान बोलू तरी शकतो. खरंच, आपल्या धार्मिक विश्‍वासाबद्दल इतरांना सांगण्याची वेळ येते तेव्हा माझ्या वर्गसोबत्यांना भीती वाटायला पाहिजे, मला नाही!”

हे करून पाहा: ख्रिस्ती असल्याबद्दल तुमच्या किशोरवयीन मुलाला काय वाटते हे विचारून पाहा. त्याच्या मते, ख्रिस्ती असण्याचे कोणते फायदे आहेत? कोणती आव्हाने आहेत? ख्रिस्ती असण्याचे फायदे आव्हानांपेक्षा जास्त आहेत का? जर असतील, तर का? (मार्क १०:२९, ३०) तो एका कागदावर दोन भाग करून, डाव्या बाजूला आव्हाने व उजव्या बाजूला फायदे लिहू शकतो. अशा प्रकारे कागदावर आपले स्वतःचे मत पाहिल्यावर त्याला त्याची समस्या लक्षात येईल आणि त्यावर काय उपाय करता येईल त्याचा तो विचार करू शकेल.

तुमच्या मुलाची तर्कशक्‍ती

पालकांच्या व संशोधकांच्या असे लक्षात आले आहे की लहान मुलांच्या व किशोरवयीन मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप अंतर असते. (१ करिंथकर १३:११) लहान मुले डोळ्यांनी जे दिसते त्याचाच विचार करतात, पण किशोरवयीन मुले एखाद्या विषयाशी जुळलेल्या अप्रत्यक्ष गोष्टींचाही विचार करतात. उदाहरणार्थ, लहान मुलाला हे शिकवणे सोपे आहे की देवाने सर्व काही निर्माण केले. (उत्पत्ति १:१) पण तीच गोष्ट एखाद्या किशोरवयीन मुलाला सांगताना तो अनेक प्रश्‍न विचारू शकतो, जसे की: ‘देव अस्तित्वात आहे यावर मी कसा विश्‍वास ठेवू शकतो? प्रेम करणारा देव दुष्टाईला अनुमती का देतो? देव नेहमीच अस्तित्वात आहे हे खरे कसे असू शकते?’—स्तोत्र ९०:२.

असे प्रश्‍न ऐकल्यावर तुम्हाला कदाचित वाटेल की तुमच्या किशोरवयीन मुलाचा विश्‍वास कमी झाला आहे. पण खरे पाहता, हे त्याचा विश्‍वास वाढत असल्याचे लक्षण असू शकते. कारण प्रश्‍न विचारणे हे एका ख्रिस्ती व्यक्‍तीच्या आध्यात्मिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका निभावू शकते.—प्रेषितांची कृत्ये १७:२, ३.

तसेच, प्रश्‍न विचारण्याद्वारे तुमचा किशोरवयीन मुलगा त्याचा धार्मिक विश्‍वास “समजून” घेण्यास आणि तर्क करण्यास शिकत आहे. (रोमकर १२:१, २) त्यामुळे तो त्याच्या ख्रिस्ती विश्‍वासाची “रुंदी, लांबी, उंची व खोली,” समजून घेत आहे, जे त्याला लहान असताना करणे शक्य नव्हते. (इफिसकर ३:१८) तुमच्या मुलाला त्याच्या विश्‍वासावर तर्क करण्यास मदत करण्याची हीच वेळ आहे, ज्यामुळे त्याला त्याच्या विश्‍वासाची खातरी पटेल व त्याचा विश्‍वास आणखी दृढ होईल.—नीतिसूत्रे १४:१५; प्रेषितांची कृत्ये १७:११.

हे करून पाहा: तुमच्या किशोरवयीन मुलासोबत पुन्हा मूलभूत शिकवणींची चर्चा करा, ज्यांकडे कदाचित तुम्ही किंवा त्याने इतके लक्ष दिले नसेल. उदाहरणार्थ, त्याला पुढील प्रश्‍नांवर विचार करण्यास लावा: ‘देव अस्तित्वात आहे यावर मी का विश्‍वास ठेवतो? देव माझी काळजी करतो याचे कोणते पुरावे मला दिसतात? देवाच्या आज्ञांचे पालन करणे माझ्यासाठी नेहमीच फायदेकारक आहे असे मला का वाटते?’ असे करत असताना तुम्ही तुमची मते त्याच्यावर लादत नाही याची काळजी घ्या. त्याऐवजी त्याला स्वतःला त्याच्या विश्‍वासांची खातरी पटू द्या. असे केल्याने त्याला स्वतःचा विश्‍वास दृढ करण्यास मदत होईल.

“खातरी” पटवून द्या

बायबलमध्ये तरुण तीमथ्याचा उल्लेख करण्यात आला आहे ज्याला “बालपणापासूनच” देवाविषयीचे ज्ञान होते. तरीही, प्रेषित पौलाने त्याला असा आर्जव केला: “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरून राहा.” (२ तीमथ्य ३:१४, १५) तीमथ्यासारखेच कदाचित तुमच्या किशोरवयीन मुलालादेखील बालपणापासूनच बायबलचे शिक्षण देण्यात आले असेल. पण आता मात्र त्याच्या विश्‍वासांची खातरी पटवून देण्यास तुम्हाला त्याला मदत करावी लागेल.

