व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा त्याचा शोध झटून करणाऱ्यांना प्रतिफळ देतो

यहोवा त्याचा शोध झटून करणाऱ्यांना प्रतिफळ देतो

“देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री ११:६.

गीत क्रमांक: १४, २३

१, २. (क) प्रेम आणि विश्वास यांचा परस्पर संबंध कसा आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

आपला स्वर्गीय पिता, यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना प्रतिफळ देण्याचं वचन देतो. याद्वारेही त्यांच्यावर असलेलं त्याचं प्रेम तो व्यक्त करतो. आपणही त्याच्यावर प्रेम करतो, कारण “पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली.” (१ योहा. ४:१९) यहोवावरील आपलं प्रेम जसजसं वाढत जातं, तसतसं त्याच्यावरील आपला विश्वासही आणखी मजबूत होत जातो. तसंच, यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना नक्कीच प्रतिफळ देतो, ही आपली खात्रीही पक्की होते.—इब्री लोकांस ११:६ वाचा.

यहोवा, प्रतिफळ देणारा आहे. आणि हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे, त्याचा झटून शोध करणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो अशी खात्री जर आपल्याला नसेल, तर आपला विश्वास अपूर्ण आहे. आपण असं का म्हणू शकतो? कारण, बायबल म्हणतं की “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा” आहे. (इब्री ११:१) विश्वास म्हणजे, देव आपल्या एकनिष्ठ सेवकांना नक्की प्रतिफळ देईल यावर असलेला पूर्ण भरवसा. मग, आपल्याला प्रतिफळ मिळेल ही आशा धरल्यामुळे आपल्याला कशी मदत होते? आणि यहोवाने प्राचीन काळात आणि आताही आपल्या सेवकांना कशा प्रकारे प्रतिफळ दिलं आहे? याबद्दल आपण आता थोडी चर्चा करू या.

यहोवा त्याच्या सेवकांना आशीर्वाद देण्याचं अभिवचन देतो

३. मलाखी ३:१० मध्ये कोणतं अभिवचन दिलेलं आहे?

यहोवा देवाने त्याच्या विश्वासू सेवकांना प्रतिफळ देण्याचं अभिवचन दिलं आहे. आपण यहोवाच्या सेवेत आपलं सर्वोत्तम द्यावं असा आर्जव तो आपल्याला करतो. आणि त्यासाठी तो नक्कीच आपल्याला आशीर्वादित करेल असा भरवसाही आपण बाळगावा असं तो आपल्याला सांगतो. मलाखी ३:१० या वचनात यहोवा आपल्याला आर्जव करतो: “मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीती पाहा.” यहोवाने केलेल्या या आर्जवाचा जेव्हा आपण स्वीकार करतो, तेव्हा त्याप्रती असलेली आपली कदर आपण व्यक्त करत असतो.

४. मत्तय ६:३३ मध्ये येशूने जे अभिवचन दिलं त्यावर आपण भरवसा का ठेवू शकतो?

येशूने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं, की जर त्यांनी देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्रथम स्थानी ठेवलं तर देव त्यांच्या सर्व गरजा नक्की पूर्ण करेल. (मत्तय ६:३३ वाचा.) दिलेली सर्व अभिवचनं यहोवा नेहमी पूर्ण करतो, हे माहीत असल्यामुळेच येशू हे इतक्या खात्रीने म्हणू शकला. (यश. ५५:११) यहोवाने आपल्याला अभिवचन दिलं आहे: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्री १३:५) आपणही जर यहोवावर पूर्ण विश्वास ठेवला, तर तो त्याचं हे अभिवचन नक्कीच पूर्ण करेल अशी खात्री आपण बाळगू शकतो. यहोवाने दिलेल्या या अभिवचनामुळे मत्तय ६:३३ मधील येशूच्या शब्दांवर भरवसा ठेवण्यासही आपल्याला मदत होते.

येशूने आपल्या शिष्यांना याची खात्री दिली की त्यांनी जे त्याग केले त्याबद्दल त्यांना नक्कीच प्रतिफळ मिळेल (परिच्छेद ५ पाहा)

५. येशूने पेत्राला जे उत्तर दिलं त्यामुळे आपल्यालाही प्रोत्साहन कसं मिळतं?

