व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट धर्माचे आहेत का?

यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट धर्माचे आहेत का?

वाचक विचारतात

यहोवाचे साक्षीदार प्रोटेस्टंट धर्माचे आहेत का?

यहोवाचे साक्षीदार स्वतःला प्रोटेस्टंट समजत नाहीत. का नाही?

रोमन कॅथलिक चर्चच्या धर्मतत्त्वांमध्ये व आचारपद्धतींमध्ये सुधारणा करण्याकरता १६ व्या शतकात युरोपात प्रोटेस्टंटवाद ही चळवळ सुरु झाली. १५२९ साली, डायट ऑफ श्‍पायर येथे मार्टिन ल्यूथरच्या अनुयायांना सर्वात आधी “प्रोटेस्टंट” हे नाव पडले. तेव्हापासून, धर्मसुधारणेच्या तत्त्वांचे व ध्येयांचे समर्थन करणाऱ्‍या सर्वांना सर्वसामान्यपणे प्रोटेस्टंट असे लेखण्यात येऊ लागले. मिरियम-वेबस्टर्स कॉलेजिएट डिक्शनरीच्या ११ व्या आवृत्तीत प्रोटेस्टंटचा अर्थ असा दिला आहे: प्रोटेस्टंट चर्चचे सदस्य, केवळ पोपलाच सर्वाधिकार आहे हे मान्य करत नाहीत. ते, धर्मसुधारणेच्या दरम्यान विकसित झालेल्या शिकवणींचे जसे की, एक व्यक्‍ती केवळ स्वतःच्या विश्‍वासामुळे देवाची मर्जी प्राप्त करू शकते, विश्‍वास करणारे सर्व जण पाळक असतात व फक्‍त बायबलमध्येच सत्य सांगितले आहे, या शिकवणींचे पालन करतात.

यहोवाचे साक्षीदारसुद्धा केवळ पोपलाच सर्व अधिकार दिला आहे हे मान्य करत नसले आणि फक्‍त बायबलमध्येच सत्य सांगितले आहे, हे पूर्ण मनाने कबूल करत असले तरीसुद्धा ते अनेक उल्लेखनीय मार्गांनी प्रोटेस्टंट धर्मांपेक्षा वेगळे आहेत. खरे तर, द एनसायक्लोपिडिआ ऑफ रिलिजन या विश्‍वकोशात असे म्हटले आहे, की यहोवाचे साक्षीदार सर्वांपेक्षा “वेगळे” आहेत. कोणत्या तीन मार्गांनी ते वेगळे आहेत त्याचा आपण विचार करूया.

एक मार्ग म्हणजे, जरी प्रोटेस्टंट धर्मांनी कॅथलिक उपासनेतील काही उपासनापद्धती अमान्य केल्या असल्या तरी, धर्मसुधारणा केलेल्या काही नेत्यांनी त्रैक्याची शिकवण, नरकाग्नी, मानवाचा आत्मा अमर असतो यांसारख्या कॅथलिक शिकवणी तशाच राहू दिल्या. परंतु, यहोवाचे साक्षीदार असे मानतात की या शिकवणी बायबलच्या विरोधात तर आहेतच शिवाय त्या देवाबद्दलचा चुकीचा दृष्टिकोनही सादर करतात.

दुसरा मार्ग, यहोवाचे साक्षीदार ज्या धर्माचे समर्थन करतात तो नकारात्मक विरोध करणारा नव्हे तर सकारात्मक शिक्षण देणारा आहे. “प्रभूच्या दासाने भांडू नये, तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकविण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्‍यांना सौम्यतेने शिक्षण देणारा, असे असावे,” हा बायबलमधील सल्ला ते गांभीर्याने घेतात. (२ तीमथ्य २:२४, २५) यहोवाचे साक्षीदार, बायबलमधील शिकवणी आणि अनेक धार्मिक गट शिकवत असलेल्या शिकवणी यांच्यातील विरोधाभास दाखवतात हे खरे आहे. पण असे करण्यामागे त्यांचा हेतू इतर धार्मिक संघटनांमध्ये सुधारणा करणे हा नसतो. तर, प्रामाणिक मनाच्या लोकांना देव आणि त्याचे वचन, बायबल यांबद्दलचे अचूक ज्ञान घेण्यास मदत करणे हा असतो. (कलस्सैकर १:९, १०) इतर धर्माचे लोक केवळ हुज्जत घालण्याच्या हेतूने चर्चा करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा यहोवाचे साक्षीदार या चर्चा करण्याचे टाळतात; कारण त्यांना माहीत आहे, की या वादावादींतून काहीच निष्पन्‍न होत नाही.—२ तीमथ्य २:२३.

तिसरा मार्ग, प्रोटेस्टंट चळवळीमुळे शेकडो धर्मांची उत्पत्ती झाली परंतु यहोवाच्या साक्षीदारांचा पूर्वीपासूनच एक संयुक्‍त विश्‍वव्यापी बंधूसमाज टिकून राहिला आहे. बायबल शिकवणींबद्दल बोलायचे झाले तर, २३० पेक्षा अधिक राष्ट्रांतील यहोवाचे साक्षीदार, “तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे” या प्रेषित पौलाच्या सल्लाचे पालन करतात. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटी नाहीत. उलट, ते खरोखरच “एकचित्ताने व एकमताने जोडलेले” आहेत. (१ करिंथकर १:१०) आपल्या सहबांधवांबरोबर ते ‘आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटतात.’—इफिसकर ४:३. (w०९-E ११/०१)