व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा | योसेफ

“मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”

“मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”

सूर्य मावळला आहे. योसेफ त्याच्या बागेत उभा आहे. तो त्याच्या बहरलेल्या बागेचं सौंदर्य न्याहाळत आहे. भिंतीच्या पलीकडे फारोच्या राजमहालाची झलक त्याला दिसते. अधूनमधून त्याला त्याच्या घरातला आवाज ऐकू येत आहे; त्याचा मुलगा मनश्शे आपला छोटा भाऊ एफ्राइम याला हसवत आहे. मुलांचा हा खेळ पाहून त्याची बायको हसत असल्याचं दृश्य योसेफाच्या डोळ्यासमोर येतं. हे सर्व देवाचेच आशीर्वाद आहेत हे त्याला माहीत असल्यामुळं तो खूप समाधानी आहे.

योसेफानं त्याच्या पहिल्या मुलाचं नाव मनश्शे ठेवलं; कारण त्याच्या नावाचा अर्थ, देवानं त्याचं दुःख विसरायला त्याला मदत केली असा होतो. (उत्पत्ति ४१:५१) देवानं योसेफाला भरपूर आशीर्वाद देऊन त्याच्या दुःखी मनावर फुंकर घातली होती. योसेफ त्याच्या घरापासून, वडिलांपासून लांब होता. शिवाय, त्याच्या मोठ्या भावांनी त्याचा द्वेष केल्यामुळं त्याचं जीवन पार बदलून गेलं होतं. त्यांनी योसेफावर हल्ला केला, त्याला मारण्याचा कट रचला आणि त्याला गुलाम म्हणून परदेशी व्यापाऱ्यांना विकून टाकलं. त्यानंतर त्याच्या जीवनात एका मागोमाग बरीच संकटं आली. कितीतरी वर्षं त्याला गुलाम म्हणून काम करावं लागलं होतं आणि काही काळ तर त्याला तुरुंगात बांधून ठेवण्यात आलं होतं. पण आता, योसेफ फारोच्या खालोखाल इजिप्त या बलाढ्य राष्ट्राचा प्रधान मंत्री बनला आहे!

देवानं सांगितलेल्या भविष्यवाण्या पूर्ण होत असल्याचं योसेफ पाहत आला होता. इजिप्तमध्ये सात वर्षं भरभरून पीक येत होतं आणि ते धान्य गोळा करण्याची जबाबदारी योसेफावर सोपवली होती. त्यादरम्यान त्याची बायको आसनथ हिला दोन मुलं झाली. तरी त्याला बऱ्याच लांब असलेल्या त्याच्या कुटुंबाची, खासकरून त्याचा धाकटा भाऊ बन्यामीन आणि त्याचे प्रिय वडील याकोब यांची आठवण यायची. ते सगळे बरे असतील का, भावांचं मन बदलंलं असेल का आणि त्यांच्यात निर्माण झालेली दरी कधी मिटेल का याबद्दल तो कधीकधी विचार करायचा.

ईर्ष्या, विश्वासघात किंवा द्वेष यांमुळं तुमच्या घरातील शांती भंग झाली असेल तर तुम्हालाही योसेफासारखं वाटू शकेल. त्याच्या कुटुंबाचा सांभाळ करताना त्यानं जो विश्वास दाखवला यावरून आपण काय शिकू शकतो?

“योसेफाकडे जा”

वर्षं भराभर जात होती; योसेफ दिवसरात्र धान्य गोळा करण्याच्या कामात व्यस्त होता. यहोवा देवानं फारोला स्वप्नाद्वारे एक भविष्यवाणी केली होती; ती म्हणजे सात वर्षांपर्यंत भरभरून पीक येईल पण त्यानंतर मात्र सात वर्षं कडक दुष्काळ पडेल. आणि तसंच घडलं! लवकरच इजिप्त आणि त्याच्या आजूबाजूच्या राष्ट्रांत दुष्काळ पडला. पण बायबलमध्ये सांगितलं आहे: “मिसर [इजिप्त] देशात सर्वत्र अन्न होते.” (उत्पत्ति ४१:५४) योसेफानं भविष्यवाणीचा अर्थ सांगितल्यामुळं आणि त्यानुसार योजना केल्यामुळं सर्व इजिप्त राष्ट्राला नक्कीच फायदा झाला असेल यात काही शंका नाही.

