व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय

येशू खरोखर अस्तित्वात होता का?

येशू खरोखर अस्तित्वात होता का?

येशू ख्रिस्त श्रीमंत किंवा शक्तिशाली नव्हता. त्याला राहायला स्वतःचं घरदेखील नव्हतं. तरी त्याच्या शिकवणींनी लाखो लोकांना प्रभावित केलं. पण तो खरोखर अस्तित्वात होता का? आजच्या आणि जुन्या काळातल्या जाणकारांचं यावर काय मत आहे?

  • इतिहासकार आणि जुन्या संस्कृतींचे जाणकार मायकल ग्रॅन्ट यांनी म्हटलं: “आपण ऐतिहासिक घटनांचा उल्लेख असणाऱ्या, जुन्या ग्रंथांना, ज्या दृष्टीने पाहतो त्याच दृष्टीने जर नवीन कराराला पहिलं, तर आपण येशूचं अस्तित्व मुळीच नाकारू शकत नाही. लोक जुन्या ग्रंथांतल्या व्यक्तींना खूप मानतात. ते इतिहासात होऊन गेले की नाही याबद्दल जराही शंका घेतली जात नाही. तसंच आपण येशूचं अस्तित्वदेखील नाकारू शकत नाही.”

  • नवीन करारावरचे अभ्यासाचे प्राध्यापक रूडॉल्फ बल्टमान यांनी म्हटलं: “येशूच्या अस्तित्वावर शंका घेणं चुकीचं आहे. जुन्या पॅलेस्टाईनच्या लोकांमध्ये [ख्रिस्ती लोकांमध्ये] जे मोठे ऐतिहासिक बदल घडले, त्यांची सुरुवात येशूने केली नाही यावर कोणीच समजूतदार व्यक्ती विश्वास ठेवणार नाही.”

  • इतिहासकार, लेखक आणि तत्त्वज्ञानी विल डूरॅन्ट यांनी म्हटलं: “इतकं प्रभावी आणि मनमोहक व्यक्तिमत्त्व, ज्याची नैतिक तत्त्वं उच्च होती, ज्याच्या बंधुभावाच्या विचारांनी अनेक लोक प्रेरीत झाले, अशा व्यक्तिमत्त्वाची एकाच काळात शुभवर्तमान लिहिणाऱ्या साध्या लोकांनी कल्पना केली असेल असा विचार करणं, म्हणजे शुभवर्तमानातल्या कोणत्याही चमत्कारापेक्षा मोठा चमत्कार मानावा लागेल.”

  • जर्मनीमधले भौतिकशास्त्रज्ञ अॅल्बर्ट आइन्स्टाइन यांनी म्हटलं: “जरी मी यहूदी असलो तरी नासरेथकराचं रोमांचकारी व्यक्तिमत्त्व मला प्रभावीत करतं.” जेव्हा त्यांना विचारलं गेलं, की येशू इतिहासात होऊन गेला का? तेव्हा ते म्हणाले: “शंकाच नाही! ज्याने कोणी शुभवर्तमानाची पुस्तकं वाचली आहेत त्यांना त्यात येशूची उपस्थिती नक्कीच जाणवली असेल. प्रत्येक शब्दात त्याचं व्यक्तिमत्त्व जिवंत असल्याचं जाणवतं. कुठलंही काल्पनिक पात्र इतकं जिवंत वाटूच शकत नाही.”

    “ज्याने कोणी शुभवर्तमानाची पुस्तकं वाचली आहेत त्यांना त्यात येशूची उपस्थिती नक्की जाणवली असेल.”—अॅल्बर्ट आइन्स्टाइन

इतिहासातून काय पुरावा मिळतो?

येशूच्या जीवनाचा आणि सेवाकार्याचा सखोल वृत्तांत, बायबलमधल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकांत वाचायला मिळतो. मत्तय, मार्क, लूक आणि योहान यांनी ही पुस्तकं लिहिली. त्यांच्याच नावाने ही पुस्तकं ओळखली जातात. या व्यतिरिक्त इतर लेखांमध्ये देखील येशूचा उल्लेख आढळतो.

  • टॅसिटस

    (जवळपास इ.स. ५६–इ.स. १२०) टॅसिटसला एक महान रोमन इतिहासकार मानलं जातं. त्याच्या अॅनल्स या पुस्तकात इ.स. १४ पासून इ.स. ६८ पर्यंतचा रोमन साम्राज्याचा इतिहास आहे. (येशूचा मृत्यू इ.स. ३३ मध्ये झाला) टॅसिटसने त्याच्या पुस्तकात लिहिलं की, रोममध्ये इ.स. ६४ साली एका मोठ्या आगीने फार नुकसान झालं. लोकांना वाटलं की सम्राट निरोमुळे ही आग लागली. पण निरोने ती अफवा खोटी ठरवण्यासाठी ख्रिस्ती लोकांवर दोष लावला. पुढे टॅसिटस म्हणतो: “ख्रिस्तूस [ख्रिश्चन] या नावाची सुरुवात करणाऱ्याला, पंतय पिलाताने तिबिर्याच्या शासन काळात मृत्युदंडाची शिक्षा दिली.”—अॅनल्स, XV, ४४.