क्वेश्‍चन्स यंग पीपल आस्कआन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम १, या पुस्तकात असे म्हटले आहे: “जोपर्यंत तुमची किशोरवयीन मुले तुमच्यासोबत राहतात तोपर्यंत तुम्ही त्यांना शिकवलेल्या आध्यात्मिक गोष्टींचा त्यांनी अवलंब करावा अशी तुम्ही उचितपणे अपेक्षा करू शकता. पण, त्यांनी या गोष्टी केवळ तुमच्या सांगण्यावरून कराव्यात म्हणून नव्हे, तर देवावरील प्रेमापोटी कराव्यात अशी तुमची इच्छा आहे; तेव्हा त्यांच्या मनात देवाप्रती प्रेम उत्पन्‍न करण्याचे ध्येय राखा.” हे ध्येय मनात ठेवून तुम्ही तुमच्या किशोरवयीन मुलाला त्याचा विश्‍वास “दृढ” करण्यास मदत करू शकता, जेणेकरून देवाच्या इच्छेनुसार चालणे हा फक्‍त तुमचाच नव्हे, तर त्याच्याही जीवनाचा मार्ग बनेल.—१ पेत्र ५:९. * (w१२-E ०२/०१)

[तळटीपा]

^ परि. 4 या लेखात नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 5 पूर्ण लेखात मुलाचा उल्लेख केला असला, तरी त्यातील तत्त्वे मुलींनाही तितकीच लागू होतात.

^ परि. 40 अधिक माहितीकरता, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १, २००९, पृष्ठे १०-१२ आणि क्वेश्‍चन्स यंग पीपल आस्कआन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम १, पृष्ठे ३१५-३१८ पाहा.

स्वतःला विचारा . . .

▪ माझ्या मुलाने माझ्या धार्मिक विश्‍वासावर शंका व्यक्‍त केल्यास मी कशी प्रतिक्रिया देतो?

▪ माझी प्रतिक्रिया सुधारण्यास या लेखात दिलेल्या माहितीचा उपयोग मी कसा करू शकतो?

[२३ पानांवरील चौकट]

पालक दिशाभूल करतात का?

चुकीची धारणा: जे पालक यहोवाचे साक्षीदार आहेत ते आपल्या मुलांना त्यांचा धर्म पाळण्याची बळजबरी करतात.

सत्य: बायबलच्या आज्ञेनुसार यहोवाच्या साक्षीदारांतील पालक आपल्या मुलांच्या मनात देवाप्रती प्रेम उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न करतात. (इफिसकर ६:४) पण त्यांना या गोष्टीची जाणीव असते की मुले मोठी झाल्यावर उपासनेच्या बाबतीत स्वतःच आपला निर्णय घेतील.—रोमकर १४:१२; गलतीकर ६:५.

[२४ पानांवरील चौकट/चित्र]

 धीर धरा!

तुमच्या किशोरवयीन मुलांशी बोलताना तुमच्या धीराची परीक्षा होऊ शकते. पण त्याचा नक्कीच चांगला परिणाम होईल; तो म्हणजे तुम्ही त्यांचा विश्‍वास जिंकाल. एक किशोरवयीन मुलगी सांगते: “एका रात्री माझ्या वडीलांशी बोलताना मी त्यांना सांगितलं की मी गुप्तपणे सोशल नेटवर्किंग साईटवर अकाउंट बनवलंय आणि मला एक बॉयफ्रेंडसुद्धा आहे ज्याच्यासोबत मी पळून जाण्याचा विचार करत होते. हे ऐकून ते चिडले नाहीत, उलट ते माझ्याशी अगदी शांतपणे व प्रेमळपणे बोलले! आपल्या मुलीने एका मुलाला कीस केलंय आणि त्या मुलाशी ती रात्रंदिवस बोलते हे ऐकूनही न चिडणारे वडील मी तरी पाहिले नाहीत. आता मला असं वाटतं की मी माझ्या वडिलांना काहीही सांगू शकते. मला माहीत आहे की ते खरोखर मला मदत करू इच्छितात.”

[२५ पानांवरील चौकट]

प्रौढांचा सहवास महत्त्वाचा

बऱ्‍याचदा किशोरवयीन मुलांवर कुटुंबाबाहेरील एखाद्या प्रौढ व्यक्‍तीच्या प्रोत्साहनाचा चांगला परिणाम होतो. तुम्ही अशा एखाद्या व्यक्‍तीला ओळखता का जी आध्यात्मिक रीत्या प्रौढ आहे आणि जिचा तुमच्या मुलावर चांगला प्रभाव पडू शकतो? असल्यास तुम्ही तिला तुमच्या मुलाबरोबर वेळ घालवण्यास, त्याच्याशी मैत्री करण्यास सांगू शकता. असे करण्यामागे तुमचा हेतू आपली जबाबदारी दुसऱ्‍यांवर ढकलणे हा नाही. तीमथ्याचा विचार करा. त्याला प्रेषित पौलाच्या सहवासाचा खूप फायदा झाला आणि तीमथ्याची सोबत मिळाल्यामुळे पौलालाही फायदा झाला.—फिलिप्पैकर २:२०, २२. *

[तळटीप]

^ परि. 57 ही माहिती यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या, क्वेश्‍चन्स यंग पीपल आस्क—आन्सर्स दॅट वर्क, व्हॉल्यूम १, २०११ आवृत्ती, पृष्ठ ३१८ मधून घेण्यात आली आहे.