व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रंगांचा आपल्यावर कसा परिणाम होतो?

रंगांचा आपल्यावर कसा परिणाम होतो?

आपण आजूबाजूला जे काही पाहतो त्याची माहिती गोळा करण्यासाठी आपले डोळे आणि मेंदू एकत्र कार्य करत असतात. आपण एखादे फळ पाहतो आणि ते खावे की नाही हे ठरवतो. आपण आकाशाकडे पाहतो आणि आज पाऊस येणार नाही हे ठरवून टाकतो. आपण आता जे वाचत आहोत त्यातील शब्द पाहतो आणि त्यांचा अर्थ लावतो. यावरून दिसून येते की रंगांचा आपल्यावर परिणाम होतो. खरेच?

फळाचा रंग पाहून ते पिकलेले आहे का आणि ते खावे का हे आपण ठरवतो. ढगांचा रंग पाहून आपल्याला हवामानाचा अंदाज येतो. आपण या लेखातील मजकूर वाचतो तेव्हा काळ्या-पांढऱ्या रंगांतील भिन्नता पाहून आपल्या डोळ्यांना मुळीच त्रास होत नाही. सभोवतालची माहिती गोळा करण्यासाठी आपण आपल्या नकळत रंगांचा उपयोग करत असतो. पण, रंगांचा आपल्या भावनांवरही परिणाम होतो.

रंगांचा भावनांवर होणारा परिणाम

आपण एखाद्या मोठ्या दुकानात जातो तेव्हा आपल्याला तेथे वेगवेगळ्या प्रकारे पॅक केलेल्या वस्तू दिसतात. काही वस्तू कॅन्समध्ये, काही बॉक्सेसमध्ये तर काही बॅग्जमध्ये पॅक केलेल्या दिसतात. त्या अशा रीतीने पॅक केलेल्या असतात की त्या लगेच नजरेत भरतात. आपल्या लक्षात आले असो वा नसो जाहिरातदार आपली विशिष्ट इच्छा, आपण स्त्री आहोत की पुरुष, आपले वय या गोष्टी लक्षात घेऊन रंगांचा आणि रंगसंगतीचा विचारपूर्वक उपयोग करतात. रंगांचा भावनांवर किती परिणाम होतो हे घरांची सजावट करणाऱ्यांना, कपड्यांचे डिझाइन्स करणाऱ्यांना आणि कलाकृती करणाऱ्यांनाही चांगले ठाऊक असते.

स्थानिक संस्कृती आणि रीतिरिवाजांनुसार लोक रंगांचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावतात. जसे की, आशियातील काही लोक, लाल रंग भाग्याचा आणि उत्सवाचा आहे असे मानतात; तर आफ्रिकेतील काही भागात लाल रंगाला दुःखाचा रंग समजला जातो. पण लोकांची पार्श्‍वभूमी कोणतीही असो, काही विशिष्ट रंगांचा मानवांच्या भावनांवर एकसारखाच परिणाम होतो. अशा तीन रंगांची आणि भावनांवर होणाऱ्या त्यांच्या परिणामांची या लेखात आपण चर्चा करू या.

लाल रंग चटकन नजरेत भरणारा असतो. हा रंग शक्ती, युद्ध आणि धोका या गोष्टींना सूचित करतो. या रंगाचा एखाद्या व्यक्तीच्या भावनांवर खोलवर परिणाम होतो. शिवाय, त्यामुळे पचनक्रिया व श्वसन सुधारते आणि रक्तदाब वाढतो.

बायबलमध्ये “लाल” हा शब्द ज्या इब्री शब्दातून घेतला आहे त्याचा मूळ अर्थ “रक्त” असा होतो. बायबलमध्ये एका खुनशी वेश्येचे चित्र रंगवण्यासाठी लाल भडक किंवा किरमिजी रंगाचा उपयोग करण्यात आला आहे; या वेश्येने जांभळी आणि किरमिजी रंगांची वस्त्रे घातलेली आहेत आणि ती “देवनिंदात्मक नावांनी भरलेल्या आणि . . . किरमिजी रंगाच्या श्वापदावर बसलेली” आहे.—प्रकटीकरण १७:१-६.

हिरवा या रंगाचा परिणाम लाल रंगाच्या अगदी उलट होतो. त्यामुळे पचनक्रिया कमी होत जाते आणि मन शांत होते. हिरवा रंग मनाला विसावा देणारा असून त्याचा संबंध सहसा मनःशांतीशी जोडला जातो. म्हणूनच आपण जेव्हा हिरव्यागार बागा व टेकड्या पाहतो तेव्हा आपल्याला खूप बरे वाटते. निर्मितीबद्दल उत्पत्तिच्या अहवालात सांगण्यात आले आहे की देवाने मानवांसाठी हिरवळ आणि वनस्पती उत्पन्न केली.—उत्पत्ति १:११, १२, ३०.