योसेफ नम्र होता म्हणून यहोवानं त्याच्या क्षमतांचा उपयोग केला

इजिप्तचे लोक योसेफाप्रती किती कृतज्ञ असतील; आणि एक चांगला व्यवस्थापक म्हणून त्याची प्रशंसाही करत असतील. पण या सर्वांचं श्रेय त्यानं यहोवा देवाला दिलं. तसंच, आपल्याकडे असणाऱ्या क्षमतांचा आपण जेव्हा यहोवाच्या सेवेत उपयोग करतो तेव्हा तो या क्षमता वाढवू शकतो आणि त्यामुळं आपण अपेक्षाही केली नसेल इतका चांगला परिणाम होऊ शकतो.

कालांतरानं, इजिप्तमधील लोकांपर्यंत दुष्काळाची झळ पोहचली. ते फारोकडे मदतीसाठी आले तेव्हा तो त्यांना सरळ म्हणाला: “योसेफाकडे जा; तो तुम्हास सांगेल ते करा.” लोक योसेफाकडे गेल्यानंतर त्यानं धान्याची कोठारे उघडली आणि लोकांनी त्याच्याकडून धान्य विकत घेतले.—उत्पत्ति ४१:५५, ५६.

पण इतर देशांतील लोकांकडे मात्र अन्नसामग्री नव्हती. हजारो मैल दूर असलेल्या कनान देशात योसेफाच्या कुटुंबाची उपासमार होत होती. योसेफाचा वृद्ध झालेला बाप याकोब याला जेव्हा समजलं की इजिप्तमध्ये धान्याचा साठा आहे तेव्हा तिथून धान्य विकत आणण्यासाठी त्यानं त्याच्या मुलांना सांगितलं.—उत्पत्ति ४२:१, २.

पण याकोबानं त्याचा धाकटा मुलगा बन्यामीन याला त्याच्या दहा मुलांसोबत पाठवलं नाही. कारण याकोबाला २० वर्षांआधी घडलेली घटना आठवली; त्यानं त्याचा सर्वात आवडता मुलगा योसेफ याला त्याच्या मोठ्या भावांकडे पाठवलं होतं पण त्यानंतर तो घरी परत आलाच नाही. त्याच्या इतर मुलांनी योसेफाचा फाटलेला व रक्तानं भरलेला अंगरखा त्याला दाखवला होता. त्यांनी याकोबाला सांगितलं की एका जंगली जनावरानं योसेफाला फाडून खाल्लं. हे ऐकून तो पूर्णपणे खचून गेला होता.—उत्पत्ति ३७:३१-३५.

“योसेफाला आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने” लगेच आठवली

लांबचा प्रवास करून याकोबाची मुलं इजिप्तला पोहचले. त्यांनी धान्य विकत घेण्याविषयी विचारलं तेव्हा त्यांना सापनाथपानेह नावाच्या उच्च अधिकाऱ्याकडे जाण्यास सांगितलं. आणि तो खरंतर योसेफ होता. (उत्पत्ति ४१:४५) ते त्याला भेटायला गेले तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं का? अजिबात नाही. ते फक्त त्याला इजिप्तचा एक उच्च अधिकारी या नात्यानं पाहत होते; तो त्यांना अन्न देणार होता. त्याला आदर देण्यासाठी त्यांनी “जमिनीपर्यंत लवून” नमस्कार केला.—उत्पत्ति ४२:५, ६.

पण योसेफानं आपल्या भावांना लगेच ओळखलं! त्यांनी जेव्हा त्याला वाकून नमस्कार केला तेव्हा त्याला लहानपणी “आपल्या भावांविषयी पडलेली स्वप्ने” लगेच आठवली. त्याचे भाऊ त्याला वाकून नमस्कार करतील असं भविष्यसूचक स्वप्न त्यानं पाहिलं होतं आणि आता तेच झालं! (उत्पत्ति ३७:२, ५-९; ४२:७, ९; ईझी-टू-रीड व्हर्शन) आता योसेफ काय करणार होता? त्यांना आनंदानं मिठी मारणार होता, की त्यांचा बदला घेणार होता?