प्रेषित पेत्राने एकदा येशूला विचारलं: “आम्ही सर्व सोडून आपल्यामागे आलो आहो, तर आम्हाला काय मिळणार?” (मत्त. १९:२७) अशा वेळी येशू पेत्रावर रागावला नाही किंवा त्याने त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट, येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं की त्यांनी जे त्याग केले आहेत त्यांसाठी त्यांना नक्कीच प्रतिफळ मिळेल. प्रेषित आणि इतर विश्वासू जण भविष्यात येशूसोबत स्वर्गात राज्य करतील. पण, येशूने हेदेखील सांगितलं की या काळातही विश्वासू सेवकांना प्रतिफळ मिळेल. त्याने म्हटलं: “ज्या कोणी घरे, भाऊ, बहिणी, बाप, आई, मुले किंवा शेते माझ्या नावाकरता सोडली आहेत त्याला अनेकपटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल.” (मत्त. १९:२९) येशूच्या सर्व अनुयायांना आज मंडळीतील बंधुभगिनींकडून पित्याचं, आईचं, भावाचं, बहिणीचं आणि मुलांचं प्रेम अनुभवायला मिळत आहे. आणि हे प्रेम आपण देवाच्या राज्याकरता केलेल्या कोणत्याही त्यागापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त मौल्यवान आहे.

आशा आपल्या जीवासाठी नांगराप्रमाणे आहे

६. यहोवा आपल्या सेवकांना प्रतिफळ देण्याचं अभिवचन का देतो?

आपण सध्या अनेक सुंदर आशीर्वादांचा आनंद घेत आहोत हे खरं आहे. पण त्यासोबतच भविष्यात आपल्याला मिळणाऱ्या मोठमोठ्या आशीर्वादांचाही आपण विचार करू शकतो. (१ तीम. ४:८) यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना प्रतिफळ देण्याचं वचन देतो आणि हीच गोष्ट आपल्याला कठीण प्रसंगांत टिकून राहण्यास मदत करते. यहोवा “त्याचा शोध झटून करणाऱ्यांना . . . प्रतिफळ देणारा आहे,” या वचनावर आपण पूर्ण भरवसा बाळगला तर विश्वासात टिकून राहण्यास आपल्याला मदत होईल.—इब्री ११:६.

७. विश्वास नांगराप्रमाणे आहे असं आपण का म्हणू शकतो?

डोंगरावरील प्रवचनात येशूने म्हटलं होतं: “आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेषटे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्त. ५:१२) देवाच्या काही सेवकांना त्यांचं प्रतिफळ स्वर्गात मिळेल. आणि इतर सेवकांना पृथ्वीवर सदासर्वकाळाचं जीवन प्रतिफळ म्हणून मिळेल. हेही आनंद आणि उल्हास करण्याचं एक कारण आहे. (स्तो. ३७:११; लूक १८:३०) पण भविष्यासाठी असलेली आपली आशा आपल्या “जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ” अशी आहे. (इब्री ६:१७-२०) ज्या प्रकारे नांगर वादळात जहाजाला स्थिर व सुरक्षित ठेवण्यास मदत करतो, त्याच प्रकारे आपला भक्कम विश्वास आपल्याला टिकून राहण्यास मदत करतो. आणि त्यामुळे आपल्याला कठीण प्रसंगांचा सामना करण्यासाठी लागणारी ताकद मिळते.

८. भविष्यासाठी असलेल्या आशेमुळे आपल्याला चिंतांचा सामना करण्यास कशी मदत होते?

भविष्यासाठी असलेल्या आशेमुळे आपल्याला चिंतांचा सामना करण्यासही मदत होते. ज्या प्रकारे जखमेवर मलम लावल्याने ती शांत होते, त्याच प्रकारे देवाचं अभिवचन आपल्या चिंताक्रांत मनाला शांत राहण्यास मदत करतं. यहोवावर आपण आपल्या चिंता टाकल्यास तो आपली काळजी घेईल, ही गोष्ट खरंच किती सांत्वन देणारी आहे! (स्तो. ५५:२२) आपण या गोष्टीवर पूर्ण भरवसा ठेवू शकतो की, यहोवा “आपल्या मागण्या किंवा कल्पना यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास . . . समर्थ आहे.” (इफिस. ३:२०) वचनात सांगितल्याप्रमाणे आपण कल्पनाही करू शकत नाही इतक्या जास्त प्रमाणावर यहोवा आपल्याला मदत करू शकतो.

९. यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

प्रतिफळ मिळवण्यासाठी आपल्याला यहोवावर पूर्ण विश्वास ठेवण्याची गरज आहे. तसंच, तो पुरवत असलेल्या मार्गदर्शनाचं पालन करण्याचीही गरज आहे. मोशेने इस्राएल राष्ट्राला सांगितलं: “देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. मात्र तुझा देव परमेश्वर याची वाणी तू मनःपूर्वक ऐकली पाहिजेस आणि आज ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस. कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करेल.” (अनु. १५:४-६) यहोवाची विश्वासूपणे सेवा केल्यास तो तुम्हाला आशीर्वाद देईल याची तुम्हाला पक्की खात्री आहे का? अशी खात्री बाळगण्यास आपल्याजवळ अनेक चांगली कारणं आहेत.

यहोवाने त्यांना प्रतिफळ दिलं

१०, ११. यहोवाने योसेफाला कशा प्रकारे प्रतिफळ दिलं?

१० बायबल हे आपल्या फायद्याकरता लिहिण्यात आलं आहे. यात प्राचीन काळातील आपल्या सेवकांना यहोवाने कशा प्रकारे प्रतिफळ दिलं याची बरीच उदाहरणं आपल्याला वाचायला मिळतात. (रोम. १५:४) याबाबतीत असलेलं एक चांगलं उदाहरण म्हणजे योसेफाचं उदाहरण. त्याच्या भावांनी त्याला गुलाम म्हणून विकलं. त्यानंतर, त्याच्या मालकाच्या बायकोनं त्याच्यावर खोटा आरोप लावला आणि त्यामुळे त्याला इजिप्तच्या तुरुंगात टाकण्यात आलं. पण मग तुरुंगात असताना तो यहोवापासून दूर झाला का? मुळीच नाही. बायबल म्हणतं: “परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याजवर दया केली.” पुढे ते म्हणतं: “परमेश्वर योसेफाबरोबर होता आणि जे काही तो हाती घेई ते परमेश्वर यशस्वी करी.” (उत्प. ३९:२१, २३) त्या कठीण काळातही योसेफाने धीर दाखवला आणि यहोवावर भरवसा बाळगला.

११ अनेक वर्षांनंतर फारो राजाने योसेफाला तुरुंगातून मुक्त केलं. आणि आपल्या खालोखाल त्याला सर्व अधिकार दिला. देवाचा हा नम्र सेवक योसेफ, इजिप्तमध्ये राजानंतर असलेला सर्वात शक्तिशाली अधिकारी होता. (उत्प. ४१:१, ३७-४३) योसेफाला जेव्हा दोन मुलं झाली तेव्हा त्याने “आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे (विसर पाडणारा) ठेवले; कारण तो म्हणाला, देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे. त्याने दुसऱ्याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) ठेवले; कारण तो म्हणाला, माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.” (उत्प. ४१:५१, ५२) योसेफाने जी एकनिष्ठता दाखवली त्यासाठी यहोवाने त्याला प्रतिफळ दिलं. इस्राएली लोकांना आणि इजिप्तच्या लोकांना दुष्काळातून वाचवण्यासाठी यहोवाने त्याला मदत केली. योसेफाला या गोष्टीची पूर्ण खात्री होती की त्याला प्रतिफळ देणारा आणि आशीर्वादित करणारा यहोवा देवच आहे.—उत्प. ४५:५-९.

१२. परीक्षांचा सामना करताना येशूला विश्वासू राहण्यास कशामुळे मदत झाली?

१२ येशू ख्रिस्तानेदेखील अनेक परीक्षांचा सामना केला. आणि यांदरम्यान तोही यहोवाला पूर्णपणे विश्वासू राहिला. पण, यहोवाला विश्वासू राहण्यास त्याला कशामुळे मदत मिळाली? बायबल म्हणतं: “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला.” (इब्री १२:२) देवाच्या नावाला गौरव देता आल्यामुळे येशूला खूप आनंद झाला. यासाठी त्याला प्रतिफळही मिळालं. त्याला आपल्या स्वर्गीय पित्याची स्वीकृती मिळाली आणि अनेक बहुमानही मिळाले. बायबल म्हणतं की, “तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला.” आपण असंही वाचतो की, “देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले.”—फिलिप्पै. २:९.

आपण केलेल्या चांगल्या गोष्टींना देव विसरत नाही

१३, १४. आपण यहोवासाठी जे काही करतो त्याला तो कशा प्रकारे लेखतो?

