व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपली सर्व चिंता यहोवावर टाका

आपली सर्व चिंता यहोवावर टाका

“त्याच्यावर [देवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.

गीत क्रमांक: २३, ३२

१, २. (क) आपल्याला चिंतांचा सामना का करावा लागतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

“सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.” (१ पेत्र ५:८; प्रकटी. १२:१७) याच कारणामुळे आजचं जीवन हे फार धकाधकीचं आणि तणावपूर्ण बनलं आहे. अगदी देवाच्या सेवकांनासुद्धा अनेक चिंतांचा सामना करावा लागतो. प्राचीन काळातील देवाच्या सेवकांनाही कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं होतं. या सेवकांपैकीच एक म्हणजे राजा दावीद. बायबल म्हणतं की त्याच्या जीवनातही असे बरेच दुःखद प्रसंग आले, जेव्हा त्याला चिंतांचा सामना करावा लागला. (स्तो. १३:२) तसंच, प्रेषित पौलालादेखील “मंडळ्यांविषयींची चिंता” वाटायची. (२ करिंथ. ११:२८) आज आपल्या जीवनातही असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला चिंतांचा सामना करावा लागतो. मग अशा वेळी आपण काय करू शकतो?

प्राचीन काळातील आपल्या सेवकांना यहोवा देवाने अगदी प्रेमळ पित्याप्रमाणे मदत केली. आज आपल्यालाही तो मदत करण्यास तयार आहे. बायबल आपल्याला आर्जवतं: “त्याच्यावर [देवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:७) हे आपण कसं करू शकतो? यासाठी या लेखात आपण असे चार मार्ग पाहणार आहोत, ज्यांमुळे आपल्याला चिंतांचा सामना करण्यास मदत होते. (१) प्रार्थना करण्याद्वारे, (२) बायबलचं वाचन आणि त्यावर मनन करण्याद्वारे, (३) यहोवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारण्याद्वारे, आणि (४) आपल्या जवळच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करण्याद्वारे. या मार्गांचं परीक्षण करत असताना, तुम्हाला कोणत्या बाबतीत आणखी सुधारणा करण्याची गरज आहे याकडे तुम्ही लक्ष देऊ शकता.

“तू आपला भार परमेश्वरावर टाक”

३. आपण यहोवावर आपला भार कसा टाकू शकतो?

पहिला मार्ग म्हणजे आपण प्रार्थनेद्वारे आपल्या प्रेमळ पित्याजवळ, यहोवाजवळ आपल्याला वाटणारी काळजी आणि चिंता व्यक्त करू शकतो. आपण जेव्हा चिंतांनी भारावून जातो तेव्हा आपण आपल्या भावना यहोवाकडे व्यक्त कराव्यात अशी तो आपल्याकडे अपेक्षा करतो. स्तोत्रकर्ता दावीद याने यहोवाकडे अशी याचना केली: “हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे.” त्याच स्तोत्रात त्याने पुढे असं म्हटलं: “आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल.” (स्तो. ५५:१, २२) समस्या सोडवण्यासाठी किंवा परिस्थिती सुरळीत करण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न केल्यानंतर, यहोवाकडे प्रार्थना करणं हे चिंता करत बसण्यापेक्षा जास्त फायदेशीर नाही का? नक्कीच आहे. पण मग, प्रार्थना केल्यामुळे आपल्याला कशी मदत होते? आणि चिंतेच्या भाराखाली दबून जाण्यापासून प्रार्थना आपल्याला कशी मदत करू शकते?—स्तो. ९४:१८, १९.

४. चिंतांचा सामना करत असताना प्रार्थना करणं इतकं महत्त्वाचं का आहे?

फिलिप्पैकर ४:६, ७ वाचा. मनापासून व चिकाटीने केलेल्या प्रार्थनांना यहोवा कसं उत्तर देतो? तो आपल्याला आपली मनःशांती टिकवून ठेवण्यास, तसंच नकारात्मक विचारांना आणि भावनांना मनातून काढून टाकण्यास मदत करतो. आपल्याला चिंता आणि भीती वाटत असली तरी मानवांच्या बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली शांती अनुभवण्यास यहोवा आपल्याला मदत करतो. आपल्या अनेक बंधुभगिनींनी हे अनुभवलं आहे, आणि तुम्हीही ते अनुभवू शकता. देवाकडून मिळणाऱ्या शांतीमुळे आपण कोणत्याही प्रसंगांचा सामना करू शकतो. यहोवाच्या पुढील अभिवचनावर तुम्ही पूर्ण भरवसा ठेवू शकता. यहोवा म्हणतो: “भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो.”—यश. ४१:१०.