अशा वेळी तडकाफडकी निर्णय घेता कामा नये ही गोष्ट योसेफाला माहीत होती. या परिस्थितीला यहोवानंच वळण दिलं होतं हे त्याला समजलं; कारण यहोवानं असं वचन दिलं होतं की याकोबाच्या संततीपासून एक मोठं राष्ट्र निर्माण होईल. (उत्पत्ति ३५:११, १२) जर योसेफाचे भाऊ पूर्वीसारखं हिंसक, दुष्ट, स्वार्थी असते तर यहोवाच्या उद्देशात अडथळा निर्माण झाला असता! तसंच, योसेफानं स्वतःच्या भावना आवरल्या नसत्या तर त्याचे भाऊ त्याच्या वडिलांचं आणि बन्यामीनाचं बरंवाईट करू शकत होते. शिवाय योसेफाला हेही माहीत नव्हतं की ते जिवंत आहेत की नाहीत. योसेफानं त्याची ओळख लपवून ठेवली कारण त्याला त्याच्या भावांची परीक्षा घ्यायची होती; त्यावरून त्याला समजणार होतं की ते बदलले आहेत की नाहीत. तसंच, त्यानं त्याच्या भावांशी कसं वागावं याबद्दल यहोवाची काय इच्छा आहे हे त्याला समजणार होतं.

तुम्हाला कदाचित अशा परिस्थितीचा सामना कधीच करावा लागणार नाही. पण सहसा आपल्याला कुटुंबात भांडणतंटा आणि मतभेद होताना पाहायला मिळतात. अशा समस्यांचा सामना करताना कदाचित आपण तडकाफडकी निर्णय घेऊ. पण अशा वेळी आपण योसेफाचं अनुकरण केलं पाहिजे. आणि यहोवा देव आपल्याकडून कशा प्रकारे वागण्याची अपेक्षा करतो हे जाणून घेतलं पाहिजे. (नीतिसूत्रे १४:१२) तसंच, कुटुंबातील सदस्यांबरोबर शांतीनं वागणं महत्त्वाचं तर आहे पण यहोवा देवासोबत आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्तासोबत शांतीचा नातेसंबंध असणं विशेष महत्त्वाचं आहे.—मत्तय १०:३७.

“तुमची कसोटी” पाहिली जाईल

योसेफानं त्याच्या भावांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली; त्यांच्या मनात काय आहे हे यावरून समजणार होतं. योसेफानं आपली ओळख लपवण्यासाठी एका भाषांतर करणाऱ्याला मध्यस्थ बनवलं आणि त्याच्याद्वारे तो त्यांच्याशी कठोर शब्दांत बोलू लागला. शिवाय ते परदेशी असल्यामुळं त्यानं असाही आरोप लावला की ते जासूद आहेत. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाबद्दल सांगितलं आणि हेही सांगितलं की आपला सर्वात धाकटा भाऊ घरी आहे. हे समजताच त्याला खूप आनंद झाला पण त्यानं तो दाखवला नाही. त्यानं आता काय केलं पाहिजे हे त्याला समजलं, म्हणून तो त्यांना म्हणाला: “आता तुमची कसोटी पाहतो.” ‘मला तुमच्या लहान भावाला बघायचंय’ असं त्यानं सांगितलं. पण त्यानं त्यांच्यापैकी एकाला मागे ठेवून बाकीच्यांना त्यांच्या धाकट्या भावाला घेऊन येण्यास सांगितलं.—उत्पत्ति ४२:९-२०.

योसेफाला आपली भाषा समजणार नाही असं समजून ते त्याच्यासमोरच बोलू लागले. आपण २० वर्षांपूर्वी घोर पाप केल्याबद्दल ते स्वतःला दोष देऊ लागले. ते एकमेकांना म्हणू लागले: “आपण आपल्या भावाच्या बाबतीत खरोखर अपराधी असता व आपण त्याचे दुःख पाहिले असताही त्याचे ऐकले नाही म्हणून हे दुःख आपणावर आले आहे.” ते जे काही बोलत होते ते योसेफाला समजलं; म्हणून तो बाजूला जाऊन रडला. (उत्पत्ति ४२:२१-२४) योसेफाला हे माहीत होतं की केलेल्या चुकीबद्दल फक्त स्वतःला दोष दिल्यानं खरा पश्‍चात्ताप दिसून येत नाही म्हणून त्यानं त्यांची परीक्षा सुरू ठेवली.

