व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पैशाचं नियोजन

पैशाचं नियोजन

बायबलची तत्त्वं लागू केल्यामुळे बरेच लोक पैशाचं नियोजन चांगल्या प्रकारे करू शकले आहेत.

चांगली योजना बनवा

बायबल तत्त्व: “उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात. जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्‌याकडे धाव घेतो.”—नीतिसूत्रे २१:५.

याचा काय अर्थ होतो: योजना बनवून तिचं काटेकोरपणे पालन करणं नेहमीच फायद्याचं असतं. त्यामुळे, खर्च करण्याआधी चांगली योजना बनवा. हे लक्षात असू द्या की हव्या असलेल्या सर्वच गोष्टी आपल्याला विकत घेता येत नाहीत. म्हणून विचारपूर्वक पैसे खर्च करा.

तुम्ही काय करू शकता:

  • बजेटनुसार खर्च करा. ज्या गरजेच्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्याची तुम्ही एक यादी बनवू शकता. जसं की खाद्य सामग्री, कपडे आणि घरातलं सामान. मग प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही किती पैसे खर्च करणार आहात हे आधी ठरवा. जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी अमुक पैसे ठरवले असतील आणि त्यापेक्षा जास्त खर्च झाला असेल तर दुसऱ्‍या गोष्टीसाठी ठरवलेल्या पैशातून तो खर्च पूर्ण करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही ठरवलं होतं त्यापेक्षा जास्त पैसे पेट्रोलमागे खर्च झाले असतील तर कमी महत्त्वाच्या गोष्टींसाठी राखून ठेवलेल्या पैशातून; जसं की होटेलमध्ये खायला जाण्यासाठी राखून ठेवलेल्या पैशातून तो खर्च भागवा.

  • अनावश्‍यक कर्ज टाळा. शक्य असेल तर कर्ज घेण्याचं टाळा. त्याऐवजी, पैसे साठवून गरजेच्या गोष्टी घ्या. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर प्रत्येक महिन्याला वेळेवर पूर्ण पैसे भरण्याचा प्रयत्न करा. वेळेवर पैसे भरले तर व्याज देण्याची गरज पडणार नाही. तुम्ही जर कोणाकडून कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाचे हप्ते वेळोवेळी फेडता यावेत, यासाठी एक योजना बनवा आणि तिचं काटेकोरपणे पालन करा.

    एका अभ्यासानुसार क्रेडिट कार्डचा जास्त वापर करणारे लोक सहसा नेहमी जास्त पैसे खर्च करतात. म्हणून तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याचा सुज्ञपणे वापर करा.

चुकीच्या मनोवृत्तीपासून सावध राहा

बायबल तत्त्व: “आळशी मनुष्य बी पेरायचादेखील आळस करतो. म्हणून हंगामाच्या वेळी तो अन्‍न शोधतो, पण त्याला काहीही मिळत नाही.”—नीतिसूत्रे २०:४, ईझी-टू-रीड व्हर्शन.

याचा अर्थ काय होतो: आळशीपणामुळे गरीबी येऊ शकते. म्हणून मेहनती असा आणि शक्य असेल तर आताच पैशाचं नियोजन चांगल्या प्रकारे करा. म्हणजे भविष्यात जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तुमच्याकडे पैसे असतील.

तुम्ही काय करू शकता:

  • मेहनत करा. तुम्ही जेव्हा कामाच्या ठिकाणी मेहनत घेता आणि जबाबदार असल्याचं दाखवता तेव्हा तुमच्या मालकाला हे नक्कीच आवडेल आणि त्यामुळे तुमची नोकरीही टिकून राहिलं.

  • प्रामाणिक असा. कामाच्या ठिकाणी चोरी करू नका. तुम्ही जर प्रामाणिक राहिला नाहीत तर तुमचं नाव खराब होऊ शकतं आणि नंतर तुम्हाला दुसरी नोकरी मिळणंही कठीण जाईल.

  • लोभीपणा टाळा. तुम्ही जर नेहमी जास्तीत जास्त पैसे कमवण्याच्या मागे लागलात तर याचा वाईट परिणाम तुमच्या तब्येतीवर आणि इतरांसोबत असलेल्या तुमच्या नातेसंबंधावर होऊ शकतो. नेहमी लक्षात असू द्या की पैसा हे सर्वस्व नाही.

इतर बायबल तत्त्वं:

ऑनलाईन बायबल वाचा; jw.org या वेबसाईटवर बायबल अनेक भाषांमध्ये उपलब्ध आहे

वाईट सवयींमागे वेळ आणि पैसा घालवू नका.

“जे लोक खातात आणि पितात ते गरीब होतात. ते फक्‍त खातात, पितात, आणि झोपतात आणि लवकरच त्यांच्याजवळ काहीही उरत नाही.”—नीतिसूत्रे २३:२१, ईझी-टू-रीड व्हर्शन.

पैशाबद्दल जास्त चिंता करू नका.

“काय खावं किंवा काय प्यावं अशी आपल्या जिवाबद्दल, किंवा काय घालावं अशी आपल्या शरीराबद्दल चिंता करण्याचं सोडून द्या.”—मत्तय ६:२५.

हेवा करू नका.

“स्वार्थी माणसाला फक्‍त श्रीमंत व्हायचे असते. त्याला हे कळत नाही की तो गरीब होण्याच्या मार्गाला लागला आहे.”—नीतिसूत्रे २८:२२.