देवाकडून मिळणारी शांती

५. देवाच्या वचनामुळे आपल्याला मनःशांती अनुभवण्यास कशी मदत होऊ शकते?

मनःशांती अनुभवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे बायबलचं वाचन करून त्यावर मनन करणं. हे इतकं महत्त्वाचं का आहे? कारण, बायबल हे देवाचं वचन असल्यामुळे त्यात अतिशय सुज्ञ व व्यावहारिक सल्ले दिले आहेत. त्यामुळे, जेव्हा-जेव्हा तुम्हाला चिंता वाटते, तेव्हा-तेव्हा तुम्ही देवाच्या वचनांवर विचार करू शकता. तसंच, देवाने दिलेल्या या सल्ल्यांमधून तुम्हाला कशी हिम्मत मिळू शकते यावरही तुम्ही मनन करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला चिंतांवर मात करण्यास, त्या कमी करण्यास किंवा त्या अगदी पूर्णपणे टाळण्यासही मदत मिळू शकते. यहोवाने असं म्हटलं आहे की आपण त्याच्या वचनाचं वाचन केलं, तर समस्यांना घाबरण्याऐवजी आपल्याला हिम्मत धरण्यास आणि खंबीर राहण्यास मदत मिळू शकते.—यहो. १:७-९.

६. येशूच्या शब्दांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

पृथ्वीवर असताना येशू इतरांशी कशा प्रकारे बोलला हेदेखील आपल्याला देवाच्या वचनात वाचायला मिळतं. लोकांना त्याचं बोलणं मनापासून ऐकायला आवडायचं. कारण त्याचे शब्द मनाला तजेला आणि सांत्वन देणारे होते; खासकरून, दुःखी आणि निराश झालेल्या लोकांसाठी. (मत्तय ११:२८-३० वाचा.) येशूने इतरांच्या आध्यात्मिक, भावनिक आणि शारीरिक गरजांची प्रेमळपणे काळजी घेतली. (मार्क ६:३०-३२) येशूने त्याच्यासोबत असलेल्या प्रेषितांनाही अभिवचन दिलं की तो त्यांना नेहमी मदत करेल. त्याच प्रकारे तो आज आपल्यालाही मदत करण्यास तयार आहे. पण, यासाठी आपल्याला व्यक्तिशः त्याच्यासोबत असण्याची गरज नाही. आज स्वर्गात आपला राजा या नात्याने तो आपल्यावर प्रेम दाखवतो. या कारणामुळे तुम्ही ही खात्री बाळगू शकता की तुम्हाला जेव्हाही चिंतांचा सामना करावा लागतो, तेव्हा तो नेहमी तुम्हाला मदत करण्यासाठी तयार असेल आणि योग्य वेळी तुम्हाला ती मदत पुरवेल. येशू आपल्याला हिम्मत आणि आशा धरण्यास मदत करतो, त्यामुळे आपल्याला आपल्या चिंतांवर मात करण्यास मदत होते.—इब्री २:१७, १८; ४:१६.

देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे उत्पन्न होणारे गुण

७. आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्यामुळे कशी मदत होते?

आपण यहोवाजवळ मागितल्यास तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा नक्की देईल, अशी खात्री येशूने आपल्याला दिली आहे. (लूक ११:१०-१३) चिंतांवर मात करण्याच्या या तिसऱ्या मार्गामुळे आपल्याला कशी मदत मिळते? देवाच्या पवित्र आत्म्यामुळे किंवा त्याच्या कार्यकारी शक्तीमुळे, देवामध्ये असलेले सकारात्मक गुण आपल्याला स्वतःमध्ये विकसित करण्यास मदत मिळू शकते. (कलस्सै. ३:१०) बायबल या गुणांना “आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ” असं म्हणते. (गलतीकर ५:२२, २३ वाचा.) हे चांगले गुण विकसित केल्यास इतरांसोबत असलेला आपला नातेसंबंध आणखी चांगला बनण्यास मदत होते. यामुळे तणाव निर्माण होईल अशी परिस्थिती उत्पन्न होण्यापासून आपण टाळू शकतो. पवित्र आत्म्याद्वारे निर्माण होणाऱ्या या चांगल्या गुणांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते यावर आता आपण चर्चा करू या.

८-१२. देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे निर्माण होणाऱ्या गुणांमुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते?