योसेफानं त्याच्या भावांपैकी शिमोनाला कैदी बनवून ठेवलं आणि इतर भावांना घरी पाठवलं. तसंच, ते ज्या धान्याच्या गोण्या घरी घेऊन जाणार होते त्यात त्यानं सेवकांना पैसे लपवायला सांगितलं. ते घरी परतले. ते याकोबाला विनवणी करू लागले की बन्यामीनाला त्यांच्यासोबत इजिप्तला पाठवावं; शेवटी याकोब कसाबसा तयार झाला. इजिप्तमध्ये आल्यावर त्यांनी योसेफाच्या सेवकाला सांगितलं की त्यांच्या गोण्यांमध्ये पैसे सापडले होते आणि ते सगळे पैसे ते परत करतील. ही गोष्ट प्रशंसा करण्यासारखी होती पण ते खरंच बदलले आहेत का हे योसेफाला पाहायचं होतं. बन्यामीनाला पाहून त्याला खूप आनंद झाला म्हणून त्यानं त्यांना मेजवानी दिली. त्यानंतर योसेफानं एक कट रचला; त्यानं त्यांना धान्याच्या गोण्या देऊन घरी पाठवलं; पण या वेळी मात्र त्यानं बन्यामीनाच्या गोणीत आपला चांदीचा पेला लपवला.—उत्पत्ति ४२:२६–४४:२.

ते तिथून गेल्यानंतर त्यांचा पाठलाग करायला योसेफानं त्याच्या सेवकांना पाठवलं. सेवकांनी त्यांच्यावर पेला चोरल्याचा आरोप लावला आणि त्यांची झडती घेतली. त्यांना बन्यामीनाच्या गोणीत तो चांदीचा पेला सापडला आणि त्यांना पुन्हा योसेफाकडे नेण्यात आलं. आता नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे योसेफाला कळणार होतं. यहूदा हा दहा भावांपैकी एक होता; तो त्याच्या भावांच्यावतीनं बोलू लागला. तो गयावया करू लागला; इजिप्तमध्ये आम्ही सर्व ११ जण गुलाम म्हणून राहू असं तो म्हणाला. पण योसेफानं फक्त बन्यामीनाला गुलाम म्हणून ठेवायला सांगितलं आणि इतरांना मात्र जायला सांगितलं.—उत्पत्ति ४४:२-१७.

यहूदा कळकळीनं विनवणी करू लागला: “त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे, आणि त्याच्या बापाचे त्याजवर प्रेम आहे.” हे ऐकल्यावर योसेफाला खूप भरून आलं कारण तो आणि बन्यामीन हे याकोबाची दुसरी पत्नी राहेल हिची मुलं होती; बन्यामीनाला जन्म देताना ती मरण पावली होती. योसेफाचं आपली आई राहेल हिच्यावर खूप प्रेम होतं. तिच्या आठवणी अजूनही त्याच्या मनात ताज्या होत्या. कदाचित त्यामुळं योसेफाचा बन्यामीनावर खूप जीव होता.—उत्पत्ति ३५:१८-२०; ४४:२०.

बन्यामीनाला गुलाम करू नका अशी विनवणी यहूदा योसेफाकडे करू लागला. त्याच्या जागी तो स्वतः गुलाम म्हणून राहण्यास तयार झाला. शेवटी तो कळकळून म्हणू लागला: “हा मुलगा मजबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापास दुःख होईल ते मला पाहवणार नाही.” (उत्पत्ति ४४:१८-३४) आता योसेफाला समजलं की त्याचा भाऊ बदलला होता. त्यानं पश्‍चात्ताप तर दाखवला शिवाय त्याच्या वागण्यातून निःस्वार्थी वृत्ती आणि सहानुभूती दिसून आली.

आपण केलेल्या वाईट कृत्याबद्दल योसेफाचे भाऊ स्वतःला दोष देत आहेत हे त्यानं पाहिलं.

