व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भावनिक स्वास्थ्य

भावनिक स्वास्थ्य

बायबल आपल्याला अशा भावनांपासून दूर राहायला सांगतं ज्या आपल्यासाठी हानिकारक आहेत. पण त्यासोबतच, ते आपल्याला चांगल्या भावना विकसित करण्याचं प्रोत्साहनही देतं.

राग बाळगू नका

बायबल तत्त्व: “ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ होय.”—नीतिसूत्रे १६:३२.

याचा काय अर्थ होतो: आपल्या भावनांवर ताबा मिळवण्याची क्षमता विकसित केल्याने आपल्याला फायदा होतो. हे खरं आहे, की योग्य कारणांमुळे आपल्याला कदाचित राग येऊ शकतो. पण आपण रागावर ताबा मिळवला नाही तर त्याचे खूप वाईट परिणाम होऊ शकतात. आधुनिक अभ्यासकांच्या मते लोक जेव्हा रागात असतात तेव्हा ते नीट विचार करू शकत नाहीत. त्या वेळी ते असं काहीतरी बोलून जातात किंवा कार्यं करतात ज्याचा नंतर त्यांना पस्तावा होतो.

तुम्ही काय करू शकता: रागाने तुमच्यावर ताबा मिळवण्याआधी तुम्ही त्यावर ताबा मिळवा. काही लोकांना वाटतं की रागीट लोक खंबीर असतात, पण खरं पाहिलं तर ते कमजोर असतात. बायबल म्हणतं: “स्वतःवर ताबा नसलेला माणूस तटबंदी ढासळलेल्या नगरासारखा असुरक्षित आहे.” (नीतिसूत्रे २५:२८, सुबोधभाषांतर.) रागावर ताबा मिळवण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे प्रतिक्रिया देण्याआधी नेमकं काय घडलं त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळवणं. बायबल म्हणतं: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो.” (नीतिसूत्रे १९:११) आपण दोन्ही बाजूच्या गोष्टी लक्षपूर्वक ऐकून घेतल्या तर आपल्याला नीट विचार करायला आणि भावनांवर ताबा मिळवायला मदत होऊ शकते.

आभार व्यक्‍त करा

बायबल तत्त्व: “कृतज्ञता दाखवा.”—कलस्सैकर ३:१५.

याचा काय अर्थ होतो: असं म्हटलं जातं की फक्‍त कृतज्ञ असलेली व्यक्‍तीच आनंदी असू शकते. काही लोकांनी आपल्या जीवनात बरंच काही गमावलं आहे, तरीसुद्धा ते ही गोष्ट खरी असल्याचं मान्य करतील. अशा लोकांचं म्हणणं आहे की दुःखातून किंवा निराश करणाऱ्‍या भावनांतून सावरण्यासाठी त्यांना एका गोष्टीमुळे मदत झाली आहे. ती म्हणजे, त्यांनी ज्या गोष्टी गमावल्या आहेत त्यावर ते विचार करत नाहीत, तर त्यांच्याजवळ ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल ते आभार व्यक्‍त करतात.

तुम्ही काय करू शकता: प्रत्येक दिवशी तुम्ही ज्या गोष्टींसाठी आभारी आहात त्याची एक सूची बनवा. आणि या गोष्टी खूप मोठ्या असल्याच पाहिजेत हे गरजेचं नाही. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी, जसं की एक सुंदर सूर्योदय, आपल्या जवळच्या व्यक्‍तीसोबत रमलेल्या छानशा गप्पा किंवा एक नवीन दिवस पाहायला मिळाल्याचा आनंद. या प्रोत्साहनदायक गोष्टींवर तुम्ही विचार करण्यासाठी थोडा वेळ काढला आणि त्यासाठी कृतज्ञता बाळगली तर तुमचं भावनिक स्वास्थ्य चांगलं राहील.

तुम्ही कुटुंबातल्या सदस्यांचे किंवा मित्रांचे का आभारी आहात याबद्दल खासकरून विचार केल्याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. लोकांमधल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात यावर विचार केल्यानंतर तुम्ही त्यांबद्दल त्यांना सांगू शकता. हे तुम्ही प्रत्यक्षपणे किंवा पत्र, इमेल अथवा मेसेज यांद्वारे त्यांना कळवू शकता. यामुळे तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं मजबूत होईल आणि तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे याचा आनंदही तुम्हाला अनुभवता येईल.—प्रेषितांची कार्ये २०:३५.

इतर बायबल तत्त्वं

तुम्ही jw.org या वेबसाईटवरून इंग्रजीमध्ये आणि इतर चाळीस भाषांमध्ये बायबलचं ऑडियो रेकॉर्डिंग डाऊनलोड करू शकता

वाद सुरू होण्याआधी तिथून निघून जा.

“कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.”—नीतिसूत्रे १७:१४.

भविष्याबद्दल विनाकारण चिंता करू नका.

“उद्याची चिंता कधीही करू नका, कारण उद्याचा दिवस नव्या चिंता घेऊन उगवेल. ज्या दिवसाची चिंता त्या दिवसाला पुरे.”—मत्तय ६:३४.

भावनांच्या भरात पटकन पाऊल उचलण्याऐवजी शांत डोक्याने विचार करा.

“विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला संभाळेल.”—नीतिसूत्रे २:११.