  • स्यूटोनियस

    (जवळपास इ.स. ६९–इ.स. १२२ नंतर) या रोमन इतिहासकाराने, आपल्या लाईव्ज ऑफ सिजर्स या पुस्तकात, पहिल्या ११ रोमन सम्राटांच्या काळातल्या घटनांची नोंद केली आहे. सम्राट क्लौद्य याच्याविषयी लिहिताना, रोममधल्या यहूदांमध्ये येशूवरून किती वाद झाले याबद्दल त्याने उल्लेख केला आहे. (प्रेषितांची कृत्ये १८:२) स्यूटोनियस म्हणतो: “ख्रेस्तूसाच्या [ख्रिस्तूसाच्या] चिथवण्यामुळे यहूदी सतत गोंधळ घालायचे आणि म्हणूनच क्लौद्याने त्यांना रोममधून बाहेर हकललं.” (द डिफाईड क्लॉडियस, XXV, ४) जरी स्यूटोनियसने येशूवर खोटा आरोप लावला, तरी त्याने त्याच्या अस्तित्वावर शंका घेतली नाही.

  • धाकटा प्लिनी

    (जवळपास इ.स. ६१–इ.स. ११३) हा रोमन लेखक आणि बिथुनिया (आजच्या काळातला टर्की देश) प्रांताचा अधिकारी होता. त्या प्रांतातल्या ख्रिस्ती लोकांशी कसं वागायचं याबद्दल त्याने रोमन सम्राट ट्रेजन याला लिहिलं. तो म्हणाला की त्याने ख्रिस्ती लोकांना आपला धर्म सोडण्यास भाग पाडलं आणि ज्यांनी नकार दिला त्यांना मारून टाकलं. त्याविषयी तो म्हणतो: “पण जे ख्रिस्ती नव्हते असं मान्य करायचे, माझ्या पाठोपाठ दुसऱ्या देवतांना प्रार्थना करायचे, तुझ्या प्रतिमेची उपासना करायचे . . . आणि ख्रिस्ताला शाप द्यायचे . . . फक्त त्यांनाच मी सोडून द्यायचो.”—प्लिनी—लेटर्ज, बुक X, XCVI.

  • फ्लेवियस जोसिफस

    (जवळपास इ.स. ३७–इ.स. १००) हा यहूदी याजक आणि इतिहासकार म्हणतो की अॅन्नस, या यहूदी महायाजकाचा राजकारणी लोकांमध्ये खूप धाक होता. “त्याने यहूदी न्यायसभेच्या सर्व न्यायाधीशांना एकत्र केलं आणि त्यांच्यासमोर, येशू ज्याला ख्रिस्त म्हणतात त्याचा भाऊ याकोब याला आणलं.”—ज्यूविश अॅटिक्विटीज, XX, २००.

  • तालमूद ग्रंथ

    यहूदी रब्बी लोकांनी हा ग्रंथ इ.स. ३ ते ६ या दरम्यान लिहिला. यामध्ये आपण पाहू शकतो की, येशूचे शत्रूदेखील त्याच्या अस्तित्वाचा पुरावा देतात. एका उताऱ्यात असं म्हटलं आहे, “वल्हांडणाच्या दिवशी येशू नासरेथकर याला लटकवण्यात आलं,” जे ऐतिहासिक रीतीने खरं आहे. (बॅबिलोनियन तालमूद, सन्हेद्रिन ४३ए, म्युनिक कोडेक्स; योहान १९:१४-१६ पाहा.) आणखी एका उताऱ्यात असं म्हटलं आहे: “आपल्याला नासरेथकरासारखा पुत्र किंवा शिष्य नसावा, जो चारचौघात लाजिरवाणं वागेल.” नासरेथकर हे नाव येशूसाठी वापरलं जायचं.—बॅबिलोनियन तालमूद, बेराकोथ १७बी, तळटीप, म्युनिक कोडेक्स; लूक १८:३७ पाहा.

बायबलमधला पुरावा

शुभवर्तमानाच्या पुस्तकांत येशूच्या जीवनाबद्दल आणि सेवाकार्याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. त्यात लोकांबद्दल, जागांबद्दल आणि कोणत्या घटना कधी घडल्या याबद्दल माहिती दिली आहे. यांमुळे या सर्व गोष्टी इतिहासात घडल्या याचा आपल्याला पुरावा मिळतो. एक उदाहरण म्हणजे, बाप्तिस्मा देणारा योहान. त्याने येशूच्या काही काळ आधी संदेष्ट्याचं कार्य केलं. हे कार्य त्याने कधी सुरू केलं याची तारीख आपल्याला लूक ३:१, २ या वचनातून कळते.