“प्रीती, आनंद, शांती.” जेव्हा तुम्ही इतरांसोबत आदराने वागता तेव्हा तुम्हाला कमी तणावाचा आणि चिंतांचा सामना करावा लागतो हे तुम्हाला जाणवेल. ते कसं? तुम्ही जेव्हा इतरांवर प्रेम करता, त्यांच्यासोबत कोमलतेनं वागता आणि त्यांना आदर दाखवता, तेव्हा तुम्ही अशी परिस्थिती उत्पन्न होण्यापासून टाळू शकता ज्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मक भावना उत्पन्न होतील. जसं की राग, निराशा आणि तणाव. यामुळे इतरांसोबत शांतीपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवण्यास तुम्हाला मदत होते.—रोम. १२:१०.

“सहनशीलता, ममता, चांगुलपणा.” बायबल म्हणतं: “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, . . . एकमेकांना क्षमा करा.” (इफिस. ४:३२) बायबलमधील या सल्ल्याचं पालन केल्यास, आपल्याला एकमेकांसोबत शांतीपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत होईल. तसंच, तणाव आणि चिंता निर्माण होईल असे प्रसंग टाळण्यासही आपल्याला मदत मिळेल. शिवाय, अपरिपूर्णतेमुळे निर्माण होणारी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळण्यासही आपल्याला सोपं जाईल.

१० “विश्वासूपणा.” आपल्याला सहसा पैशांबद्दल आणि भौतिक गोष्टींबद्दल चिंता वाटते. (नीति. १८:११) मग या गोष्टींबद्दल आपल्याला वाटणारी चिंता आपण कशी टाळू शकतो? यासाठी आपण प्रेषित पौलाचा सल्ला लागू करण्याची गरज आहे. त्याने म्हटलं: “जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे.” यहोवावरील मजबूत विश्वासामुळे आपल्याला अशी खात्री बाळगण्यास मदत मिळते, की तो प्रेमळपणे आपल्या सर्व गरजा पुरवेल. त्याने आपल्याला असं अभिवचन दिलं आहे: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” आणि याच कारणामुळे आपणही पौलाप्रमाणे पूर्ण विश्वासाने म्हणू शकतो: “प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?”—इब्री १३:५, ६

११ “सौम्यता, इंद्रियदमन.” सौम्यता आणि इंद्रियदमन (आत्मसंयम), दाखवणं खरंच किती सुज्ञपणाचं आणि व्यावहारिक आहे याचा विचार करा. हे गुण तुम्हाला असं काही बोलण्यापासून किंवा करण्यापासून वाचवतात, ज्यामुळे तणाव आणि चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण होईल. तसंच, तुम्ही “सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा” यांपासूनही दूर राहता. आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो.—इफिस. ४:३१.

१२ पण, ‘देवाच्या पराक्रमी हातांमध्ये’ स्वतःला सोपवण्यासाठी आणि “त्याच्यावर . . . आपली सर्व चिंता” टाकण्यासाठी आपल्याला नम्र असण्याची गरज आहे. (१ पेत्र ५:६, ७) तुम्ही नम्र असल्यास यहोवा तुम्हाला साहाय्य करेल आणि तुमची काळजीही घेईल. तसंच, जेव्हा तुम्ही स्वतःच्या क्षमतांना आणि कमतरतांना चांगल्या प्रकारे ओळखता, तेव्हा स्वतःवर अवलंबून राहण्याऐवजी देवावर निर्भर राहण्यास तुम्हाला मदत होते. त्यामुळे, चिंतांच्या भाराखाली दबून जाण्यापासूनही तुम्ही बचावता.—मीखा ६:८.

“चिंता करू नका”

१३. “चिता करू नका” असं जे येशूने म्हटलं त्याचा काय अर्थ होतो?

१३ मत्तय ६:३४ (वाचा.) या वचनात येशू आपल्याला असा सल्ला देतो की “चिंता करू नका.” हा सल्ला लागू करणं कदाचित अशक्य आहे असं आपल्याला वाटेल. पण, येशूच्या बोलण्याचा नेमका काय अर्थ होता हे समजून घेतल्यास आपल्याला फायदा होईल. याआधी आपण पाहिलं की दावीद आणि पौल यांनादेखील बऱ्याच वेळा चिंतांचा सामना करावा लागला. यहोवाच्या सेवकांना कधीच चिंतांचा सामना करावा लागणार नाही, असं येशूला इथं म्हणायचं नव्हतं. याउलट, तो आपल्या शिष्यांना हे समजावून सांगत होता की, वाजवीपेक्षा जास्त चिंता केल्याने किंवा अनावश्यक गोष्टींविषयी चिंता केल्याने समस्या सुटणार नाहीत. आपल्याला दररोज कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे गतकाळातील आणि भविष्यातील गोष्टींचा विचार करून ख्रिश्चनांनी आपल्या चिंतांमध्ये आणखी भर टाकू नये असं येशूला सुचवायचं होतं. जीवनात येणाऱ्या मोठमोठ्या चिंतांचा सामना करण्यासाठीही, येशूच्या या सल्ल्यामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते, याबद्दल आता आपण पाहू या.