१३ यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जे काही करतो त्याची तो मनापासून कदर करतो, अशी खात्री आपण बाळगू शकतो. आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी शंका वाटते किंवा मग स्वतःच्या क्षमतांवर आपल्याला भरवसा नसतो, तेव्हाही यहोवा आपल्या भावना समजू शकतो. आपल्याला जेव्हा नोकरीविषयी किंवा कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्यात याविषयी चिंता सतावत असते तेव्हा तो आपली विशेष काळजी घेतो. कदाचित पूर्वी आपल्याला यहोवाची जास्त प्रमाणात सेवा करणं शक्य होत असेल, पण आता आजारपणामुळे किंवा निराशेमुळे आपल्याला त्याची जास्त प्रमाणात सेवा करणं जमत नसेल. अशा वेळीही तो आपल्याला समजून घेतो. आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो की समस्यांचा सामना करत असतानाही यहोवाप्रती आपण जी एकनिष्ठता दाखवतो त्याची तो कदर करतो.—इब्री लोकांस ६:१०, ११ वाचा.

१४ आपण हेदेखील नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, यहोवा हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. म्हणून आपण जेव्हा त्याला प्रार्थना करतो तेव्हा तो ती ऐकतो याची खात्री आपण बाळगू शकतो. (स्तो. ६५:२) यहोवा आपला “करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव” आहे. आणि तो आपल्याला त्याच्यासोबत असलेला आपला नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी हवी ती मदत पुरवतो. ही मदत तो कधीकधी आपल्याला आपल्या बंधुभगिनींद्वारे पुरवत असतो. (२ करिंथ. १:३) आपणही जेव्हा इतरांवर दया दाखवतो तेव्हा यहोवाला आनंद होतो. बायबल म्हणतं: “जो दरिद्र्यावर दया करतो तो परमेश्वराला उसने देतो; त्याच्या सत्कृत्याची फेड तो करेल.” (नीति. १९:१७; मत्त. ६:३, ४) त्यामुळे जेव्हा आपण उदारता दाखवतो आणि आपल्या बंधुभगिनींना मदत करतो, तेव्हा त्या गोष्टीला यहोवा त्याच्यावर असलेल्या कर्जाप्रमाणे लेखतो. आणि आपण केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आपल्याला नक्की प्रतिफळ मिळेल असं अभिवचन तो देतो.

प्रतिफळ—आता आणि भविष्यासाठीही

१५. तुम्ही कोणत्या प्रतिफळाची आतुरतेनं वाट पाहत आहात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१५ अभिषिक्त ख्रिश्चनांना येशूकडून “नीतिमत्त्वाचा मुकुट” हे प्रतिफळ म्हणून मिळेल. (२ तीम. ४:७, ८) पण, जर तुम्हाला स्वर्गात जाण्याची आशा नसली तर तुम्ही देवाच्या नजरेत कमी मौल्यवान आहात असा त्याचा अर्थ होतो का? नाही. कारण, येशूची “दुसरी मेंढरे” असलेले लाखो जण पृथ्वीवरील नंदनवनात सदासर्वकाळ जगण्याच्या त्यांच्या प्रतिफळाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिथं ते “उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—योहा. १०:१६; स्तो. ३७:११.

१६. पहिले योहान ३:१९, २० या वचनांतून आपल्याला सांत्वन कसं मिळतं?

१६ कधीकधी आपल्याला वाटू शकतं की आपण यहोवाची कमी प्रमाणावर सेवा करत आहोत. किंवा मग आपण कदाचित असाही विचार करू की, ‘मी यहोवाची जी सेवा करत आहे त्यामुळे तो खरंच संतुष्ट आहे का?’ कदाचित आपल्याला असंही वाटेल की देवाकडून प्रतिफळ मिळवण्यास आपण पात्र नाही. पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.” (१ योहान ३:१९, २० वाचा.) यहोवावर आपलं प्रेम आहे आणि त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा आपण पूर्ण मनाने यहोवाची सेवा करतो, तेव्हा आपण ही खात्री बाळगू शकतो की तो नक्कीच आपल्याला प्रतिफळ देईल; मग आपण करत असलेली सेवा खूप कमी आहे असं आपल्याला वाटत असलं तरीही.—मार्क १२:४१-४४.

१७. आपण सध्या कोणते आशीर्वाद अनुभवत आहोत?

१७ सैतानाच्या या दुष्ट व्यवस्थेच्या शेवटल्या दिवसांतही यहोवा आपल्या लोकांना आशीर्वादित करत आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर ज्ञान मिळत राहावं आणि जगभरात असलेल्या आपल्या बंधुसमाजातील शांती अनुभवता यावी याकडेही तो लक्ष देतो. (यश. ५४:१३) जगभरात असलेले बंधुभगिनी आपलं एक प्रेमळ कुटुंब आहे. येशूने वचन दिल्याप्रमाणे हे कुटुंब सध्या यहोवाकडून आपल्याला मिळालेलं एक प्रतिफळच आहे. (मार्क १०:२९, ३०) तसंच, जे यहोवाचा झटून शोध करतात त्यांनाही तो प्रतिफळ देतो. तो त्यांना मनःशांती, समाधान आणि आनंद अनुभवण्यास मदत करतो.—मार्क १०:२९, ३०.