प्रत्येक शास्त्रलेख परमेश्वरप्रेरित आहे.—२ तीमथ्य ३:१६

लूकने असं लिहिलं: “तेव्हा तिबिर्य कैसर याच्या राज्याच्या पंधराव्या वर्षी पंतय पिलात यहूदीयाचा अधिकारी होता; हेरोद गालीलाचा मांडलिक, त्याचा भाऊ फिलिप्प हा इतुरीया त्राखोनीती या देशाचा मांडलिक, व लूसनिय अबिलेनेचा मांडलिक होता; आणि हन्ना कयफा हे प्रमुख याजक होते; तेव्हा जखऱ्याचा मुलगा योहान याला रानात देवाचे वचन प्राप्त झाले.” या वचनात दिलेल्या सविस्तर यादीमुळे योहानाला इ.स. २९ मध्ये देवाचं वचन प्राप्त झालं हे आपल्याला कळतं.

लूकने ज्या सात लोकांची नावं घेतली, त्यांच्या अस्तित्वाबद्दल इतिहासकारांना खात्री आहे. तरी काही काळासाठी, पंतय पिलात आणि लूसनिय यांच्या अस्तित्वाबद्दल काही टिकाकारांना शंका होती. पण आता काही जुने लेख सापडले आहेत ज्यांवर या दोन्ही अधिकाऱ्यांची नावं आहेत. त्यामुळे लूकचा अहवाल अचूक आहे याची खात्री पटते. *

हे का महत्त्वाचं आहे?

येशूने लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगितलं जे संपूर्ण जगावर राज्य करेल

येशूच्या अस्तित्वाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण त्याच्या शिकवणी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, येशूने लोकांना चांगलं व आनंदी जीवन कसं जगायचं हे शिकवलं. * त्याने भविष्यात येणाऱ्या अशा काळाबद्दलही सांगितलं, जेव्हा मानवांना खरी शांती व सुरक्षा मिळेल आणि हे देवाच्या राज्यामुळे शक्य होणार आहे.—लूक ४:४३.

या राज्याला “देवाचं राज्य” असं म्हणणं योग्य आहे कारण या राज्याद्वारे देव पूर्ण पृथ्वीवर राज्य करणार आहे. (प्रकटीकरण ११:१५) येशूने ही गोष्ट आपल्या प्रार्थनेत स्पष्ट केली: “हे आमच्या स्वर्गातील पित्या . . . तुझे राज्य येवो . . . पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:९, १०) हे राज्य मानवांसाठी काय करणार आहे? पुढील गोष्टींवर विचार करा:

काही लोकांना या गोष्टी निव्वळ कल्पना वाटतील. पण माणसांच्या प्रयत्नांवर भरवसा ठेवणंदेखील कल्पना करण्यासारखंच नाही का? विचार करा: शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अफाट प्रगती झाली असली, तरी लाखो लोकांना भविष्याबद्दल खूप अनिश्‍चितता आणि असुरक्षितता वाटते. आपल्याला रोज आर्थिक, राजनैतिक आणि धार्मिक जुलूम होत असल्याचे तसंच लोभाचे आणि भ्रष्टाचाराचे पुरावे पाहायला मिळतात. खरंच, मानवी सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे!—उपदेशक ८:९.

येशू अस्तित्वात होता की नाही या प्रश्‍नावर आपण विचार केला पाहिजे. * कारण बायबलमध्ये २ करिंथकर १:१९, २० (ईझी-टू-रीड-व्हर्शन) मध्ये म्हटलं आहे, “देवाची वचने कितीही असली, तरी ती त्याच्यामध्ये [ख्रिस्तामध्ये] होकारार्थी आहेत.” (g16-E No. 5)

^ परि. 23 लूसनिय हा “मांडलिक” किंवा प्रांतीय अधिकारी होता असा उल्लेख असणारा लेख सापडला आहे. (लूक ३:१) लूकने लिहिल्याप्रमाणे तो त्या वेळी अबिलेनेचा अधिकारी होता.

^ परि. 25 येशूच्या शिकवणींचं एक उत्तम उदाहरण, आपल्याला बायबलमध्ये मत्तय याच्या ५ ते ७ अध्यायात मिळतं. याला डोंगरावरील प्रवचनदेखील म्हटलं जातं.

^ परि. 32 येशू आणि त्याच्या शिकवणींबद्दल आणखी माहितीसाठी www.mr1310.com वर BIBLE TEACHINGS > BIBLE QUESTIONS ANSWERED इथं पाहा.