पांढरा रंग सहसा प्रकाश, सुरक्षा आणि स्वच्छता या गोष्टींना सूचित करतो. तसेच चांगुलपणा, निरागसपणा आणि शुद्धता या गुणांशीसुद्धा त्याचा संबंध जोडला जातो. बायबलमध्ये पांढऱ्या रंगाचा सगळ्यात जास्त वेळा उल्लेख करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, अनेक दृष्टान्तात नीतिमत्त्व आणि आध्यात्मिक शुद्धता यांवर भर देण्यासाठी मानवांना आणि देवदूतांना पांढऱ्या वेशात दाखवण्यात आले आहे. (योहान २०:१२; प्रकटीकरण ३:४; ७:९, १३, १४) पांढरे घोडे आणि पांढरी व शुद्ध तागाची तलम वस्त्रे घातलेले घोडेस्वार नीतिमत्त्वाच्या युद्धाला चित्रित  करतात. (प्रकटीकरण १९:१४) तसेच, देव आपले पाप क्षमा करण्यास तयार आहे यावर भर देण्यासाठी तो पांढऱ्या रंगाचा उपयोग करतो. तो म्हणतो: “तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील.”—यशया १:१८.

रंगांमुळे गोष्टी लक्षात राहतात

बायबलमध्ये रंगांचा ज्या प्रकारे उपयोग करण्यात आला आहे त्यावरून त्यांचा मानवांवर काय परिणाम होतो याची देवाला पुरेपूर समज असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, बायबलमधील प्रकटीकरणाच्या पुस्तकात, मानवजात सध्या ज्या गोष्टींना तोंड देत आहे त्यांबद्दल सांगण्यात आले आहे; जसे की युद्धे, दुष्काळ, उपासमारीमुळे होणारा मृत्यू आणि आजार. हे समजण्यासाठी त्या पुस्तकात एका विलक्षण दृष्टान्ताचा उपयोग करण्यात आला आहे व त्यात सुरुवातीला काही घोडेस्वारांविषयी सांगण्यात आले आहे; हे घोडेस्वार साध्यासुध्या नव्हे, तर वेगवेगळ्या रंगांच्या घोड्यांवर बसलेले आहेत.

सर्वात प्रथम, एक पांढरा शुभ्र घोडा दाखवण्यात आला आहे, जो येशू ख्रिस्ताच्या नीतिमान युद्धाला चित्रित करतो. पुढे आपण लाल भडक रंगाचा घोडा पाहतो, जो राष्ट्रा-राष्ट्रांत होणाऱ्या युद्धाला चित्रित करतो. लाल घोड्याच्या पाठोपाठ संकटाला सूचित करणारा काळा घोडा येत असल्याचे दिसते, जो दुष्काळाला चित्रित करतो. त्यानंतर, आपण “एक फिकट रंगाचा घोडा” पाहतो, जो मृत्यूला चित्रित करतो. (प्रकटीकरण ६:१-८) प्रत्येक घोड्याचा रंग आपल्या मनात अशा भावना जागृत करू शकतात ज्यांचा संबंध प्रत्येक घोड्याच्या लाक्षणिक अर्थाशी लावला जाऊ शकतो. वेगवेगळ्या रंगांचे हे घोडे व आपल्या दिवसांबद्दल ते जे काही शिकवतात ते सहजपणे आपल्या लक्षात राहू शकते.

बायबलमध्ये अशी बरीच उदाहरणे आहेत ज्यांत लक्षवेधक शब्दचित्रे रेखाटण्यासाठी रंगांचा उपयोग करण्यात आला आहे. वाचकांना सहज समजतील व लक्षात राहतील अशी शब्दचित्रे रेखाटण्यासाठी प्रकाशाचा, रंगांचा व मानवी डोळ्यांचा निर्माणकर्ता उत्कृष्टपणे रंगांचा उपयोग करतो. रंगांमुळे आपल्याला माहिती गोळा करणे व मनात तिचे विश्लेषण करणे शक्य होते. रंगांचा आपल्या भावनांवर परिणाम होतो. रंगांमुळे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात राहण्यास मदत मिळते. खरेच, रंग हे देवाकडून मिळालेली एक प्रेमळ देणगी आहे जिच्यामुळे आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो. ▪ (w13-E 10/01)