व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कौटुंबिक जीवन आणि मैत्री

कौटुंबिक जीवन आणि मैत्री

बऱ्‍याच लोकांना आपल्या कुटुंबातल्या सदस्यांसोबत किंवा मित्रांसोबत चांगलं नातं टिकवून ठेवणं कठीण जातं. बायबलमध्ये दिलेली तत्त्वं तुम्हाला इतरांसोबत चांगले नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी कशी मदत करू शकतात यावर आता आपण चर्चा करू या.

निःस्वार्थ वृत्ती बाळगा

बायबल तत्त्व: “फक्‍त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.”—फिलिप्पैकर २:४.

याचा काय अर्थ होतो: यशस्वी नातं हे इतरांकडून काही मिळवण्यापेक्षा आपण त्यांना काय देतो यावर अवलंबून असतं. जर आपण स्वार्थी असलो तर इतरांसोबत आपले नातेसंबंध बिघडू शकतात. उदाहरणार्थ, विवाहसोबती स्वार्थी असेल तर तो फक्‍त स्वतःच्याच इच्छा पूर्ण करण्याचा विचार करेल आणि पुढे जाऊन आपल्या सोबत्याचा कदाचित विश्‍वासघातही करेल. तसंच, जे लोक स्वतःबद्दल किंवा त्यांना ज्या गोष्टी माहीत आहेत त्याबद्दल बढाई मारतात अशांसोबत कोणालाच मैत्री करावीशी वाटत नाही. हीच गोष्ट द रोड टू कॅरेक्टर या पुस्तकातही लिहिली आहे. त्यात म्हटलं आहे, “स्वतःचाच विचार करणाऱ्‍या आणि इतरांची पर्वा न करणाऱ्‍या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.”

तुम्ही काय करू शकता:

  • इतरांना मदत करा. चांगले मित्र एकमेकांवर भरवसा ठेवतात आणि एकमेकांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. काही संशोधनातून समजलं आहे की इतरांना मदत करणाऱ्‍या लोकांना कमी प्रमाणात नैराश्‍य येतं आणि त्यांचा आत्मविश्‍वासही वाढतो.

  • सहानुभूती दाखवा. सहानुभूती दाखवणं म्हणजे इतरांचं दुःख आपण स्वतः अनुभवणं. तुम्ही सहानुभूती दाखवली तर तुम्ही इतरांना घालून पाडून किंवा टोचून बोलणार नाही, म्हणजेच लोकांसोबत अशी मस्करी करणार नाही ज्यांमुळे त्यांच्या भावना दुखावल्या जातील.

    तुम्ही सहानुभूती दाखवता तेव्हा इतरांच्या बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे तुम्ही लगेच दुखावले जाणार नाही. सहानुभूती दाखवल्यामुळे आपण लोकांबद्दल आधीच मत बनवणार नाही आणि वेगवेगळ्या संस्कृतीच्या आणि पार्श्‍वभूमीच्या लोकांशी मैत्री करायलाही तयार असू.

  • इतरांसोबत वेळ घालवा. तुम्ही इतरांसोबत जितका वेळ घालवाल तितकं तुम्ही त्यांना आणखी चांगल्या प्रकारे ओळखाल. खरे मित्र बनवण्यासाठी अर्थपूर्ण संभाषण महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऐकण्यात निपुण व्हा. तुमचा मित्र तुम्हाला त्याच्या समस्या किंवा चिंता सांगत असताना तुम्ही त्याचं लक्ष देऊन ऐकत आहात हे दाखवा. अलीकडे केलेल्या मानवी स्वभावाच्या एका अभ्यासात असं म्हटलं होतं की “अर्थपूर्ण संभाषणांमुळे लोकांना आनंद होतो.”

मित्रांची सुज्ञपणे निवड करा

बायबल तत्त्व: “फसू नका. वाईट संगतीमुळे चांगल्या सवयी बिघडतात.”—१ करिंथकर १५:३३.

याचा काय अर्थ होतो: ज्या लोकांसोबत तुम्ही वेळ घालवता त्यांचा तुमच्यावर एकतर चांगला किंवा वाईट परिणाम होऊ शकतो. मानवी स्वभावाचा अभ्यास करणारे म्हणतात की आपल्या मित्रांचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडू शकतो. उदाहरणार्थ, ते म्हणतात की जर तुम्ही धुम्रपान करणारे किंवा ज्यांचा घटस्फोट होणार आहे अशा लोकांसोबत संगती केली, तर तुम्हालाही धुम्रपानाची सवय लागू शकते किंवा घटस्फोट घेण्याची इच्छा होऊ शकते.

तुम्ही काय करू शकता: अशा लोकांसोबत मैत्री करा ज्यांचे गुण आणि ज्यांची मूल्ये तुम्हाला आवडतात किंवा तुम्हाला त्यांचं अनुकरण करावंसं वाटतं. उदाहरणार्थ विचारशील, उदार, आदराने वागणारे, आणि आदरातिथ्य करणाऱ्‍यांसोबत मैत्री करा.

इतर बायबल तत्त्वं

वैवाहिक जोडप्यांना, तरुणांना आणि लहान मुलांना कुटुंबातले नातेसंबंध सुधारण्यासाठी मदतीचे ठरतील असे बायबलवर आधारित व्हिडिओ बनवण्यात आले आहेत ते पाहा

इतरांचं मन दुखावलं जाईल असं काही बोलण्याचं टाळा.

“कोणी असा असतो की तलवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो.”—नीतिसूत्रे १२:१८.

उदारता दाखवा.

“उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.”—नीतिसूत्रे ११:२५.

इतरांनी तुमच्याशी जसं वागावं अशी तुमची इच्छा आहे तसं तुम्हीही इतरांशी वागा.

“ज्या गोष्टी इतरांनी आपल्यासाठी कराव्यात असं तुम्हाला वाटतं त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत.”—मत्तय ७:१२.