व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | विवाह

क्षमा का मागितली पाहिजे?

क्षमा का मागितली पाहिजे?

इतकं कठीण का?

तुम्हा दोघांत नुकतंच कडाक्याचं भांडण झालं आहे. तुम्हाला वाटतं, भांडणाला मी सुरुवात केली नव्हती, मग मी का क्षमा मागू.

तुम्ही ती गोष्ट तिथंच सोडता. पण तुमच्या दोघांतलं वातावरण अजूनही तंगच आहे. तुमच्या मनात पुन्हा विचार येतो, आधी मी क्षमा मागू का? पण, “मला क्षमा कर,” हे तीन शब्द बोलायला तुम्हाला खूप जड चाललंय.

का जड वाटतं?

गर्व. चेतन * नावाचा एक पती म्हणतो: “‘माझं चुकलं’ हे इतकं बोलतानासुद्धा जीभ जड होते कारण, आपला अहंकार मध्ये येतो.” आपल्यात फाजील गर्व असला, की आपलीदेखील चूक होती हे कबूल करायला खूप जड जातं.

दृष्टिकोन. तुम्ही म्हणाल, माझ्यामुळं भांडणाला सुरुवात झाली असेल तरच क्षमा मागणं योग्य आहे. जान्हवी नावाची पत्नी म्हणते: “माझी चूक असते तेव्हा मला, ‘माझं चुकलं मला क्षमा करा’ असं म्हणायला काही वाटत नाही. पण जेव्हा आम्ही दोघं एकमेकांना घालून-पाडून बोलतो तेव्हा मात्र क्षमा मागण्यासाठी पुढाकार घ्यायला जड जातं. म्हणजे मला म्हणायचंय, की आमच्या दोघांची चूक असताना मीच आधी का क्षमा मागितली पाहिजे?”

त्यातल्या त्यात तुम्हाला जर वाटत असेल, की पूर्ण चूक तुमच्या सोबत्याचीच आहे तर क्षमा न मागणं तुम्हाला योग्यच वाटेल. “तुमची चूक नाहीच, असं जेव्हा तुम्हाला मनापासून वाटत असतं आणि तुम्ही क्षमा मागत नाही तेव्हाच तुम्ही जणू सिद्ध करता, की तुम्ही निर्दोष आहात,” असं जयंत नावाचा पती म्हणतो.

संगोपन. कदाचित तुम्ही अशा कुटुंबात लहानाचं मोठं झाला असाल जिथं तुम्ही कधी कुणाला, ‘मला क्षमा कर’ असं बोलताना ऐकलं नसेल. त्यामुळं, तुमच्या चुका सहजासहजी कबूल करणं तुम्हाला जड जाईल. लहानपणी तुम्ही कधीच क्षमा मागितली नसल्यामुळं मोठं झाल्यावर मनापासून क्षमा मागायची तुम्हाला सवयच लागली नसेल.

हे करून पाहा

क्षमा मागणं हे, पेटलेल्या आगीवर पाणी ओतण्यासारखं आहे

तुमच्या सोबत्याचा विचार करा. तुम्हाला कुणीतरी, ‘मला क्षमा करा, माझं चुकलं’ असं म्हटलं होतं तेव्हा कसं वाटलं होतं याचा विचार करा. मग तुमच्या सोबत्यालादेखील तोच आनंद अनुभवू द्या. तुमची चूक नसली तरी, तुमच्या सोबत्याला वाईट वाटल्याबद्दल किंवा तुमच्या एखाद्या बोलण्यामुळं तो किंवा ती दुखावल्यामुळं तुम्ही त्याची/तिची क्षमा मागू शकता. या तीन शब्दांत खूप ताकद आहे. मनावर झालेली जखम या शब्दांनी बरी होऊ शकते.—बायबलचं तत्त्व: लूक ६:३१.

हरणं-जिंकणं हे सिद्ध करण्याऐवजी आपला विवाह टिकवा. क्षमा मागितल्यानं तुमची हार होत आहे असं समजण्याऐवजी, तुमचा विवाह टिकला, असं समजा. दुखावलेल्या व्यक्तीची “समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे,” असं बायबलमधील नीतिसूत्रे १८:१९ या वचनात म्हटलं आहे. तणावपूर्व वातावरणात शांती टिकवून ठेवण्यासाठी क्षमा मागणं हे कठीण वाटत असलं तरी ते अशक्य नाही. शिवाय तुम्ही जेव्हा क्षमा मागण्यात पुढाकार घेता तेव्हा वाद आणखी चिघळत नाही. थोडक्यात सांगायचं तर, तुमच्या दोघांत कोण हरलं, कोण जिंकलं हे सिद्ध करण्याऐवजी तुम्ही आपला विवाह टिकवता.—बायबलचं तत्त्व: फिलिप्पैकर २:३.

लगेच क्षमा मागा. सर्व दोष तुमचाच नसतो तेव्हा क्षमा मागणं सोपं नसतं हे खरं आहे. पण, तुमच्या सोबत्याची चूक होती त्यामुळं, तुम्हीही वाईट वागलं पाहिजे, असं नाही. तेव्हा, हळूहळू तुमच्यातील वाद नाहीसे होतील असं समजून क्षमा मागायला कचरू नका. तुम्ही क्षमा मागण्यात पुढाकार घेतला तर उद्या तुमचा सोबतीसुद्धा जर काही वाद झालाच तर क्षमा मागण्यात पुढाकार घेईल. तुम्ही जितक्यांदा क्षमा मागण्यात पुढाकार घ्याल तितक्यांदा तुम्हाला पुढच्या वेळी क्षमा मागायला सोपं वाटेल.—बायबलचं तत्त्व: मत्तय ५:२५.

क्षमा मागता तेव्हा प्रामाणिक मनानं मागा. आपल्या वागणुकीबद्दल सबबी देणं म्हणजे क्षमा मागणं नव्हे. शिवाय, क्षमा मागताना ती प्रामाणिक मनानं मागा, टोमणा मारत मागू नका. “ठीकए ठीकए, मला माफ कर, पण इतकं वाईट वाटून घ्यायची काही गरज नव्हती!” या बोलण्याला तर मुळीच क्षमा मागणं म्हणता येणार नाही. तुमचं बोलणं रास्तच होतं, असं तुम्हाला कितीही वाटलं तरी, तुमच्या वागण्यामुळं तुमच्या सोबत्याचं मन दुखावलं गेलंय, ही गोष्ट मान्य करा.

आपल्या हातून नेहमी चुका होतील, ही वस्तुस्थिती कबूल करा. आपल्या सर्वांच्या हातून चुका होतच राहतील, हे नम्रपणे कबूल करा. एखाद्या वेळेला तुम्हाला कदाचित वाटेल, की तुमची मुळीच चूक नव्हती. तेव्हा नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे, तुमच्या दोघांत जे काही झालं होतं त्याबद्दल तुम्ही सांगत असलेली तुमची बाजूच शंभर टक्के बरोबर असेल असं नाही. “सुरुवातीला बोलणारा माणूस नेहमी बरोबर आहे असे तोपर्यंत वाटत असते, जोपर्यंत कुणीतरी येऊन त्याला प्रश्न विचारत नाही.” (नीतिसूत्रे १८:१७, ईझी-टू-रीड व्हर्शन.) स्वतःबद्दल आणि स्वतःच्या चुकांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगला तर तुम्हाला क्षमा मागायला सोपं जाईल. ▪ (g15-E 09)

^ परि. 7 या लेखातली काही नावं बदलण्यात आली आहेत.