१४. गतकाळातील गोष्टींविषयी चिंता करण्याचं तुम्ही कसं टाळू शकता?

१४ काही वेळा लोक गतकाळात त्यांच्या हातून झालेल्या चुकांबद्दल विचार व चिंता करत राहतात. झालेल्या चुकीबद्दल त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना असते; मग त्यांनी ती चूक अनेक वर्षांआधी केलेली असली तरीही. दावीद राजादेखील कधीकधी त्याच्याकडून झालेल्या चुकांचा विचार करून चिंतेने दबून जायचा. त्याने म्हटलं: “मी आपल्या हृदयातील तळमळीमुळे ओरडत आहे.” (स्तो. ३८:३, ४, ८, १८) पण, अशा परिस्थितीत दाविदाने चांगलं पाऊल उचललं. त्याने देवाच्या दयाळूपणावर आणि क्षमाशीलतेवर भरवसा ठेवला. आणि देवाने आपल्याला माफ केलं आहे याची जाणीव असल्यामुळे स्वतःचा आनंद टिकवून ठेवण्यास त्याला मदत झाली.—स्तोत्र ३२:१-३,  वाचा.

१५. (क) आपण वर्तमान काळाची चिंता करत राहण्याचं का टाळलं पाहिजे? (ख) चिंता कमी करण्यासाठी तुम्हाला कशामुळे मदत होऊ शकते? (“ चिंता कमी करण्याचे काही व्यावहारिक मार्ग” ही चौकटदेखील पाहा.)

१५ कधीकधी आपल्याला वर्तमानकाळातील गोष्टींबद्दलची चिंता सतावत असते. उदाहरणार्थ, दाविदाचा जीव धोक्यात होता, तेव्हा त्याने ५५ वे स्तोत्र लिहिले. (स्तो. ५५:२-५) पण, जीवनातील चिंतांमुळे यहोवावरील त्याचा भरवसा मात्र कमी झाला नाही. आपल्या समस्या सोडवण्यासाठी दाविदाने यहोवाकडे मदतीची याचना केली. पण, त्यासोबतच आपण स्वतःही काही पावलं उचलण्याची गरज आहे, हेदेखील त्याला माहीत होतं. (२ शमु. १५:३०-३४) दाविदाच्या उदाहरणावरून आपणही बरंच काही शिकू शकतो. समस्यांचा सामना करत असताना यहोवा नक्कीच आपला सांभाळ करेल यावर आपण पूर्ण भरवसा ठेवला पाहिजे. आणि चिंतांच्या भाराखाली दबून जाण्याऐवजी, समस्या सोडवण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपण केलं पाहिजे.

१६. देवाच्या नावाच्या अर्थामुळे तुम्हाला तुमचा विश्वास वाढवण्यास कशी मदत होते?

१६ कधीकधी एखादी ख्रिस्ती व्यक्ती, भविष्यात कदाचित उद्‌भवू शकतील अशा समस्यांचा विचार करून चिंता करत बसते. पण, ज्या गोष्टी अजूनही घडलेल्या नाहीत त्यांबद्दल चिंता करत बसण्यात काहीच अर्थ नाही. कारण अनेक वेळा, आपण विचार करतो तितकी परिस्थिती वाईट होत नाही. तसंच, आपण हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपल्याला मदत करणं यहोवाला शक्य आहे. त्याच्या नावाचाच अर्थ “तो व्हायला लावतो,” असा आहे. (निर्ग. ३:१४, NW) त्यामुळे आपण भविष्याची चिंता करत बसण्याची गरज नाही. कारण, देवाच्या नावावरून आपल्याला ही खात्री मिळते, की मानवांसाठी असलेले त्याचे सर्व उद्देश तो नक्कीच पूर्ण करेल. तुम्ही हा भरवसा बाळगू शकता की देव त्याच्या विश्वासू सेवकांना आशीर्वादित करेल. तसंच, त्यांच्या चिंता कमी करण्यास त्यांना नक्कीच मदत करेल; मग त्या गतकाळातील असोत, वर्तमान काळातील किंवा भविष्यातील.

