व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बाळ येशूला खरोखरच तीन मागी भेटायला आले होते का?

बाळ येशूला खरोखरच तीन मागी भेटायला आले होते का?

वाचक विचारतात

बाळ येशूला खरोखरच तीन मागी भेटायला आले होते का?

दक्षिण अमेरिका ते पूर्व युरोप आणि पूर्व युरोप ते आशियापर्यंतचे लोक, पिढ्या न्‌ पिढ्या चालत आलेल्या त्यांच्या परंपरेनुसार नाताळ सणाच्या वेळी येशूच्या जन्माचे देखावे उभे करतात. या देखाव्यांमध्ये तीन मागी लोक, बाळ येशूसाठी मौल्यवान भेटवस्तू घेऊन आल्याचे दाखवले जाते. पण, या देखाव्यांमध्ये जे दाखवले जाते तसे खरोखरच घडले होते का? बाळ येशूला खरोखरच तीन मागी भेटायला आले होते का? चला पाहुया.

मत्तय आणि लूक या दोन्ही शुभवर्तमानात येशूच्या जन्माचा इतिहास सांगितलेला आहे. या अहवालांमध्ये असे सांगितले आहे, की जवळच्या शेतांत असलेले गरीब मेंढपाळच येशूच्या जन्माच्या वेळी त्याला भेटायला आले होते. नाताळाच्या देखाव्यात तर तीन राजे अथवा बुद्धिमान पुरुषांना दाखवले जाते. वास्तविक पाहता, येशूला भेटायला आलेले लोक हे राजे नसून ज्योतिषी होते आणि बायबलमध्ये त्यांची संख्या दिलेली नाही. शिवाय हे ज्योतिषी येशूला भेटायला आले होते तेव्हा तो गव्हाणीतला नवजात बाळ नव्हता तर जरा मोठा झाला होता व एका घरात राहत होता. आणि त्यांच्या येण्यामुळे खरेतर येशूचा जीव धोक्यात आला होता.

बायबलचा लेखक लूक याने दिलेल्या येशूच्या जन्माच्या वेळेच्या वृत्तांताचे बारकाईने परीक्षण करा. त्यात तुम्हाला असे लिहिलेले आढळेल: “मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला [व] . . . त्यांना म्हणाला . . . बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल. . . . तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली.”—लूक २:८-१६.

बाळ येशूसोबत फक्‍त योसेफ, मरीया व मेंढपाळ होते. यांच्याव्यतिरिक्‍त तेथे कोणी नसल्याचे लूकच्या अहवालात सांगितले आहे.

आता आपण, मराठीतील पंडिता रमाबाई भाषांतरात मत्तय २:१-११ मधील अहवालाचे परीक्षण करू या. तेथे असे म्हटले आहे: “हेरोद राजाच्या दिवसांमध्ये यहूदीयातील बेथलहेमात येशूचा जन्म झाल्यानंतर पाहा, मागी [समासात, विद्यावान] लोक पूर्वेकडून यरूशलेमेला आले. . . . आणि त्यांनी त्या घरात जाऊन त्या बालकाला त्याची आई मरीया हिच्याजवळ पाहिले.”

या अहवालात फक्‍त “विद्यावान” लोक म्हटले आहे, “तीन विद्यावान लोक” असे म्हटले नाही. शिवाय, ते पूर्वेकडून यरुशलेमला आले असे म्हटले आहे, येशूचा जन्म झाला त्या बेथलहेम शहरात आले असे म्हटलेले नाही. ते बेथलहेमात जेव्हा आले तोपर्यंत येशू मोठा झाला होता. तो बाळ नव्हता तर एक “बालक” होता आणि गव्हाणीत नव्हे तर एका घरात होता.

पंडिता रमाबाई भाषांतरात, येशूला भेटायला आलेल्या लोकांना “विद्यावान” लोक असे म्हटले असले तरी, इतर भाषांतरांमध्ये त्यांना “मागी” किंवा “ज्योतिषी” असे म्हटले आहे. अ हॅण्डबुक ऑन द गॉस्पल ऑफ मॅथ्यू, या पुस्तकानुसार “विद्यावान” हा शब्द “मूळात, ज्योतिषशास्त्रात निपुण असलेल्या पर्शियन पंडितांना सूचित करणारे एक ग्रीक नाम आहे.” आणि, द एक्सपॅन्डेड वाईन्स एक्सपोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टमेंट वर्ड्‌स या शब्दकोशात, “विद्यावान” या शब्दाचा अर्थ, “जादूगार, चेटूक करणारा, जादुई शक्‍ती असल्याचे सोंग करणारा, मांत्रिक” असा सांगितलेला आहे.

ज्योतिषशास्त्र व तंत्रमंत्र आजही लोकप्रिय असले तरी, आपण त्यांचा वापर करू नये, अशी बायबलमध्ये सक्‍त ताकीद दिली आहे. (यशया ४७:१३-१५) कारण हे सर्व भुताटकीचे प्रकार आहेत व यहोवा देवाला यांचा वीट आहे. (अनुवाद १८:१०-१२) म्हणूनच तर देवाच्या दूताने या ज्योतिषांना येशूच्या जन्माची बातमी सांगितली नाही. परंतु, देवाने त्यांना एका स्वप्नाद्वारे, त्यांनी येशूच्या जन्माची बातमी पुन्हा दुष्ट राजा हेरोद याला जाऊन कळवू नये असे सांगितले कारण हेरोदाला येशूला ठार मारायचे होते. म्हणून मग हे ज्योतिषी, “दुसऱ्‍या मार्गाने आपल्या देशास निघून गेले.”—मत्तय २:११-१६.

नाताळ सणाच्या वेळी उभ्या केल्या जाणाऱ्‍या देखाव्यांमध्ये, येशूच्या जन्माच्या वेळी घडलेल्या सत्य घटनांचा खोटा वृत्तांत दाखवला जातो. मग खऱ्‍या ख्रिश्‍चनांना ही परंपरा पुढे चालू ठेवावीशी वाटेल का? नाही, असेच ते उत्तर देतील. (w०९-E १२/०१)