व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग २६

मानवांना नंदनवन पुन्हा मिळते!

मानवांना नंदनवन पुन्हा मिळते!

येशूच्या राज्याद्वारे, यहोवा आपल्या नावावर लावण्यात आलेला कलंक मिटवतो, केवळ आपल्यालाच विश्‍वावर आधिपत्य करण्याचा हक्क असल्याचे सिद्ध करतो आणि दुष्टाईचा समूळ नाश करतो

बायबलमधील प्रकटीकरण नावाचे शेवटचे पुस्तक, संपूर्ण मानवजातीला एक आशा देते. प्रेषित योहानाने लिहिलेल्या या पुस्तकात, यहोवाच्या उद्देशाच्या पूर्णतेपर्यंत वाटचाल करणाऱ्‍या भविष्यातील घटनांचे अनेक दृष्टान्तांतून वर्णन करण्यात आले आहे.

पहिल्या दृष्टान्तात, पुनरुत्थान करण्यात आलेला येशू काही मंडळ्यांच्या चांगल्या कृत्यांची प्रशंसा करतो आणि त्याचवेळी त्यांच्यामधील दोषही त्यांच्या लक्षात आणून देतो. पुढील दृष्टान्तात आपल्याला देवाच्या स्वर्गीय सिंहासनाचे दृश्‍य दिसते, जेथे आत्मिक प्राणी देवाची स्तुती करत असतात.

यानंतर कोकऱ्‍याला म्हणजे येशू ख्रिस्ताला, सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी देण्यात येते. पहिले चार शिक्के उघडल्यावर, लाक्षणिक घोडेस्वार दृष्टीस पडतात. पांढऱ्‍या घोड्यावरचा राजमुकुट घातलेला पहिला घोडेस्वार येशू आहे. त्याच्या पाठोपाठ, वेगवेगळ्या रंगांच्या घोड्यांवर आणखी घोडेस्वार येतात. हे भविष्यात म्हणजे जगाच्या शेवटल्या दिवसांत घडणार असलेली युद्धे, दुष्काळ आणि प्राणघातक रोग यांना सूचित करतात. सातवा शिक्का उघडल्यावर, देवाच्या न्यायदंडांची घोषणा दर्शवण्यासाठी सात लाक्षणिक कर्णे वाजवण्यात येतात. त्यानंतर, सात लाक्षणिक पीडा येतात, ज्या देवाच्या क्रोधाला सूचित करतात.

एका पुत्र संतानाचा जन्म होतो. हे स्वर्गात देवाचे राज्य स्थापन होण्यास सूचित करते. स्वर्गात लढाई होते आणि सैतान व त्याच्या दुरात्म्यांना पृथ्वीवर टाकले जाते. ‘पृथ्वीवर अनर्थ ओढवला आहे,’ अशी मोठ्या आवाजात घोषणा ऐकू येते. आपल्याजवळ कमी वेळ उरला आहे हे माहीत असल्याने दियाबल सैतान अत्यंत क्रोधित होतो.—प्रकटीकरण १२:१२.

कोकऱ्‍यासारख्या चित्रित केलेल्या येशूला आणि त्याच्यासोबत मानवजातीतून निवडलेल्या १,४४,००० जणांना योहान स्वर्गात पाहतो. हे लोक येशूसोबत राजे म्हणून “राज्य करितील.” अशा प्रकारे, प्रतिज्ञा केलेल्या संततीचा दुय्यम भाग बनणाऱ्‍या सदस्यांची संख्या १,४४,००० असल्याचे प्रकटीकरणाचे पुस्तक दाखवते.—प्रकटीकरण १४:१; २०:६.

पृथ्वीवरील राजे हर्मगिदोनासाठी म्हणजे, “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी” एकत्र येतात. ते स्वर्गीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्‍याविरुद्ध, अर्थात पांढऱ्‍या घोड्यावर बसलेल्या येशूविरुद्ध लढाई करतात. जगातील सर्व राजांचा नाश होतो. सैतानाला बांधले जाते आणि येशू व १,४४,००० जण पृथ्वीवर “एक हजार वर्षे” राज्य करतात. हजार वर्षे संपल्यानंतर सैतानाला नाश केले जाते.—प्रकटीकरण १६:१४; २०:४.

देवाला आज्ञाधारक असणाऱ्‍या मानवांना, ख्रिस्ताच्या आणि त्याच्या सहराजांच्या शासनामुळे कशा प्रकारे फायदा होईल? योहान लिहितो: “[यहोवा] त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (प्रकटीकरण २१:४) पृथ्वी नंदनवन बनते!

अशा प्रकारे प्रकटीकरणाच्या पुस्तकात बायबलमधील संदेश पूर्ण होतो. मशीही राज्याद्वारे, यहोवाच्या नावावर लावण्यात आलेला कलंक मिटवला जातो आणि संपूर्ण विश्‍वावर आधिपत्य करण्याचा केवळ यहोवालाच अधिकार आहे हे कायमचे सिद्ध केले जाते!

प्रकटीकरण पुस्तकावर आधारित.