व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या जवळ या

तो “जिवंतांचा” देव आहे

तो “जिवंतांचा” देव आहे

मृत्यू देवापेक्षा ताकदवान आहे का? मुळीच नाही! मृत्यू किंवा दुसरा कोणताही “शत्रू” “सर्वसमर्थ” देवापेक्षा ताकदवान असूच शकत नाही. (१ करिंथकर १५:२६; निर्गम ६:३) कारण मृत लोकांचे पुनरुत्थान करून म्हणजे त्यांना पुन्हा जिवंत करून मृत्यूला मुळासकट नाहीसे करण्याचे सामर्थ्य देवाजवळ आहे; आणि येणाऱ्‍या नवीन जगात नेमके हेच करण्याचे अभिवचन तो देतो. * हे अभिवचन कितपत खरे आहे? खुद्द देवाचा पुत्र, येशू आपल्याला त्याची हमी देतो आणि त्यामुळे आपल्या मनात आशा निर्माण होते.—मत्तय २२:३१, ३२ वाचा.

देव मृत लोकांना पुन्हा जिवंत करेल यावर विश्‍वास नसलेल्या सदूकी लोकांशी बोलताना येशूने म्हटले: “मृतांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुमच्या वाचनात आले नाही काय? ते असे की, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे.’ तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.” सुमारे ३,५०० वर्षांपूर्वी देवाने जळत्या झुडपासमोर मोशेशी जे संभाषण केले होते त्याचाच उल्लेख येशूने या ठिकाणी केला. (निर्गम ३: १-६) येशूच्या मते, यहोवा मोशेला जे बोलला की “मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे,” त्यावरून असे सूचित होते की पुनरुत्थानाचे अभिवचन नक्कीच पूर्ण होईल. ते कसे?

सर्वात प्रथम संदर्भ लक्षात घ्या. ज्या वेळी यहोवा मोशेशी बोलला त्या वेळी कुलपिता अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांचा मृत्यू होऊन बराच काळ लोटला होता. अब्राहामाला जाऊन ३२९ वर्षे, इसहाकाला २२४ वर्षे आणि याकोबाला १९७ वर्षे झाली होती. तरीही, ‘मी त्यांचा देव आहे’ असे यहोवाने म्हटले, ‘मी त्यांचा देव होतो’ असे त्याने म्हटले नाही. त्या तीन कुलपित्यांविषयी यहोवा अशा प्रकारे बोलला जणू काही ते अजूनही जिवंतच होते. का?

यावर आणखी खुलासा करत येशूने म्हटले: “तो [“यहोवा,” NW] मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा आहे.” या शब्दांवरून काय सूचित होते याचा विचार करा. जर पुनरुत्थानाची आशाच नसती तर अब्राहाम, इसहाक आणि याकोब कायम मृत्यूच्या मुठीत जखडून राहिले असते. तसे जर झाले असते तर यहोवा मृतांचा देव ठरला असता. आणि त्यावरून मग असे सिद्ध झाले असते की यहोवापेक्षा मृत्यूच ताकदवान आहे; जणू मृत्यूच्या विळख्यातून आपल्या विश्‍वासू सेवकांची सुटका करण्याची शक्‍तीच यहोवाकडे नाही.

तर मग अब्राहाम, इसहाक, याकोब आणि यहोवाच्या ज्या इतर विश्‍वासू सेवकांचा मृत्यू झाला त्यांच्याबद्दल आपण काय निष्कर्ष काढू शकतो? त्यांच्याबद्दल येशूने असे जोरदार विधान केले: “त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:३८) खरेतर, मरण पावलेल्या यहोवाच्या सर्व विश्‍वासू सेवकांना पुन्हा जिवंत करण्याचे त्याचे अभिवचन पूर्ण होईलच याची इतकी खातरी आहे की ते सर्व जणू जिवंतच आहेत असे यहोवाला वाटते. (रोमकर ४:१६, १७) अशा सर्व लोकांना जिवंत करण्याची वेळ येईपर्यंत यहोवा त्यांना त्याच्या अमर्याद स्मृतीकोशात जपून ठेवेल.

यहोवाजवळ मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याचे असीम सामर्थ्य आहे

मरण पावलेली तुमची एखादी प्रिय व्यक्‍ती पुन्हा जिवंत झालेली तुम्हाला पाहायची का? असल्यास, लक्षात असू द्या की यहोवाजवळ मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याचे असीम सामर्थ्य आहे. मृतांचे पुनरुत्थान करण्याचे त्याचे अभिवचन म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. तेव्हा, पुनरुत्थानाचे अभिवचन देणाऱ्‍या आणि ते पूर्ण करणाऱ्‍या देवाविषयी तुम्ही जाणून घेऊ नये का? तुम्ही जर त्याला जाणून घेतले तर तुम्ही नक्कीच “जिवंतांचा” देव असलेल्या यहोवाच्या आणखी जवळ येऊ शकाल. ▪ (w१३-E ०२/०१)

बायबल वाचन

मत्तय २२-मार्क ८

^ येणाऱ्‍या नीतिमान नवीन जगात देव मृत लोकांना पुन्हा जिवंत करण्याचे आपले अभिवचन पूर्ण कसे करेल याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय ७ पाहा.