व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनाची सौम्यता—समजूतदारपणा दाखवण्याचा एक मार्ग

मनाची सौम्यता—समजूतदारपणा दाखवण्याचा एक मार्ग

अॅन्टोनिया, जी व्यवसायाने नर्स (प्रोफेशनल केअरगीवर) आहे, दारावरची बेल वाजवते. एक स्त्री दार उघडते आणि यायला उशीर झाल्याबद्दल अॅन्टोनियावर चिडते आणि तिच्याशी अपमानास्पद बोलते. खरंतर अॅन्टोनिया ही ठरलेल्या वेळीच आली होती. तरी झालेल्या गैरसमजुतीमूळे ती त्या स्त्रीची शांतपणे माफी मागते. अॅन्टोनिया ही त्या स्त्रीच्या वृद्ध आईची काळजी घेण्यासाठी तिथं आली होती.

पुढच्या वेळी जेव्हा अॅन्टोनिया तिथं जाते, तेव्हाही ती स्त्री तिच्यावर ओरडते आणि तिला रागावते. मग अॅन्टोनियाची या वेळी प्रतिक्रिया कशी होती? ती म्हणते: “या वेळी स्वतःवर ताबा ठेवणं थोडं अवघड होतं. कारण ती स्त्री विनाकारण मला बोलत होती, तिचा तो व्यवहार नक्कीच योग्य नव्हता.” तरीदेखील, अॅन्टोनियाने या वेळीही तिची माफी मागितली. अॅन्टोनियाने त्या स्त्रीला सांगितलं की ती स्त्री ज्या त्रासातून जात आहे तो ती पूर्णपणे समजू शकते.

जर तुम्ही अॅन्टोनियाच्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं? तुम्हीही सौम्य मनोवृत्ती दाखवली असती का? की स्वतःचा राग आवरणं तुम्हाला कठीण गेलं असतं? हे खरं आहे की, वर सांगितलेल्या परिस्थितींप्रमाणे एखाद्या परिस्थितीत स्वतःवर ताबा ठेवून शांत राहणं थोडं कठीण आहे. जेव्हा आपण तणावाखाली असतो किंवा जेव्हा इतरजण आपल्याला चीड येईल अशा प्रकारे वागतात, तेव्हा मनाची सौम्यता दाखवणं खरोखरच अवघड आहे.

पण, बायबल सर्व ख्रिश्चनांना सौम्य मनोवृत्ती दाखवण्यासाठी आर्जवते. त्यात असंही सुचवण्यात आलं आहे की, जी व्यक्ती सौम्यता दाखवते ती खरंतर ज्ञानाने किंवा बुद्धीने वागत असते. याकोब ३:१३ म्हणतं: “तुम्हांमध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने [सौम्यतेने] सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी.” सौम्यता देवाकडून असलेल्या ज्ञानाचा पुरावा आहे, असं आपण का म्हणू शकतो? आणि हा चांगला गुण विकसित करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?

सौम्यतेचा आत्मा दाखवण्यामध्ये सुज्ञता आहे

सौम्य मनोवृत्तीमुळे तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात येते. “मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.”नीति. १५:१.

रागामुळे तणावग्रस्त परिस्थिती आणखी बिकट होते. कारण हे आगीत तेल ओतण्यासारखंच आहे. (नीति. २६:२१) याउलट सौम्य उत्तराने सहसा चांगले परिणाम घडून येतात. यामुळे तीव्र विरोध करणाऱ्या व्यक्तीची वागणूकही बदलू शकते.

अॅन्टोनियाने हे स्वतः अनुभवलं. तिने दाखवलेल्या सौम्य मनोवृत्तीमुळे ती स्त्री शांत झाली आणि तिला रडू कोसळलं. त्या स्त्रीने अॅन्टोनियाला सांगितलं की वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्यांमुळे ती त्या प्रकारे वागली. अॅन्टोनियाने तिला साक्ष दिली आणि त्यानंतर त्या स्त्रीचा बायबल अभ्यास चालू झाला. या सर्व गोष्टी शक्य झाल्या त्या केवळ अॅन्टोनियाच्या शांत आणि सौम्य मनोवृत्तीमुळे.

सौम्य मनोवृत्ती बाळगल्याने आपण आनंदी राहतो. “जे सौम्य ते धन्य [आनंदी], कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.”मत्त. ५:५.