आता काही योसेफाला राहवलं नाही. त्यानं त्याच्या सेवकांना बाहेर जाण्यास सांगितलं आणि तो ढसाढसा रडू लागला. तो इतक्या मोठ्यानं रडला की त्याचा आवाज फारोच्या राजमहालापर्यंत पोहचला. शेवटी त्यानं त्याची ओळख दिली: ‘मीच तुमचा भाऊ योसेफ आहे.’ हे ऐकून त्याचे भाऊ चकित झाले. पण योसेफानं त्याच्या भावांना कडकडून मिठी मारली आणि मनापासून माफ केलं. (उत्पत्ति ४५:१-१५) असं करून त्यानं, मनापासून क्षमा करणारा देव यहोवा याचं अनुकरण केलं. (स्तोत्र ८६:५) आपणही असंच एखाद्याला मनापासून माफ करतो का?

“तू अजून जिवंत” आहेस

योसेफाबरोबर घडलेल्या या सर्व गोष्टी फारो राजाला कळल्या. तेव्हा त्यानं योसेफाला त्याच्या वृद्ध वडिलांना तसंच घरातील सर्व लोकांना इजिप्तमध्ये राहायला येण्यास सांगितलं. लवकरच योसेफ त्याच्या प्रिय वडिलांना भेटला. याकोब रडतरडत योसेफाला म्हणाला: “तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला खुशाल मरण येवो.”—उत्पत्ति ४५:१६-२८; ४६:२९, ३०.

पण याकोब इजिप्तमध्ये १७ वर्षं जगला. त्यादरम्यान त्यानं त्याच्या १२ मुलांना आशीर्वाद दिले जे भविष्यात पूर्ण होणार होते. योसेफ अकरावा मुलगा होता; सहसा ज्येष्ठ मुलाला दिला जाणारा हक्क त्यानं योसेफाला दिला. त्याच्या संततीतून इस्राएलच्या दोन राष्ट्रांचा जन्म होणार होता. पण यहूदाबद्दल काय जो चौथा मुलगा होता? खरंतर तो त्याच्या भावांच्यावतीनं बोलला; त्याच्यामुळंच योसेफाला समजलं की त्याच्या भावांनी पश्‍चात्ताप दाखवला आहे आणि ते बदलले आहेत. त्याला एक मोठा आशीर्वाद मिळाला; तो म्हणजे त्याच्या वंशातून मसीहा येईल असं याकोबानं सांगितलं!—उत्पत्ति ४८, ४९ अध्याय.

याकोब १४७ वर्षांचा असताना मरण पावला; आता योसेफ आपला बदला घेईल असं त्याच्या भावांना वाटलं. पण योसेफानं तसं काही केलं नाही आणि करणारही नाही याचं प्रेमळ आश्वासन त्यानं त्यांना दिलं. योसेफाला जाणवलं होतं की यहोवानंच त्याच्या कुटुंबाला इजिप्तमध्ये आणलं होतं. त्यामुळं त्याच्या भावांनी त्याच्यासोबत केलेल्या कृत्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये असं समजावून सांगितलं. याबद्दल त्यांची खातरी पटण्यासाठी त्यानं एक जोरदार विधान केलं: “मी देवाच्या ठिकाणी आहे काय?” (उत्पत्ति १५:१३; ४५:७, ८; ५०:१५-२१, ईझी-टू-रीड व्हर्शन) यहोवा देव हाच योग्य न्याय करणारा आहे हे त्याला माहीत होतं. त्यामुळं योसेफानं विचार केला, की ‘यहोवानं जर त्यांना माफ केलं आहे तर मग मी कोण आहे त्यांना शिक्षा करणारा?’—इब्री लोकांस १०:३०.

तुम्हाला एखाद्याला माफ करणं कठीण जातं का? खासकरून एखाद्यानं जर तुम्हाला खूप दुखवलं असेल तर अशा व्यक्तीला माफ करणं कठीण जाऊ शकतं. पण त्यानं जर खरा पश्‍चात्ताप दाखवला तर त्याला आपण मनापासून माफ केलं पाहिजे. असं केल्यानं त्याच्या तसंच आपल्या मनावर झालेल्या जखमा आपण भरून काढू शकू. तसंच, आपण योसेफाच्या विश्वासाचं आणि यहोवा देवाच्या दयाळूपणाचं अनुकरण करत असू. ▪ (w15-E 05/01)