१८, १९. यहोवा देत असलेल्या प्रतिफळांबद्दल त्याच्या सेवकांना कसं वाटतं?

१८ जगभरातील यहोवाच्या सेवकांनी त्याच्याकडून मिळणारं प्रतिफळ अनुभवलं आहे. त्यांपैकी एक म्हणजे जर्मनीत राहणारी बियांका. ती म्हणते: “चिंतांचा सामना करण्यासाठी यहोवा मला नेहमी मदत पुरवत आला आहे. आणि प्रत्येक दिवशी तो माझ्या पाठीशी उभा राहिला आहे. यासाठी मी त्याचे कितीही आभार मानले तरी ते कमीच पडतील. आजचं जग हे खूप अस्ताव्यस्त, गोंधळात पडलेलं आणि फार भयानक आहे. पण, यहोवासोबत जवळचा नातेसंबंध असल्यामुळे मला त्याच्या हातात अगदी सुरक्षित असल्यासारखं वाटतं. त्याच्या सेवेसाठी जेव्हा मी काही त्याग करते, तेव्हा त्याबदल्यात तो मला त्याच्या शंभरपट आशीर्वाद देतो.”

१९ कॅनडामध्ये राहणाऱ्या पौला नावाच्या बहिणीच्या उदाहरणाकडेही लक्ष द्या. ती ७० वर्षांची आहे आणि तिला पाठीच्या कण्याशी संबंधित मोठा आजार आहे. त्यामुळे सहज रीत्या तिला कुठंही जाता येत नाही. पण, ती म्हणते: “माझ्या येण्या-जाण्यावर मर्यादा असल्या तरी त्यामुळे माझं सेवाकार्यही मर्यादित होतं असं नाही. मी सेवाकार्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा पुरेपूर फायदा घेते. जसं की फोनद्वारे आणि अनौपचारिक रीत्या साक्षकार्य करण्याचा मी प्रयत्न करते. मला प्रोत्साहन मिळावं म्हणून मी एक पुस्तक बनवलं आहे आणि त्यात काही वचनं आणि प्रकाशनांमधील काही माहिती ठेवली आहे. ती माहिती मी वेळोवेळी वाचते. त्या पुस्तकाला मी ‘तग धरून राहण्यासाठी असलेलं माझं पुस्तक’ असं म्हणते. यहोवाच्या अभिवचनांवर जर आपण लक्ष केंद्रित केलं, तर आपल्यावर येणारी निराशेची छाया ही थोड्या काळासाठी आहे हे आपल्याला जाणवतं. आपली परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा नेहमी तयार आहे.” तुमची परिस्थिती कदाचित बियांका आणि पौला या बहिणींपेक्षा खूप वेगळी असेल. पण तरी तुम्हाला आणि इतरांना यहोवाने कोणकोणत्या मार्गांनी प्रतिफळ दिलं आहे याचा तुम्ही विचार करू शकता. सध्या यहोवा तुम्हाला कशा प्रकारे प्रतिफळ देत आहे आणि भविष्यातही तो कशा प्रकारे प्रतिफळ देईल यावर विचार करणं खरंच किती चांगलं आहे!

२०. आपण जर यहोवाची विश्वासूपणे आणि पूर्ण मनाने सेवा करत राहिलो तर आपण कोणत्या गोष्टीची अपेक्षा करू शकतो?

२० हे नेहमी लक्षात असू द्या की, यहोवाला मनापासून केलेल्या प्रार्थनेचे “प्रतिफळ मोठे” असते. तुम्ही याचीही खात्री बाळगू शकता की जर तुम्ही यहोवाच्या इच्छेनुसार वागलात, तर त्याच्या अभिवचनानुसार तुम्हाला नक्कीच “फलप्राप्ती” होईल. (इब्री १०:३५, ३६) त्यामुळे आपण सर्व जण आपला विश्वास आणखी मजबूत करत राहू या आणि यहोवाची पूर्ण मनाने सेवा करू या. आपल्याला या गोष्टीची पूर्ण खात्री आहे की यहोवा आपल्याला नक्की प्रतिफळ देईल.—कलस्सैकर ३:२३, २४ वाचा.