सौम्य मनोवृत्ती बाळगणारे आनंदी राहतात असं आपण का म्हणू शकतो? असे अनेक जण आहेत, जे पूर्वी फार रागीट स्वभावाचे होते. पण सौम्य मनोवृत्ती धारण केल्यामुळे ते आता आनंदी आहेत. त्यांच्या जीवनात अनेक चांगले बदल झाले आहेत, आणि त्यांना या गोष्टीचीही जाणीव आहे की देवाने त्यांच्यासाठी एक चांगलं भवितव्य राखून ठेवलं आहे. (कलस्सै. ३:१२) स्पेनमधील एक विभागीय पर्यवेक्षक अडॉल्फो आपल्या पूर्वीच्या स्वभावाविषयी आणि सत्यात आल्यानंतर त्यांच्या जीवनात जो चांगला बदल झाला त्याविषयी सांगतात.

ते म्हणतात: “माझ्या आयुष्याला पूर्वी कोणतीही दिशा नव्हती. मला लगेच राग यायचा, छोट्या-मोठ्या कारणांवरूनही मी लगेचच चिडायचो. इतका की माझे मित्र माझ्या घमेंडी आणि हिंसक स्वभावामुळे मला खूप घाबरायचे. आणि शेवटी माझ्या आयुष्यात एक मोठी घटना घडली. एकदा भांडणात माझ्यावर सहा वेळ वार झाले आणि माझं इतकं रक्त वाहिलं की मी अक्षरशः मरता-मरता वाचलो.”

आता मात्र अडॉल्फो इतरांना सौम्य मनोवृत्ती कशी बाळगावी याविषयी शिकवतात—शब्दांनीच नाही तर स्वतःच्या उदाहरणानेही. त्यांच्या चांगल्या व कोमल व्यक्तिमत्त्वामुळे अनेक जण त्यांचे जवळचे मित्र बनले आहेत. अडॉल्फो म्हणतात, जीवनात चांगले बदल करता आले यासाठी ते आता फार आनंदी आहेत. आणि सौम्य मनोवृत्ती धारण करण्यासाठी यहोवाने त्यांना मदत केली यासाठीही ते त्याचे फार आभारी आहेत.

सौम्य मनोवृत्ती बाळगल्याने आपण यहोवालाही आनंदी करतो. “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”नीति. २७:११.

यहोवाचा मुख्य शत्रू, सैतान हादेखील यहोवाची निंदा करत आला आहे व त्याला दोष लावत आला आहे. यामुळे क्रोध व्यक्त करण्यासाठी यहोवाजवळ योग्य व सबळ कारणं आहेत. पण यहोवा देव हा “मंदक्रोध” आहे असं बायबल आपल्याला सांगतं. (निर्ग. ३४:६) त्यामुळे जेव्हा आपण यहोवा देवाचं अनुकरण करून रागावण्यात ‘मंद’ होतो आणि सौम्य मनोवृत्ती धारण करतो, तेव्हा समजूतदारपणाच्या मार्गावर आपण चालत असतो आणि यहोवाचं मन आनंदित करतो.—इफिस. ५:१.

आपण फार कठीण काळात जगत आहोत. अनेकदा आपल्याला अशा लोकांना सामोरं जावं लागतं जे, “बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक . . . चहाडखोर, असंयमी, क्रूर” असे आहेत. (२ तीम. ३:२, ३) आताचं जग हे अशा लोकांनी भरलेलं असलं, तरी ख्रिश्चनांनी मनाची सौम्यता विकसित करण्याचं थांबवावं असा याचा अर्थ होत नाही. देवाचं वचन आपल्याला आठवण करून देतं की “वरून येणारे ज्ञान हे मुळात . . . शांतिप्रिय, सौम्य” आहे. (याको. ३:१७) शांत आणि सौम्य मनोवृत्ती दाखवल्यामुळे, देवाकडून मिळणाऱ्या ज्ञानाद्वारे आपण चालत आहोत याचा पुरावा आपण देत असतो. जेव्हा आपल्याला चिथवलं जातं तेव्हा या ज्ञानामुळे आपल्याला सौम्यतेनं उत्तर देणं शक्य होतं. आणि अफाट ज्ञानाचा आणि बुद्धीचा जो स्रोत आहे त्याच्याजवळ, म्हणजेच यहोवा देवाजवळ जाण्यास आपल्याला मदत होते.