आपल्या जवळच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करा

१७, १८. चिंतांचा सामना करत असताना इतरांसोबत संवाद साधल्याने आपल्याला कशी मदत होते?

१७ चिंतांचा सामना करण्याचा चौथा मार्ग म्हणजे, आपल्या जवळच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं करणं. तुम्ही कदाचित आपल्या विवाह जोडीदाराबरोबर, एखाद्या जवळच्या मित्राबरोबर किंवा मंडळीतील एखाद्या वडिलांबरोबर बोलू शकता. ते तुम्हाला तुमची परिस्थिती आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करू शकतील. बायबल म्हणतं: “मनुष्याचे मन चिंतेने दबून जाते, परंतु गोड शब्द त्याला आनंदित करतो.” (नीति. १२:२५) बायबल असंही म्हणतं: “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.”—नीति. १५:२२.

१८ आपल्या ख्रिस्ती सभांमुळेही आपल्याला चिंतांचा सामना करण्यास मदत मिळते. दर आठवडी होणाऱ्या सभांदरम्यान आपली मनापासून काळजी करणाऱ्या आणि आपल्याला प्रोत्साहन देण्याची इच्छा असणाऱ्या बंधुभगिनींसोबत आपण वेळ घालवतो. (इब्री १०:२४, २५) एकमेकांपासून मिळणाऱ्या उत्तेजनामुळे आपल्याला हिंमत मिळते आणि त्यामुळे चिंतांवर मात करणं आपल्याला सोपं जातं.—रोम. १:१२.

यहोवासोबत असलेला तुमचा नातेसंबंधच तुमची सर्वात मोठी ताकद आहे

१९. देवासोबत असलेल्या तुमच्या नातेसंबंधामुळे तुम्हाला हिंमत मिळेल, अशी खात्री तुम्ही का बाळगू शकता?

१९ कॅनडातील एका मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या एका बांधवाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. यहोवावर आपली चिंता टाकणं खरंच किती महत्त्वाचं आहे हे ते शिकले. ते शाळेत एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सल्लागार म्हणून काम करायचे. त्यांचं काम खूप तणावपूर्ण होतं. शिवाय, त्यांना जो आजार आहे त्यामुळेही त्यांना चिंता वाटायची. मग अशा परिस्थितीत त्यांना कोणत्या गोष्टींमुळे हिंमत आणि मदत मिळाली? त्यांनी यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास खूप मेहनत घेतली. तसंच, त्यांच्या जवळच्या मित्रांकडूनही त्यांना बरीच मदत मिळाली. त्यांना ज्या चिंतांचा सामना करावा लागत होता त्याबद्दल ते आपल्या पत्नीशी अगदी मनमोकळेपणाने बोलले. शिवाय, मंडळीतील इतर वडिलांनी आणि विभागीय पर्यवेक्षकांनी त्यांना त्यांच्या परिस्थितीबद्दल यहोवाच्या दृष्टिकोनाने विचार करण्यास मदत केली. इतकंच नाही, तर एका डॉक्टरनेही त्यांना त्यांच्या आजाराबद्दल समजावून सांगितलं. मग त्यांनी आपल्या वेळापत्रकात बदल करून दररोज आराम करण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी काही वेळ बाजूला काढला. कालांतराने, ते परिस्थिती हाताळण्यास आणि स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकले. तसंच, आताही जेव्हा परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर जाते तेव्हा ते मदतीसाठी यहोवावर निर्भर राहतात.

२०. (क) आपण देवावर आपली चिंता कशी टाकू शकतो? (ख) पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

२० देवावर आपली चिंता टाकणं किती महत्त्वाचं आहे हे आतापर्यंत आपण या लेखात पाहिलं. हे आपण प्रार्थनेद्वारे, बायबलचं वाचन करून त्यावर मनन करण्याद्वारे करू शकतो. तसंच, यहोवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारल्याने, आपल्या जवळच्या व्यक्तीकडे आपलं मन मोकळं केल्याने आणि ख्रिस्ती सभांना हजर राहिल्यानेही आपल्याला फायदा होऊ शकतो हेदेखील आपण पाहिलं. पुढच्या लेखात आपण पाहूयात, की भविष्याची आशा देण्याद्वारे यहोवा आपल्याला कशी मदत करतो.—इब्री ११:६.